
१. संस्कृती आणि धर्म म्हणजे काय ?
भारतीय संस्कृतीला सहस्रो वर्षांची परंपरा आहे. अगदी वेदकाळापासून आजपर्यंत ती चालत आली आहे. काळानुसार त्यात काही पालट झाले असले, तरी ते बाह्य स्वरूपाचे आहेत. मूळ तत्त्व तेच आहे. बर्याच वेळा संस्कृती आणि धर्म या शब्दांत गल्लत केली जाते. ‘संस्कृती’ हा शब्द व्यापक आहे. संस्कृती म्हणजे उत्कृष्ट आचरण करून अर्थपूर्ण जीवन कसे जगावे, याचे केलेले मार्गदर्शन ! धर्म, अध्यात्म आणि त्यातून होणारे संस्कार हे त्याचे घटक आहेत. ‘धर्म म्हणजे केवळ पूजापाठ वा केलेली विविध धार्मिक कृत्ये’ असा संकुचित अर्थ नाही, तर धर्म म्हणजे सदाचार, सद्विचार, नीती, कर्तव्य आणि सत्य यांचे केलेले पालन ! अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आतील अस्तित्वाचा शोध घेणे !

२. पुरोहित : तत्कालीन आणि आजचे !
प्राचीन काळात तत्कालीन ऋषिमुनी अखंड ज्ञानसाधना आणि तपश्चर्या करून समाजाला दिशादर्शन करत. प्रसंगी राजालासुद्धा ‘राजधर्म पाळा’, अशी तंबी देत. एका अर्थाने ते तत्कालीन समाजाचे पुरोहितच होते. माझ्या मते ‘आजचे पुरोहित हे त्याच स्वरूपाचे; पण आजच्या काळाला अनुसरून समज आणि दृष्टीकोन असलेले असावेत’, असे वाटते.
३. ‘पुरोहित’ शब्दाचा अर्थ आणि पुरोहितांचे कार्य
‘पूजा सांगणारे आणि धर्मकृत्य करणारे ते पुरोहित,’ असा ‘पुरोहित’ या शब्दाचा संकुचित अर्थ घेतला जातो; पण त्याचा अर्थ व्यापक आहे. माझ्या माहितीप्रमाणे ‘पुरोहित’ हा संस्कृत शब्द असून ‘पुर’ आणि ‘हित’ अशी त्याची फोड होते. ‘पुर’ म्हणजे समाज आणि ‘हित’ म्हणजे कल्याण ! समाजाचे हित साधणारे, शुभ चिंतणारे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे ते पुरोहित ! ‘आजच्या काळात पालटत्या परिस्थितीमुळे ब्रह्मतेज काहीसे झाकोळले आहे. त्याला पुन्हा ते तेज प्राप्त करून देण्यासाठी समस्त ब्रह्मवृंदाने आत्मचिंतन करून त्यात आवश्यक ते पालट करावेत’, असे मला वाटते.
मंदिरातील पुजारी मंदिराचे आध्यात्मिक वैभव वृद्धींगत करणारे असावेत !

‘मंदिर हे समष्टी स्तरावरील (सामाजिक स्तरावरील) उपासनेचे आणि चैतन्य प्रक्षेपणाचे केंद्र असते. त्यामुळे त्या मंदिराचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ होण्यासाठी कारणीभूत ठरणार्या विविध घटकांपैकी मंदिरातील पुजारी हे एक महत्त्वाचा घटक असतात.
मंदिरातील पुजारी त्या देवतेसाठीचे पूजाउपचार आदी किती भावपूर्ण करतात, यावरही मूर्तीतून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचे प्रमाण अवलंबून असते. त्याचसमवेत ते पुजारी मंदिरात येणार्या भक्तांना त्या देवतेच्या चैतन्याचा अधिकाधिक लाभ व्हावा, या उद्देशाने किती तळमळीने प्रयत्न करतात, यावर त्या मंदिराचा आध्यात्मिक स्तरावरील लाभ ठरतो. एकूणच मंदिराचे आध्यात्मिक वैभव मंदिरातील पुजार्यांची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांवर अवलंबून असते. यासाठी मंदिरातील पुजारी हे चांगली साधना करणारेच असावेत !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
४. यजमानांच्या संदर्भातील पुरोहितांचे दायित्व !
