(म्हणे) ‘सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे !’ – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे

विकास लवांडे यांचा कांगावा !

पत्रकार परिषदेत विकास लवांडे

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी येथील पत्रकार परिषदेत हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ‘माझ्या जिवाला आणि कुटुंबाला धोका असून सरकार माझ्या हत्येची वाट पहात आहे का ? मुख्यमंत्र्यांकडे २ वेळा मागणी करूनही संरक्षण मिळाले नाही’, असा कांगावा त्यांनी केला.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या अपकीर्तीचा प्रयत्न !

पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत संघटनांमध्ये तरुण मुलांचे ‘ब्रेनवॉश’ (बुद्धीभेद) केले जात आहे. समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे. (धर्मशिक्षण देऊन हिंदु तरुणांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त करणार्‍या संघटनांवर चिखलफेक करणे, हा लवांडे यांचा हिंदुद्वेषच दर्शवतो ! – संपादक)

लवांडे यांचा जावईशोध !

वारकरी संप्रदायाविषयी ते म्हणाले, ‘‘मूळ वारकरी संप्रदायाचे अपहरण करण्याचा प्रयत्न चालू आहे. संग्राम भंडारे हा वारकर्‍यांच्या वेशातील गुंड असून त्याला कॅबिनेट मंत्री आणि भाजपच्या लोकांचा पाठिंबा आहे. मला पू. संभाजीराव भिडे गुरुजी आणि विश्व हिंदु परिषद यांच्याशी निगडित लोकांकडून धमक्या येत आहेत.’’

पोलिसांच्या कारवाईवर आक्षेप !

वाघोली पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाईला लवांडे यांनी ‘अनधिकृत अटक’ असे संबोधले. ‘शरद पवारांच्या विचारांवर भूमिका मांडल्यामुळे पोलिसांनी मला न्यायालयाच्या आवारातून अटक केली. खोट्या कारवाईविरोधात मी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे’, असे सांगत स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका

राजकीय अपयश आणि न्यून होणारा स्वतःचा जनाधार लपवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् हिंदु नेते यांना असे हिंदुद्रोही सातत्याने लक्ष्य करतात. विकास लवांडे यांची वक्तव्ये म्हणजे प्रसिद्धीसाठी आणि हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी रचलेले षड्यंत्रच आहे, हे सूज्ञ जनता ओळखून आहे.