
भारत बनवत असलेली अण्वस्त्रे आता केवळ शोभेच्या वस्तू राहिलेल्या नाहीत. भारताच्या शत्रूंना, म्हणजेच पाकिस्तान, चीन, तुर्कीये आदींना नमवण्यासाठी अण्वस्त्रांना प्रथमच सज्ज करण्यात आले आहे. स्विडनची ‘सिप्री’, म्हणजेच ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेने जगभरातील अण्वस्त्रांसंबंधी नुकताच एक अहवाल सादर केला. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, भारताने १९० पैकी किमान १२ अण्वस्त्रे ‘सक्रीय’ स्थितीत तैनात केली आहेत. भारताच्या युद्ध धोरणात हा आमूलाग्र पालट आहे, या दृष्टीने याकडे पहायला हवे. यापूर्वीच्या अहवालांमध्ये भारताच्या अण्वस्त्रांचे वर्णन ‘तैनात करून ठेवण्यात आलेले’, असे न करता ‘साठा’ (स्टॉकपाईल) म्हणून केले जात असे. हा दावा आहे, हे लक्षात घ्या. तथापि आंतरराष्ट्रीय सुरक्षा, सैनिकी खर्च आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार यांवरील माहितीसाठी ‘सिप्री’ अत्यंत विश्वसनीय, स्वतंत्र अन् जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानली जाते. वर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेल्या आणि प्रामुख्याने स्विडिश सरकार अन् संयुक्त राष्ट्रे यांसारख्या स्वतंत्र संस्थांकडून अर्थसाहाय्य मिळणार्या या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये कठोर आणि वस्तूनिष्ठ संशोधनाला प्राधान्य दिले जाते. यामुळे भारताच्या संदर्भातील तिने केलेल्या दाव्यात तथ्य मानण्यास हरकत नाही. तसेही भारत असो कि अन्य कोणतेही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र, ते कधीही आपण कशा प्रकारे युद्धसज्ज होत आहोत, हे सांगत नसते. युद्ध मुत्सद्देगिरी असते, ती हीच !

आक्रमक बचावाचा पवित्रा !
सिप्रीने अहवालात म्हटले की, ही अण्वस्त्रे भारतीय युद्धनौका, पाणबुड्या किंवा इतर वाहक यंत्रणा यांच्यावर सतत तैनात ठेवण्यात आली आहेत. याचा अर्थ, एखाद्या देशाने भारतावर अण्वस्त्रांचा वापर करण्याचा प्रयत्न केलाच, तर भारत त्वरित अण्वस्त्रांद्वारेच प्रतिआक्रमण करण्यास सज्ज आहे. भारताला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संरक्षण व्यूहरचनेच्या दूरदृष्टीला आपण आता अंगीकारले. या दूरदृष्टीचे अनेक दाखले ‘सावरकरांची ऐतिहासिक वक्तव्ये’ या पुस्तकात सापडतात. वर्ष १९६५ मध्ये भारत-पाक युद्ध थांबण्यासाठी ताश्कंद करार झाला. त्यासाठी जेव्हा तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उज्बेकिस्तानला जाणार होते, तेव्हा सावरकर म्हणाले की, आपण लक्षात घेतले पाहिजे की, केवळ त्याच स्वरूपाची आणि त्याच तीव्रतेची प्रत्युत्तर देणारी कारवाईच पाकिस्तानची आक्रमकता रोखू शकते. रशिया आणि अमेरिका यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असणे पुरेसे नाही. भारताला सर्व प्रकारची अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांनी सज्ज करण्याची योजना आपण त्वरित हाती घेतली पाहिजे. जोपर्यंत सरकार या दिशेने कोणतीही पावले उचलत नाही, तोपर्यंत सद्भावना आणि मैत्री यांच्या आपल्या सर्व गप्पा निरर्थक ठरतील. सावरकर यांचे हे विचार किती प्रासंगिक आहेत, हे लक्षात घ्या. या विचारांना अंगीकृत करून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणतात, ‘यह नया भारत है । यह घर में घुसेगा भी और मारेगा भी !’
भारतावर आक्रमण करणार्या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना त्यांच्या भूमीत घुसून भारताने यमसदनी धाडण्यामागे हीच सावरकरी रणतीनी वापरली जाते. ‘ऑपरेशन सिंदूर’ असेल किंवा वर्ष २०१६ आणि २०१९ मधील सर्जिकल स्ट्राईक असतील. अगदी जून २०२० मध्ये लडाखमध्ये बलाढ्य चिनी सैनिकांच्या विरोधात झालेला यशस्वी भारतीय संघर्षही पहाता, या सर्व घटना आपले सरकार आणि सैन्य यांच्यातील ‘आक्रमक बचावाचा पवित्रा’ (ऑफेन्सिव डिफेन्स) या धोरणास आधारभूत ठरवून पुढे जात आहेत. हल्लीच प्रवीण प्रभाकर जंजाल या भारताच्या वीर सैनिकाला मरणोपरांत ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. त्यांच्या मातोश्री शालू प्रभाकर जंजाल यांना या प्रसंगी अनावर झालेले अश्रू आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी केलेले त्यांचे सांत्वन ही मनाला हेलावून टाकणारी दृश्ये केवळ सर्वसामान्य भारतीय मनातच नाहीत, तर सरकारलाही सूडाग्नी धगधगत ठेवण्यास प्रेरित करतात. ते तत्त्वच अण्वस्त्रांच्या सज्जतेतून समोर आले आहे.
घेरावाशी दोन हात !

‘सिप्री’च्या अहवालातील बारकावे पाहिले, तर लक्षात येते की, सैनिकी महाशक्ती असलेल्या रशिया, अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि चीन मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे आक्रमणाच्या पवित्र्यात ठेवत आल्या आहेत. चीनकडे बघा. भारतापेक्षा जवळजवळ तिप्पट, म्हणजे त्याची ३४ अण्वस्त्रे आक्रमक पवित्र्यात सज्ज आहेत. या जोडीला चीन भारताच्या सीमेजवळ क्षेपणास्त्रांचे तळ उभारत आहे, जेथून तो ४ सहस्र कि.मी. अंतर पार करू शकणार्या डीएफ्-२६ अण्वस्त्रसंपन्न क्षेपणास्त्रांचा मारा करू शकेल. किंघाई प्रांतातील गोलमुडमधील हे तळ भारतीय सीमेपासून अवघ्या ९०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. याचा अर्थ येथून डागली गेलेली क्षेपणास्त्रे भारताच्या आतपर्यंत मारा करू शकतात. चीनने अचानक आक्रमण केलेच, तर त्याला त्वरित तोंड देण्यासाठी भारताने अण्वस्त्रे सज्ज केली असावीत. चीनने गेल्या ३ वर्षांत ५०० वरून ६२० अण्वस्त्रांचा आकडा गाठला. आपण या कालावधीत १६४ वरून १९० अण्वस्त्रे वाढवली. ही १५ टक्के वाढ महत्त्वाची होय. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने केलेले हे महत्त्वपूर्ण धोरणात्मक परिवर्तन आहे. ‘ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशन’ या संरक्षणात्मक तज्ञांच्या स्वतंत्र संस्थेचे सदस्य मनोज जोशी यांच्या मते, कोणत्याही परमाणू युद्धात ५ ते १० अण्वस्त्रेच पूर्ण देशाला नष्ट करू शकतात. चीनने आपली १५० अण्वस्त्रे नष्ट केली, तरी आपल्या ४० अण्वस्त्रांच्या माध्यमातून आपण चीनच्या १५ ते २० मोठ्या शहरांना नष्ट करू शकतो.
पाकचा विचार केला, तर तो सातत्याने भारतावर अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करण्याच्या धमक्या देत असतो. अशा वेळी त्याच्याशी सामना करण्यासाठीही आपल्याला अण्वस्त्रांची सज्जता आवश्यक आहे. या सगळ्यात ‘आय.एन्.एस्. अरिघात’ आणि ‘आय.एन्.एस्. अरिदमन’ या क्षेपणास्त्रवाहू पाणबुड्यांमध्ये अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांना वेगवेगळे ठेवता येत नाही. यामुळेही भारताने हे धोरणात्मक पाऊल उचलले. तथापि भारताची ‘नो फर्स्ट यूज पॉलिसी’, म्हणजेच ‘प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही’ हे धोरण आता पालटायला हवे. भारताने ते पालटून आवश्यकतेनुसार अण्वस्त्रांचा प्रथम वापर करायला हवा.
‘शांतता टिकवून ठेवण्यासाठी युद्धसज्जता करत रहाणे, हा सर्वाेत्तम मार्ग आहे’, असे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन म्हणायचे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात वाढत असलेली निकटता, चीनच्या पंगतीत जाऊन बसलेला नेपाळ आणि चीनच्या साहाय्याने पाकिस्तानने चालवलेला महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रम भारताला भूराजकीयदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहे. चीन आणि रशिया यांची अमेरिकेला आव्हान ठरणारी युती असो कि चीनचा आशियातील दबदबा अल्प करण्यासाठी अमेरिकेने भारताला हाताशी धरून ‘क्वाड’ देशांच्या युतीचे उगारलेले शस्त्र असो, भारताला सर्व बाजूंनी सावध रहाणे हाच सर्वाेत्तम आणि आत्मरक्षणाचा मार्ग आहे. यासाठीच सावरकरांचे धोरण ‘चरैवेति चरैवेति’ (पुढे चालत रहा !) प्रमाणे राबवत रहाणे नि परमाणू शस्त्रांची वाढ करत रहाणे, हा खडतर मार्ग अपरिहार्य आहे !
POK Pakistani Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकचे हेलिकॉप्टर कोसळले : २१ ठार !
Pistol Amid Debate : वृत्तवाहिनीवरील भरचर्चेत पाकिस्तानी प्रतिनिधीने पिस्तूल काढले !
China Pakistan Space Program : पाकिस्तानचा अंतराळ कार्यक्रम चीनच्या साहाय्याने चालू !
Pakistan’s Atrocities On POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानाकडून मानवी अधिकारांचे उल्लंघन ! – भारत
China’s Monopoly Rare Earth : बलाढ्य चीनचे ‘दुर्मिळ खनिजां’वर प्रक्रिया करण्याचे कठोर निर्बंध कायम !
Pakistan Air Strike : पाकिस्तानच्या आक्रमणात ११ मुलांसह १३ अफगाणी नागरिकांचा मृत्यू ! – तालिबान