४ अ. भक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल, अशी कृती पुरोहितांनी करू नये ! : पुरोहित किंवा सामान्यतः ज्यांना ‘भटजी’ असे संबोधले जाते, त्यांच्याविषयी समाजात आदराची भावना असते. केवळ ती वृद्धींगत होण्याची काळजी घेतली पाहिजे. पुरोहित हा देव आणि भक्त यांच्यामधील दुवा आहे. ‘भटजींना दिले की, ते देवाला पोचते’, अशी भक्ताची भावना असते. ‘स्वतःला देवाकडे मागणे करता येत असतांनाही ते भटजींनी करावे, म्हणजे ते देव ऐकतो’, अशी भक्तांची श्रद्धा असते. भक्तांच्या या श्रद्धेला तडा जाईल, अशी कोणतीही कृती घडता कामा नये.
४ आ. यजमानांच्या अयोग्य मानसिकतेवर पुरोहितांनी खंबीर भूमिका घ्यावी ! : सध्या यजमानांनाही वेळ नसल्याने बरेच जण ‘भटजी, तुमचे काय ते लवकर आवरा’, असे सांगतात. भटजी काय सांगतात, यापेक्षा छायाचित्रे काढण्याला अधिक महत्त्व देणारेही यजमान असतात; पण मला वाटते, ‘पुरोहितांनी यासंदर्भात थोडी खंबीर भूमिका घ्यायला हवी.’ ‘विधी चालू असतांना मध्ये कुणाचीही लुडबूड चालणार नाही’, अशी स्पष्ट सूचना प्रारंभीच द्यावी. समाजाला शिस्त लावणे, हे पुरोहितांचे आद्यकर्तव्य आहे. सर्वच पुरोहितांनी अशी भूमिका घेतल्यास समाज तिचे नक्की स्वागत करील !
४ इ. एखादे सूत्र अती ताणू नये ! : एखाद्या यजमानाला एखादे धर्मकृत्य करण्याची इच्छा असते; पण पूजासाहित्य, दक्षिणा इत्यादींचा खर्च त्याला परवडण्यासारखा नसतो. अशा वेळी ताणून धरू नये. भटजींचे आशीर्वाद आणि यजमानांचे समाधान याची सांगड घालता आली पाहिजे.
५. पुरोहितांविषयी समाजाचे दायित्व !
पुरोहित किंवा भटजी हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. माणसाच्या जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक संस्कारात भटजींची आवश्यकता असते. भटजी त्यांची सनातन परंपरा आणि संस्कार एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित करतात; म्हणूनच समाजाने त्यांचा योग्य तो मान अन् भटजींनीही स्वतःचा आब (आदर) राखावा.
६. पुरोहितांनी मंत्रपठण कसे करावे ?
पौरोहित्य करतांना त्यांनी ते ‘तन्मयतेने आणि देवाची सेवा करत आहे’, या भावाने करावे, अशी अपेक्षा असते. ‘पौरोहित्यातून उपजीविका व्हावी’, हे नक्कीच अपेक्षित आहे; पण केवळ उपजीविकेचे साधन या भावनेने त्याकडे पाहू नये. मंत्रोच्चार करतांना ते गतीने न करता स्पष्ट शब्दांत आणि यजमानाला व्यवस्थित ऐकू येतील, अशा पद्धतीने करावेत. एखादा मंत्र म्हटल्यानंतर त्याचा अर्थ आणि त्याची फलनिष्पत्ती हेही यजमानाला समजावून सांगावे. मंत्रपठण करून केवळ ‘आचमन करा, अक्षता वहा’, असे सांगितले, तर यजमान ते यांत्रिकपणे करतो. कृतींमागील अर्थ त्याला समजत नाही. त्यामुळे त्या विधीमागचा हेतूही साध्य होत नाही.
सप्तपदी म्हणजे केवळ ७ फेरे घालणे नव्हे, तर प्रत्येक फेरीला नववधू-वर एकमेकांना काही वचने देत असतात. त्यांच्या कर्तव्याची जाणीव त्यातून करून दिलेली असते. हे सर्व नीट समजावून सांगितल्यास त्यांना दायित्वाची जाणीव होते.
७. सतत अभ्यासमग्न रहावे !
पाठशाळेत घेतलेल्या ज्ञानावर संतुष्ट न रहाता वेळ असेल, तेव्हा वेद, उपनिषदे, पुराणे, संहिता यांसारख्या विषयांचा अभ्यास करावा. विविध मंत्रांचा वा विधींमागील अर्थ, उद्देश किंवा त्यामागे असणारा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेण्याचा प्रयत्न करावा. विविध ग्रंथांतील मंत्र हे तत्कालीन परिस्थितीला अनुसरून रचले आहेत. त्यातील मर्म लक्षात घेऊन त्याची आधुनिक काळाशी सांगड कशी घालता येईल, याचा विचार करावा.
८. पुरोहितांचे वर्तन कसे असावे ?
पुरोहित समाजासाठी आदर्श असतो. त्यामुळे आचार, विचार, समाजातील वावर या संदर्भात विशेष दक्षता घ्यायला हवी.
अ. पुरोहितामध्ये सदाचार, नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, नम्रता आणि संयम हे गुण असावेत.
आ. काही वेळा समाजातील अज्ञानी लोकांकडून अपमानास्पद टीकाटिपणी ऐकायला मिळते. अशा वेळी ‘त्या लोकांची योग्यता तितकीच आहे’, हे लक्षात घेऊन संयम बाळगावा.
इ. गरीब, श्रीमंत, लहान, मोठा, जात, धर्म यासंदर्भात भेदभाव न करता सर्वांशी समान आणि आदरपूर्वक वर्तणूक असावी.
ई. अंगभर स्वच्छ पोशाख, प्रसन्न चेहरा आणि मृदू वाणी असावी. यामुळे समोरील व्यक्तीच्या मनात आदर निर्माण होतो.
उ. पुरोहितांमध्ये अहंकार किंवा उद्धटपणा नसावा. त्यांचा स्वभाव रागीट नसावा.
ऊ. यजमानाला एखादी गोष्ट समजली नाही, तर त्याची हेटाळणी न करता सौम्य शब्दांत त्याला समजावून सांगावे. त्यामुळे आपुलकी निर्माण होते.
ए. अर्वाच्च किंवा असंसदीय (अशोभनीय) भाषा टाळावी. जात, धर्म, लिंग यांवरून टीकाटिपणी करू नये.
९. ‘पौरोहित्य’ हा धंदा नव्हे, तर ही साधना आहे’, हे लक्षात घ्या !
‘पुरोहितांनी विशेष दक्षता घ्यायला हवी’, असे मला वाटते. ‘पौरोहित्य ही साधना आहे’, हे लक्षात घ्यावे. याचा अर्थ ‘ती फुकट द्यावी’, असे कुणीही म्हणणार नाही. काही अपवाद वगळता कोणताही यजमान त्याच्या परीने योग्य ते मानधन देण्याचा प्रयत्न करतोच; पण त्याला अगदीच व्यावसायिक स्वरूप आणू नये. पौरोहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिक दायित्व आहे. त्यामुळे त्याचा धंदा करू नये. एकापेक्षा अधिक कामे घ्यायला हरकत नाही.
१०. पुरोहितांनी व्यसनाधीन होऊ नये !
अपेयपान (मद्य) आणि अभक्ष्य भक्षण (मांस) यांपासून पुरोहितांनी कटाक्षाने दूर राहिले पाहिजे. पुरोहित शक्यतो निर्व्यसनी असावा; पण तंबाखूसारखी एखादी सवय असेल, तर किमान धर्मकृत्ये करतांना तरी ती दिसू नये. तंबाखूची गोळी तोंडात ठेवून रुद्रपठण करतांना पाहिल्यास पुरोहितांविषयीचा आदरभाव आणि धर्मकर्मातील सात्त्विकता नाहीशी होऊन अप्रसन्नता निर्माण होते.
११. अनुष्ठानाचे पावित्र्य कसे राखावे ?
काही अनुष्ठानांमध्ये एकापेक्षा अधिक पुरोहित लागतात. त्याच्यातील एखादा पुरोहित क्रमानुसार मंत्रपठण करतो. अशा वेळी अन्य पुरोहितांनी तो मंत्र मनातल्या मनात म्हणावा, किमान शांतपणे तो ऐकावा, एवढे तरी अपेक्षित असते. अशा वेळी अन्य पुरोहित एकमेकांशी गप्पा-गोष्टी करत असतात किंवा भ्रमणभाष बघतात, हे मनाला खटकते. एकूणच अनुष्ठानातून पावित्र्य, सात्त्विकता आणि मानसिक समाधान मिळावे, अशी अपेक्षा पूर्ण होत नाही.
मी पौरोहित्यातील अधिकारी व्यक्ती नाही; परंतु एक श्रद्धावान या नात्याने पुरोहित आणि पौरोहित्य यासंबंधीचे काही विचार मांडले आहेत. ते सगळेच योग्य असतील, असे नाही किंवा ते सर्वांनाच पटावेत, असा माझा आग्रहही नाही; पण ते प्रामाणिक आहेत, हे नक्की !
– श्री. मनोहर जोशी, फोंडा, गोवा.(५.११.२०२५)
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
Baglamukhi Mandir Online Fraud : मध्यप्रदेशातील माँ बगलामुखी मंदिरात हवन आणि पूजा करण्याच्या नावाखाली भाविकांची ऑनलाईन फसवणूक