सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर केलेल्या उपायांमागील शास्त्र

साधकांसाठी नामजपादी उपाय सांगतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न : वाईट शक्तींमुळे साधकांना होणार्‍या त्रासांच्या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे उपायांचे पुढील स्तर लक्षात आले. त्यांचे शास्त्र हवे, तसेच आणखी काही स्तर असले, तर तेही योग्य ठिकाणी हवेत.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी व्यष्टी स्तरावर साधकांसाठी केलेल्या उपायांचे प्रकार 

अ. साधकांसाठी व्यक्तीशः उपाय करणे

आ. साधकांना उपयुक्त असे उपाय सांगणे

इ. साधकांवर पंचतत्त्वाचे उपाय होण्यासाठी त्यांना अत्तरासारख्या वस्तू वापरण्यास सांगणे किंवा वापरण्यासाठी संतांच्या हस्तलिखितासारख्या काही वस्तू देणे

ई. साधकांनी त्रास सांगितल्यावर त्यांचा त्रास आपोआप न्यून होणे

२. समष्टी स्तरावरील उपाय सर्वांना सामाईक नामजपादी उपाय सांगणे

३. काळाच्या स्तरावरील उपाय

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकाला त्रासावर कोणताही उपाय न सांगता ‘काही घंट्यांनी त्रास न्यून होईल’, असे सांगणे आणि त्याप्रमाणे त्याचा त्रास न्यून होणे

४. कालातीत स्तरावरील उपाय असे काही आहे का ? 

श्री. राम होनप यांनी दिलेले उत्तर :

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी व्यष्टी स्तरावर साधकांसाठी केलेल्या उपायांमागील शास्त्र 

श्री. राम होनप

१ अ. साधकांसाठी व्यक्तीशः उपाय करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काही आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी व्यक्तीशः नामजपादी उपाय केले आहेत. त्याची कारणे पुढे दिली आहेत.

१ अ १. भक्तवत्सल अवस्था : साधकात आध्यात्मिक प्रगतीची तळमळ असते; परंतु वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे त्या साधकाला साधना करतांना असंख्य अडचणी येतात. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या साधकाला तत्परतेने साहाय्य करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची ही ‘भक्तवत्सल’ अवस्था आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्या साधकासाठी नामजपादी उपाय केल्यामुळे त्याचा त्रास अल्प कालावधीत न्यून होतो. परिणामी त्या साधकाला साधना करणे सुलभ जाते.

१ अ २. प्रीतीमय अवस्था : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे साधना करणार्‍या साधकांवर निरपेक्ष प्रेम आहे. त्यामुळे ते साधकाचे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी प्रयत्नरत रहातात. ही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची साधकांवरील ‘प्रीतीमय अवस्था’ आहे.

१ अ ३. प्रारब्धानुरूप उपाय : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकासाठी नामजपादी उपाय करतांना त्या साधकाची साधनेची ‘तळमळ’ आणि ‘भाव’ हे घटक महत्त्वाचे ठरतात, तसेच त्या वेळी साधकाचा ‘प्रारब्ध’ हा घटकही महत्त्वाचा ठरतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी केलेल्या नामजपादी उपायांची परिणामकारकता त्या साधकाच्या प्रारब्धावरही अवलंबून असते. त्यामुळे या उपायांना ‘प्रारब्धानुरूप उपाय’, असे म्हटले आहे. त्या ‘साधकाची साधना आणि त्याचे प्रारब्ध’, यानुरूप त्याचा जेवढा त्रास न्यून व्हायचा असेल, तेवढा न्यून होतो. काही प्रसंगी साधकाचे तीव्र प्रारब्ध असते, तेव्हा गुरुकृपेमुळे त्याचा त्रास न्यून होतो.

१ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधकांना व्यक्तीशः उपयुक्त असे उपाय सांगणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर काही प्रसंगी साधकाच्या आध्यात्मिक त्रासावर प्रत्यक्ष नामजपादी उपाय न करता त्या साधकाला ‘विशिष्ट नामजप, न्यास आणि मुद्रा शोधून देणे, प.पू. भक्तराज महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतील भजने ऐकायला सांगणे, रिकाम्या खोक्यांद्वारे आकाशतत्त्वाचे उपाय करण्यास सांगणे, साधकाला झोपण्यापूर्वी स्वतःभोवती सनातन-निर्मित नामपट्ट्यांचे मंडल काढण्यास सांगणे’ इत्यादी उपाय सांगतात. त्याला ‘नैमित्तिक उपाय’, असे म्हणतात. साधकाचा विशिष्ट त्रास न्यून होण्यासाठी विशिष्ट उपाय विशिष्ट काळासाठी सांगणे याला ‘नैमित्तिक उपाय’, असे म्हणतात.

१ आ १. नैमित्तिक उपायांचे महत्त्व

१ आ १ अ. प्रारब्धाचा जोर न्यून होणे : जेव्हा साधकाचा त्याने मागील जन्मात केलेल्या वाईट कर्मांचा दोष उफाळून येतो, तेव्हा त्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पीडा होत असते. अशा वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या साधकाला ‘ती पीडा सहन करता यावी आणि तो दोष लवकर दूर होऊन त्याची साधना चांगली व्हावी’, यासाठी विशिष्ट उपाय सांगतात. त्यामुळे साधकाच्या प्रारब्धाचा जोर अल्प कालावधीत न्यून होण्यास साहाय्य होते.

१ आ १ आ. वाईट शक्तींचा जोर न्यून होणे : काही साधकांची योग्य प्रकारे साधना होत असते. तेव्हा वाईट शक्ती चिडून त्या साधकांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. त्यामुळे त्या साधकांच्या त्रासांत अकस्मात् वाढ होते. त्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या विशिष्ट उपायामुळे त्या साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींचा जोर न्यून होतो. परिणामी त्या साधकांचा त्रास अल्प कालावधीत न्यून होतो.

१ इ. त्रास होत असलेला साधक स्वतः उपाय करण्यास सक्षम नसल्याने त्याला अत्तरासारख्या वस्तू किंवा व्यक्तीशः वापरण्यासाठी संतांच्या हस्तलिखितासारख्या काही वस्तू दिल्याने त्याचा त्रास दूर होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना कधीकधी साधकाला आध्यात्मिक त्रास होत असतांना त्याच्यासाठी नामजपादी उपाय करण्याची प्रेरणा होत नाही, तसेच त्या वेळी तो साधक स्वतः काही उपाय करण्यास सक्षम नसतो. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या साधकाला ‘सनातन-निर्मित अत्तर किंवा कापूर लावण्यास सांगणे किंवा संतांचे हस्तलिखित उपायासाठी देणे’, अशा कृती करतात. त्याला ‘वस्तू निर्देश’, असे म्हणतात. ‘वस्तू’ याचा अर्थ ‘सात्त्विक वस्तू’ आणि  ‘निर्देश’ याचा अर्थ ‘सूचित करणे’, असा होतो. संतांनी साधकाला सात्त्विक वस्तू उपायांसाठी वापरण्याविषयी सांगणे, याला ‘वस्तू निर्देश करणे’, असे म्हणतात.

१ इ १. उपायांसाठी अत्तर आणि कापूर यांचा उपयोग केल्याने वाईट शक्तीने पसरवलेली दुर्गंधी न्यून होणे : साधकाला त्रास देणार्‍या काही वाईट शक्तींमधील काळी शक्ती दुर्गंधीयुक्त असते. अशा साधकाने ‘अत्तर आणि कापूर यांचा गंध घेणे, अत्तर अंगाला लावणे किंवा कापराची पूड अंगाला लावणे’, असे आध्यात्मिक उपाय केल्यास त्या वाईट शक्तीची दुर्गंधी लगेच न्यून होते. त्यामुळे त्या वाईट शक्तीचा जोर लगेच न्यून होतो.

१ इ २. संतांचे हस्तलिखित जवळ ठेवल्याने वाईट शक्तींनी साधकाच्या अनाहतचक्राच्या जवळ काळ्या ढगांप्रमाणे जमवलेली त्रासदायक शक्ती न्यून होऊ लागणे : वाईट शक्तीच्या सूक्ष्मातील आक्रमणांमुळे साधकाच्या अनाहतचक्राच्या जवळ काळ्या ढगांच्या आकाराप्रमाणे त्रासदायक शक्ती जमलेली असते. त्यामुळे साधकाला प्राधान्याने मानसिक स्वरूपाचे त्रास तीव्रतेने होतात. त्यामुळे त्याला दडपण येते. त्याने संतांचे हस्तलिखित जवळ ठेवल्यास त्या लिखाणातील चैतन्यामुळे साधकातील त्रासदायक शक्ती न्यून होऊ लागते. त्यामुळे साधकाच्या मनावरील दडपण अकस्मात् न्यून होऊ लागते.

१ ई. साधकांनी स्वतःचे त्रास सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सांगितल्यावर त्या साधकांचे त्रास आपोआप न्यून होणे : जेव्हा एखादा साधक स्वतःला होणारे त्रास सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सांगतो, तेव्हा त्याची तळमळ आणि गुरूंप्रतीचा भाव सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांपर्यंत पोचतो. तेव्हा त्या साधकावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची कृपादृष्टी पडते. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहातील चैतन्य त्या साधकाच्या दिशेने प्रक्षेपित होते. त्या चैतन्यामुळे त्या साधकाचे त्रास न्यून होऊ लागतात. याला गुरूंची साधकावरील ‘अमृतदृष्टी’, असेही म्हणतात.

२. समष्टी स्तरावरील उपाय सांगण्याची कारणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर कधीकधी सर्वत्रच्या साधकांना सामाईक नामजपादी उपाय सांगतात. त्याची कारणे पुढे दिली आहेत.

२ अ. काळाची प्रतिकूलता : काळाची प्रतिकूलता असल्याने साधकांना ‘साधना करणे किंवा अध्यात्मप्रसाराचे कार्य करण्ो’, यांत अनेक अडथळे निर्माण होतात.

२ आ. वाईट शक्तींच्या सूक्ष्मातील आक्रमणांचे स्वरूप : सप्तपाताळांतील काही मोठ्या वाईट शक्तींचे सर्व साधकांवर एकत्रितपणे सूक्ष्मातून आक्रमणे करण्याचे नियोजन असते.

२ इ. साधकांना होणार्‍या त्रासांचे स्वरूप : सप्तपाताळांतील काही मोठ्या वाईट शक्तींना प्रतिकूल काळाची साथ मिळत असते. त्यामुळे त्या काळात सर्वच साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या त्रासांत पुष्कळ वाढ होण्याची शक्यता असते. याचे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अंतर्ज्ञान होते. तेव्हा ते साधकांना ‘काही काळ वाईट शक्तींपासून स्वतःचे रक्षण व्हावे’, यासाठी विशिष्ट काळ विशिष्ट जप करण्यास सांगतात. त्यामुळे साधकांचे रक्षण होऊन त्यांची साधना आणि धर्मकार्य सुरळीतपणे चालू रहाते.

३. काळाच्या स्तरावरील उपायामागील शास्त्र

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांना कधीकधी कोणताही उपाय न सांगता त्यांना ‘काही घंट्यांनी त्रास न्यून होईल’, असे सांगतात आणि त्याप्रमाणे त्या साधकाचा त्रास न्यून होतो. त्याचे कारण पुढे दिले आहे.

३ अ. ‘प्रतिकूल काळ आणि प्रतिकूल प्रारब्ध’, यांमुळे साधकाने काही वेळ त्रास भोगणे अपरिहार्य असणे : साधकाला काही काळ साधनेसाठी प्रतिकूल असतो, तेव्हा त्याचे प्रारब्ध प्रतिकूल असते. अशा प्रसंगी साधकाला कुठलाही उपाय लागू पडत नाही. त्याने तेवढा काळ त्रास सहन करणे, एवढेच त्याच्या हातात असते. त्या साधकाविषयीचे सूक्ष्म गणित सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना अंतर्ज्ञानाने समजते. तेव्हा ते साधकाला ‘काही घंट्यांनी त्रास न्यून होईल’, असे सांगतात. तो प्रतिकूल काळ आणि प्रारब्ध भोगण्याची वेळ संपली की, त्या साधकाचे त्रास आपोआप न्यून होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या साधकाला त्रासाच्या कालावधीत त्रास सहन करण्याची शक्ती देतात. अशा प्रसंगी साधकासाठी ‘विशिष्ट काळ संपणे’, हाच उपाय असतो.

४. कालातीत स्तरावरील उपाय 

जेव्हा साधक सतत आत्मानंदात किंवा ईश्वरी आनंदात असतो, तेव्हाच तो कालातीत होऊ शकतो. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांत सतत आनंदी रहाणार्‍या जिवाला ‘कालातीत अवस्था’ प्राप्त होते. त्याला काळाचे कुठलेही बंधन रहात नाही. साधकासाठी कालातीत स्तरावरील उपाय पुढे दिले आहेत.

४ अ. अखंड नामसाधना करणे : त्रास असलेल्या साधकाला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांच्या पलीकडे जाण्यासाठी ‘अखंड नामजप करणे’, हा कालातीत उपाय आहे. ‘साधकाचा नामजप होऊ नये’, यासाठी वाईट शक्ती सर्वतोपरी प्रयत्न करत असतात; परंतु साधकाने गुरूंवर श्रद्धा ठेवत सतत निश्चयाने नामजप केल्यास ‘प्रतिकूल काळ आणि प्रतिकूल प्रारब्ध’, यांचा त्या साधकावरील परिणाम न्यून होऊ लागतो. पुढे अखंड नामजपाने साधकाला त्रास देणार्‍या वाईट शक्तींचा जोर न्यून होऊन कालांतराने साधकाचा त्रास संपुष्टात येतो. असा साधक कालातीत होतो.

४ आ. गुरुकृपायोगानुसार निरंतर साधना करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी निर्मिलेल्या गुरुकृपायोगानुसार निरंतर साधना केल्याने साधकाचे तन आणि मन यांची शुद्धी होऊ लागते. अशा साधकावर गुरूंची कृपा होते. गुरुकृपायोग हा सत्य, शाश्वत आहे आणि चिरंतन आनंद देणारा आहे. साधकाने मनोभावे सतत गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास त्याचे प्रतिकूल प्रारब्ध दूर होते. अशा साधकावर कुठल्याच प्रतिकूलतेचा प्रभाव पडत नाही. ‘गुरुकृपायोगानुसार निरंतर साधना करणे’, हा साधकांसाठी कालातीत उपाय आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २६.१.२०२६, वेळ : सकाळी १०.२०, कालावधी : ३० सेकंद)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.