US Meteor Airburst : अमेरिकेच्या आकाशात तब्बल प्रति घंटा १ लाख २० सहस्र कि.मी. वेगाने आलेल्या उल्कापिंडाचा भीषण स्फोट !

अमेरिकेच्या आकाशात फुटलेल्या उल्कापिंडामुळे झालेले स्फोट !

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या न्यू इंग्लंड भागात ३० मेच्या दुपारी अचानक २ भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. यामुळे मॅसॅच्युसेट्स आणि रोड आयलंड या राज्यांच्या अनेक भागांतील लोकांमध्ये भीती पसरली. तथापि हे स्फोट अमेरिकेच्या आकाशात फुटलेल्या उल्कापिंडामुळे झाल्याचे नंतर समोर आले. अनेक नागरिकांनी सांगितले की, स्फोट इतके जोरदार होते की, त्यांची घरे आणि इमारती हादरल्या.

भीषण स्फोटांमागे हे होते कारण !

अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने स्पष्ट केले की, हे स्फोट कोणत्याही अपघातामुळे किंवा आक्रमणामुळे झाले नाहीत. एका मोठ्या उल्कापिंडाच्या वातावरणात झालेल्या स्फोटामुळे हे स्फोट झाले. साधारण ३ फूट रुंद असलेला हा उल्कापिंड अनुमाने १ लाख २० सहस्र किलोमीटर प्रति घंटा वेगाने पृथ्वीच्या वातावरणात दाखल झाला. मॅसॅच्युसेट्स आणि न्यू हॅम्पशायर यांच्या सीमेवर अनुमाने ६४ किलोमीटर उंचीवर हा उल्कापिंड फुटून विखुरला गेला.

शास्त्रज्ञांच्या मते, या स्फोटातून साधारण ३०० टन टी.एन्.टी.च्या (ट्रिनायट्रोटोल्यूईन – स्फोटक शक्ती मोजण्यासाठीचे प्रमाणक) बरोबरीची ऊर्जा बाहेर पडली. यामुळे प्रखर प्रकाश आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आले.