‘मनात सतत विचार येत रहाणे अथवा विचार करत रहाणे’, ही मनाची एक प्रक्रिया आहे. अनावश्यक विचारांचा व्यवहारी माणूस आणि साधक या दोघांनाही त्रास होत असतो. ‘सध्या निर्विचार अवस्थेत रहाणे शक्य नाही’, हे स्वीकारून ‘कोणत्या विचारांवर नियंत्रण मिळवता येते का ?’, यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. या लेखात आपण ‘आपल्या मनातील अनावश्यक विचार दूर करण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे पाहूया.

१. साधनेला पूरक विचार करणे
१ अ. नामजप करतांना अनावश्यक विचार करण्यापेक्षा भावाच्या स्तरावरील विचारांत रहाणे : ‘नामजप करतांना मनात विचार येतात’, ही वस्तूस्थिती आहे; पण ‘मनात कोणते विचार येतात ?’, याचा अभ्यास करणे आणि ‘कोणत्या विचारात रहायला पाहिजे ?’, हे शोधून त्या विचारात रहाणे महत्त्वाचे आहे, उदा. नामजप करतांना वडापाव खावासा वाटतो, ‘घरात काय चालू आहे ?’, ते आठवते किंवा एखाद्या चित्रपटाचे गाणे आठवते. यापेक्षा ‘कोणत्या सेवा प्रलंबित आहेत ?’, हे आठवणे चांगले आणि त्याही पुढे जाऊन नामजप करतांना ज्याचा नामजप करत आहोत, त्याच्या ‘भावाच्या विचारात रहाणे, म्हणजे एकीकडे नाम चालू आहे आणि विचाराच्या स्तरावर देवाला प्रार्थना अन् कृतज्ञता चालू आहे’, असे होऊ शकते का ?’, हे बघावे, म्हणजे मन साधनेच्या पूरक विचारांमध्ये राहील.
१ आ. सेवा करतांना मनाला सेवेच्या विचारांत ठेवणे : विचारांचा त्रास ‘कोणती सेवा करत आहोत ?’, त्यावरही अवलंबून आहे, उदा. आपण कपाटात सामान लावण्याची सेवा करत आहोत. ते आपल्या सवयीचे नाही. १० वस्तू विचार करून लावायच्या आहेत. अशा वेळी मन इतर विचारांमध्ये असेल, तर एकीकडे हात काहीतरी ठेवत आहेत; पण त्यात मन नसल्यामुळे ‘भलत्याच गोष्टी भलतीकडे ठेवल्या आणि सेवेत चुका झाल्या’, असे होते. हे अनावश्यक विचारांमध्ये रमणे झाले. त्यातून सेवेत चुका होतात. अशा वेळी ‘हातातल्या सेवेच्या अनुषंगाने मनाला विचारात ठेवणे’, हे अधिक चांगले ! तिथे ‘हे सामान आणखी चांगले ठेवायच्या दृष्टीने काय केले पाहिजे ? ‘आपण ही वस्तू कुठे ठेवली आहे ?’, हे विसरू नये; म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ?’, अशा विचारांमध्ये मन राहिल्यास ते वर्तमानात राहून सेवा आणि साधना यांना पूरक राहील.
२. मनातील विचार न्यून होण्यासाठी करायचे प्रयत्न !
२ अ. एकाग्रतेने सेवा करणे : एखादा साधक संगणकीय सेवा, उदा. संकलन करणे, लेख लिहिणे, अशी बौद्धिक सेवा करत असतो, तर कुणीतरी स्वयंपाक बनवण्याची सेवा करत असतो. हे करतांना आपण त्या सेवेच्या प्रक्रियेशी जितके एकाग्र होऊ, तेवढी सेवेतील फलनिष्पत्ती तर वाढतेच, तसेच मनातील विचारही आपोआप न्यून होतात. ‘सेवा झाल्यानंतर मनातील विचार न्यून झाले का ? मनाला हलके वाटले का ?’, याचा आढावा आपण घेतला, तर ‘आपल्या मनातील विचार न्यून झाले किंवा हलके वाटले’, असे आपल्याला जाणवेल. तेव्हा नक्कीच त्या सेवेतील आपली एकाग्रता वाढलेली असणार आहे.
२ आ. एखादी कृती संपूर्णपणे झोकून देऊन करणे : जेव्हा आपण एखादी कृती संपूर्णपणे झोकून देऊन करायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनातील इतर विचार आपोआप न्यून झालेले असतात आणि आपण सेवेच्या विचारांमध्येच एकाग्र झालेलो असतो, उदा. परीक्षेच्या ३ घंट्यांत विद्यार्थी इतर वेळी जेवढ्या गतीने लिहितील, त्यापेक्षा अधिक गतीने अधिक पाने भरून लिहितात. ‘एरव्ही ते विद्यार्थी ही गती सांभाळू शकतीलच’, असे नाही. परीक्षा आहे; म्हणून काही विद्यार्थी झोकून देऊन शंभर टक्के मनापासून लिहितात. ‘सेवा अथवा कार्य करतांनाही आपण असे करतो का ?’, याचा अभ्यास प्रत्येकाने करावा. जेवण बनवतांना पाहुणे यायचे असतील आणि वेळ अल्प असेल, तरी तसेच असते. भाषण करतांना इतर विचार करायला संधी नसते. ही सूची मोठी आहे. विषय इतकाच आहे की, चांगले तर करायचेच आहे; पण न्यूनतम वेळेत करायचे आहे.
३. गुण वाढवण्याचा आणि अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केल्याने मनात सकारात्मक विचार आपोआप येतात !
आपण बर्याचदा ‘मला काय येत नाही ? माझ्यात कोणता स्वभावदोष आहे ? सेवेत माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या ? मी कुठे न्यून पडलो ?’, यांसारख्या नकारात्मक गोष्टी आठवत रहातो. ‘चुका टाळल्या पाहिजेत आणि स्वभावदोष घालवले पाहिजे’, यांकडे पहात रहातो. हे पहाणे चुकीचे नसून आवश्यकच आहे; पण ‘चुका टाळण्याचा विचार करणे किंवा स्वभावदोष घालवण्याचा विचार करणे’, यामध्ये एक ‘इनबिल्ट’ (अंतर्भूत) नकारात्मकता आहे. यापेक्षा ‘गुण वाढवण्याचा प्रयत्न करणे आणि अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करणे’, यात एक ‘इनबिल्ट’ (अंतर्भूत) सकारात्मकता आहे. ती आपल्याला सकारात्मक ठेवते आणि आणखी सहजतेकडे नेते. ‘गुण वाढवूया, आणखी छान करूया’, यामध्ये मन थकण्याचा प्रकार न्यून होतो. एक मोठी रेषा काढायची म्हटली की, मनात सकारात्मक विचार आपोआप येतात.
‘अनेकातून एकात येणे’, हा साधनेचा मूलभूत सिद्धांत आहे, म्हणजेच अनेक विचारांतून एका विचारात आणि आपोआपच एका विचारातून शून्याकडे’, असा हा प्रवास असेल का ? मग ‘आपण कुठे कुठे अनेक विचारांत अडकतो ? आणि त्यांतून एका विचारात कुठे यायचे ?’, हे आपण शोधू शकतो.’
– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद. (एप्रिल २०२६)
गुरुबोध
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !