
१. मंदिराचे व्यवस्थापन स्थानिक भाविकांकडे असण्याचे महत्त्व
‘मी गेल्या ३५ वर्षांपासून श्री जीवदानीदेवीच्या मंदिराचे व्यवस्थापन पहात आहे. ५ सहस्र लोकसंख्या असलेल्या एका गावातील डोंगरावर ७०० फूटांहून अधिक उंचीवर हे मंदिर आहे. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपये होते, तेव्हापासून आम्ही या मंदिराच्या विकासाचे कार्य हाती घेतले आहे. या मंदिराच्या जीर्णाेद्धाराचा व्यय ठरवण्यासाठी मी माझ्या बांधकाम तज्ञ असलेल्या मित्राशी चर्चा केली. त्याने ३० वर्षांपूर्वी हा व्यय १५ कोटी रुपये सांगितला होता. आमच्या मंदिराचे उत्पन्न पहाता एवढा व्यय कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला; पण हेच काम आम्ही केवळ साडेपाच कोटी रुपयांमध्ये पूर्ण केले. हे केवळ स्थानिक भाविकांची मंदिराशी असलेल्या आपुलकीमुळे शक्य झाले. त्यामुळे मंदिरे सरकारकडे न देता स्थानिक भाविकांनीच चालवली पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवले.

२. खोबर्याच्या वडीपासून मंदिराला वार्षिक अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न
देवीच्या मंदिरात नारळ मोठ्या प्रमाणात अर्पणात येत होते. बहुतेक मंदिरे अशा नारळांची विक्री करतात. त्यामुळे ते नारळ परत परिसरातील दुकानदारांकडे पोचतात आणि फिरून मंदिरातच येतात. ही साखळी खंडित करण्यासाठी आम्ही ‘नारळाची वडी’ प्रसाद म्हणून बनवणे चालू केले. त्याची ‘भारतीय खाद्य निगम’मध्ये अधिकृत नोंदणी केली. पूर्वी वर्षाला ६ लाख नारळ विकून मंदिराला ६६ लाख रुपये मिळायचे. आता त्याच नारळांच्या वडीपासून मंदिराला प्रतिवर्षी अडीच कोटी रुपये मिळू लागले.
३. भाविकांना मंदिरात पोचण्यासाठी ‘फ्युनिक्युलर रेल्वे’चा प्रकल्प
श्री जीवदानी मंदिर हे ७०० फूट उंचीवर आहे. तेथे पोचण्यासाठी भक्तांना १ सहस्र ४०० पायर्या चढून जावे लागते. सर्वांनाच हे शक्य नसते. त्यामुळे विश्वस्त मंडळासमोर ‘फ्युनिक्युलर रेल्वे’चा प्रस्ताव ठेवला. (या रेल्वेसाठी रेल्वेप्रमाणे ट्रॅक करून त्यावरून छोट्या बोगीने भाविकांना घेऊन जातात. या बोगी बळकट लोखंडी दोरखंडाद्वारे विद्युत् शक्तीने ओढल्या जातात.) विश्वस्त मंडळाने तो मान्य केला. त्यानुसार वर्ष २००४ मध्ये कंत्राटदाराशी करार केला; पण त्याने १३ वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे विश्वस्त मंडळाने त्याला काढले आणि हा प्रकल्प स्वतःच करायचे ठरवले. त्यानुसार ‘फ्युनिक्युलर रेल्वे’चे काम वर्ष २०१९ मध्ये चालू केले. यापूर्वी राज्य सरकारने वणी (यवतमाळ) येथील श्री सप्तश्रृंगी मंदिराचा अनुमाने २०० मीटर लांबीचा प्रकल्प पूर्ण केला होता. त्याची क्षमता एकूण ६० जणांची होती आणि त्याला १० वर्षे लागली होती. श्री जीवदानी मंदिराने १०० जणांच्या क्षमतेची ‘फ्युनिक्युलर रेल्वे’ बनवली. त्यासाठी भाविकांनी सढळ हस्ते अर्पण दिले. त्यामुळे मंदिराकडे जमा होत असलेले अर्पण आणि कर्ज मिळून आम्ही केवळ अडीच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्हाला केवळ ३२ कोटी रुपये व्यय आला. या प्रकल्पासाठी घेतलेले १७ कोटी रुपयांचे कर्ज देवीच्या कृपेने २ वर्षांत फेडता आले. ही सनातन धर्म आणि भक्त यांची शक्ती आहे. त्यामुळे मंदिर विश्वस्तांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या मंदिराचा विकास करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे.
५० रुपयांमध्ये ‘डायलिसिस’ करून देणारे केंद्र![]() श्री जीवदानी मंदिराच्या वतीने ‘डायलिसिस सेंटर’ चालू केले. (‘डायलिसीस’ म्हणजे मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया) या ठिकाणी केवळ ५० रुपयांमध्ये रुग्णांचे ‘डायलिसिस’ होते. चांगले काम करत असतांना आपल्यासारख्या अन्य संस्थाही आपल्याशी जोडल्या जातात आणि ते कार्य सोपे होते. – श्री. प्रदीप तेंडोलकर |
४. सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन
प्रत्येक मंदिराचे काहीतरी वैशिष्ट्य असते, ते आपल्याला शोधता आले पाहिजे. आपल्या मंदिराचे उत्पन्न अधिकाधिक भाविकांच्या हितासाठी वापरण्याचा प्रयत्न झाला पहिजे. आम्ही वर्षातून २ वेळा (आदिवासी आणि जीवदानी मंदिराच्या क्षेत्रात) सामूहिक विवाह सोहळे आयोजित करतो. या कार्यासाठी एकेक करून अनेक व्यावसायिकांनी साहाय्य करण्याची सिद्धता दाखवली. त्यांनी साहित्याचे दान देणे चालू केले. त्यातून अशा कार्यात स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व कळले. अशा प्रकारे आतापर्यंत आम्ही अनुमाने १ सहस्र ५०० हून अधिक लोकांचे सामूहिक विवाह केले आहेत आणि हे कार्य अद्यापही चालूच आहे.
५. शाळेच्या माध्यमातून ३ सहस्र विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ
श्री जीवदानी मंदिर विश्वस्त मंडळाने शाळेची स्थापना केली. त्या माध्यमातून आतापर्यंत ३ सहस्रांहून अधिक विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. आता ७ सहस्र विद्यार्थ्यांची क्षमता असलेली नवीन शाळा उभारत आहोत. सरकारला शक्य नसेल, तर लोकांना चांगले शिक्षण देण्याचे दायित्व आपले आहे.
६. दुर्लक्षित दत्त मंदिराचा जीर्णाेद्धार
आमच्या गावात एक दत्त मंदिर होते. त्या मंदिराकडे परिसरातील लोकांनी दुर्लक्ष केले होते. श्री जीवदानी मंदिर विश्वस्त मंडळाने हे मंदिर सांभाळण्यासाठी घेतले. त्यासाठी आम्ही आमच्या मंदिराकडे पुष्कळ दिवसांपासून असलेली ८ लाख रुपयांची चांदी विकली आणि त्या मंदिराचा जीर्णाेद्धार केला. अशा प्रकारे आपण मंदिरात विनावापर असलेल्या वस्तूंचा चांगल्या कामासाठी करू शकतो.
७. महोत्सवातील गर्दी नियंत्रणासाठी ‘एन्.सी.सी. कॅडेट’चे साहाय्य
मंदिराचे कोणतेही उत्सव साजरे करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. महोत्सवाच्या वेळी गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी आम्ही आमच्या परिसरात असलेल्या शाळा-महाविद्यालयांतील ‘एन्.सी.सी. कॅडेट’चे (राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचे) साहाय्य घेतो. त्यामुळे मंदिराचा पैसा वाचवता येतो.
८. प्राणीबळी प्रथेला प्रतिबंध
आमच्या मंदिरात प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा होती. आपण सनातन धर्मीय असल्याचे जीव घेत नाही, तर जीवदान देतो. त्यामुळे आम्ही ही प्रथा बंद करायचे ठरवले. याविषयी आम्ही लोकांमध्ये जागृती केली. त्यामुळे ७५ टक्के लोकांनी प्राण्यांचा बळी देणे बंद केले.
– श्री. प्रदीप तेंडोलकर, अध्यक्ष, श्री जीवदानीदेवी संस्थान, विरार, पालघर.

Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !