भारतीय स्टेट बँकेला ३ वर्षांत ६ अब्ज ३१३ कोटी रुपयांचा फटका !

  • ३११ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांत बँक कर्मचारीच सहभागी ! 

  • बंगाल फसवणुकीत पुढे !

प्रतीकात्मक चित्र

नागपूर – गेल्या काही वर्षांत बँकिंग क्षेत्रात सायबर गुन्हेगारी आणि फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ची गेल्या ३ वर्षांत सायबर भामट्यांनी ६ अब्ज ३१३.३५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीला उत्तर देतांना बँकेने ही धक्कादायक आकडेवारी घोषित केली आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत बँकेत एकूण ३० सहस्र ७४६ फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत.

१. बँकेतील कर्मचार्‍यांनी केलेल्या आर्थिक अपव्यवहाराची ३०३ प्रकरणे उघडकीस आली असून यामध्ये ३११.०८ कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आले आहेत.

२. देशात फसवणुकीच्या घटनांमध्ये बंगाल राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे ३ सहस्र ४२६ फसवणुकीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून ग्राहकांना १४३.६७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

३. ‘युपीआय’ फसवणुकीत सर्वाधिक १२ सहस्र ८६८ प्रकरणांमध्ये ७१.५१ कोटी रुपये लुटले गेले.

४. इंटरनेट बँकिंगमध्ये ८ सहस्र ६५७ गुन्ह्यांमध्ये ७९.५८ कोटी रुपयांवर डल्ला मारण्यात आला, तर ‘ए.टी.एम्.’च्या फसवणुकीत १ सहस्र १०२ प्रकरणांत ९.५८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. मोबाईल बँकिंगमध्ये २९६ गुन्ह्यांमध्ये ३.६६ कोटी रुपये पळवले आहेत.

संपादकीय भूमिका

यातील दोषींना आजन्म कारावासाची किंवा फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?