आज भारतातील अनेक कुटुंबे वाढदिवस, विविध दिवस (डे) साजरे करतांना, तसेच काही विशेषप्रसंगी जेवण, केक, सजावट यांवर पूर्वीपेक्षा अधिक व्यय करतात, हे १० मे या दिवशी ‘मदर्स डे’ (मातृदिन)च्या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले. ‘स्विगी’सारख्या खाद्यपदार्थ पोचवणार्या एका ऑनलाईन आस्थापनावर भारतीय ग्राहकांनी या दिवशी अनुमाने ७७ कोटी रुपये व्यय केले. घरपोच पदार्थ वितरण करण्यात अग्रेसर असलेल्या ‘स्विगी’ने ही आकडेवारी घोषित केली. यातून भारतियांनी ‘आई दिवस’ साजरा करण्यासाठी ‘आई’ला विश्रांती म्हणून जेवण, मिठाई घरी मागवली, हे लक्षात आले. काहींनी हॉटेलमध्ये जाऊन जेवण्यावर व्यय केला. सायंकाळी अवघ्या एका घंट्यांत ऑनलाईन अनुमाने ३० सहस्र, तर दिवसभरात प्रतिघंटा १३ सहस्र ३९ केक वितरीत झाले. आईला विश्रांती देण्याची कल्पना चुकीची आहे, असे नाही; परंतु नेहमीच आईला कामात साहाय्य करणे, ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, हे मुलांनी लक्षात घेतले पाहिजे.
सध्या ‘मदर्स डे’, ‘फादर्स (वडील) डे’, ‘पॅरेंट्स (पालक) डे’ आदी दिवस साजरे करण्याची मोठी चढाओढ लागलेली दिसून येते. सामाजिक माध्यमांद्वारे याचा प्रसार होतो. ‘या माध्यमातून आम्ही पालकांविषयी प्रेम, आदर व्यक्त करत असतो’, असा एक तरुणांचा सूर आहे. हिंदूंनी ‘हॅप्पी मदर्स डे’चा समाजमाध्यमांवर आईला शुभेच्छा देऊन आणि कोट्यवधी रुपये व्यय करून समाधान व्यक्त केले ! मुळात आपल्याकडे अशा प्रकारे आईचा दिवस साजरा करावा लागण्याची वेळ यावी, हीच शोकांतिका आहे. विदेशात मुले थोडी मोठी झाली की, स्वतंत्र रहातात आणि या दिवसाच्या निमित्ताने पालकांना भेटून पुष्पगुच्छ देतात. अजून एवढी वेळ सुदैवाने आपल्याकडे सरसकट आलेली नाही. पालकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विदेशी पार्श्वभूमी असलेल्या या दिवसांच्या पद्धतीची खरेच आवश्यकता आहे का ? असे एक दिवसाचे प्रेम व्यक्त करून आणि एका दिवसात एवढे रुपये व्यय करून काय साध्य होणार आहे ? असा प्रश्न पडतो. पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करतांना निदान आपल्याला याची आवश्यकता आहे का ? कि नेमका यातील मतितार्थ घेऊन आपण काय करायला हवे ? एवढा तरी सारासार विचार करणे आवश्यक आहे; पण आपण त्यांच्या विचारांचे एवढे ‘गुलाम’ झालो आहोत की, ते ज्या प्रकारे काही साजरे करतील, त्याच्या मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता आपण ते साजरे करायला लागतो. याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. जे असे ‘डे’ साजरे करत नाहीत, त्यांना कालबाह्य (आऊटडेटेड) आहेत, असे समजले जाते. हे तर अजून हास्यास्पद आहे. भारतीय संस्कृतीचे आचरण करून पालकांना खरा आदर देणे, त्यांची सेवा करणे, हे खरे आवश्यक आहे. केवळ वर्षातून एक दिवस साजरा करून काय उपयोग ?
– श्री. नीलेश पाटील, जळगाव


क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !