आपत्काळ पुन्हा येणारच…! आपण सिद्ध आहोत का ?

‘कलियुग, म्हणजे प्रलयकाळ आहे. आम्हालाही डोळे मिटावेसे वाटतील, इतका हा काळ भयंकर असेल’, असे पुष्कळ संतांनी अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले आहे; पण असे असतांनाही इतकी वर्षे या विधानांना हसण्यावारी नेण्यात आले. या संतवचनांची प्रचीती आली ती ‘कोरोना’ महामारीच्या काळात ! प्रत्येकाने भीषण आपत्काळाची झलक अनुभवली. शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि शैक्षणिक अशा स्तरांवर मोठा संघर्ष करावा लागला. यातून बाहेर पडून स्थिरस्थावर होत नाही, तोच रशिया-युक्रेन आणि अमेरिका-इराण यांचे युद्ध चालू झाले. अमेरिका-इराण युद्धामुळे आला पुन्हा आपत्काळ ! हा आपत्काळ थांबणार नाही. न्यूनाधिक प्रमाणात त्याची तीव्रता प्रत्येकाला भेडसावणारच. या पार्श्वभूमीवर दोन्ही संकटांची तीव्रता अधोरेखित करत नागरिकांना पुन्हा एकदा सतर्क करण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे केला आहे.

१. घरी बसून कार्यालयीन कामे करावी लागल्याने शारीरिक त्रासांत वाढ होणे

कोरोना महामारीच्या काळात ‘आपण कशी मौजमजा केली’, ‘कोणते पदार्थ बनवून खाल्ले’, ‘कोरोना महामारीचा काळ मनोरंजनात कसा घालवला’, याचे अजूनही यथेच्छ वर्णन लोक करत असतात. कोरोना महामारी जरी भारतातून संपलेली असली, तरी तिचे दूरगामी परिणाम अजून होतच आहेत. त्यामुळे ‘आपत्काळ संपला’, असे म्हणता येणार नाही. त्या कालावधीत आस्थापनांतील कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना घरून काम करावे लागल्याने त्यांना पुष्कळ मानसिक त्रास झाले. त्यांची शृंखला अजूनही चालूच आहे. अनेकांना कोरोनाच्या काळापासून शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना वेळोवेळी उपचार घ्यावे लागत आहेत. ‘कोरोना तर गेला; पण या त्रासांचे लोढणे किती दिवस बांधून फिरणार ?’, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे.

घरून काम, भ्रमणभाषचे व्यसन

२. लहान मुलांना भ्रमणभाष पहाण्याचे जडलेले ‘व्यसन’

सौ. नम्रता दिवेकर

लहान मुलांना दुसरे कोणतेही उपक्रम नसल्याने ती भ्रमणभाषमध्ये गुरफटू लागली होती. त्यांचे हे गुरफटणे जणू ‘व्यसन’ असल्याप्रमाणेच झाले होते. अजूनही काही पालक म्हणतात, ‘कोरोनाच्या काळापासून माझ्या मुलाला भ्रमणभाष पहायची सवय लागली आणि आता तो त्याच्या अधीन झाला आहे. काय करणार नाईलाज आहे !’, असे सध्याच्या पालकांचे गार्‍हाणे असते. कोरोना गेला; पण भावी पिढी स्वाभिमानाने मान वर करून जगणार तरी कशी ? कारण तिची मानच वाकलेली आहे ना ! याचा देशाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

३. उद्योगधंदे बंद पडून गावाला जावे लागण्याच्या कल्पनेनेच अनेकांना भीती अन् नैराश्य यांनी ग्रासणे

स्थलांतर

दळणवळण बंदीमुळे लाखो कामगार बेरोजगार झाले. खायला-प्यायला काहीच नसल्याने त्यांनी गावाला जाण्याचा मार्ग निवडला. अनेकजण शेकडो किलोमीटर पायी गेले. काहींनी लहान मुलांना खांद्यावर घेतले, तर काहींनी सायकलवरून प्रवास केला. यात अनेकांचे अपघात झाले, काहींनी जीव गमावला. कोरोनानंतर सर्वजण परतले. पूर्वपदावर येत असतांनाच अमेरिका-इराण युद्ध ‘आ’वासून उभे राहिल्याने पुन्हा एकदा गावाला जाण्याची वेळ ओढावली. अशा प्रकारे अनेकांना ‘कोरोना’ आणि ‘युद्ध’ यांचे शिकार व्हावे लागले. ‘कोरोना’ गेला आणि ‘युद्ध’ थांबले; पण आर्थिक हतबलतेमुळे ‘पुन्हा गावाला जावे लागल्यास काय होईल ?’, या कल्पनेनेच त्यांना नैराश्य येते.

४. मानसिक स्वास्थ्य बिघडून वर्षानुवर्षे समुपदेशन घ्यावे लागणे

समुपदेशन

कोरोना महामारीच्या काळात प्रतिदिन सहस्रो लोक मृत्यूमुखी पडले. कित्येकांना नातलगांना मुकावे लागले. यामुळे लोकांच्या मनात भीती आणि असुरक्षितता वाढली. अजूनही अनेकांना त्यातून बाहेर पडता आलेले नाही. अनेक जण महागडे मानसिक स्वरूपाचे औषधोपचार, तसेच समुपदेशन घेत आहेत. (आपत्काळात मनोबल वाढवण्यासाठीच्या स्वयंसूचनांची माहिती पृष्ठ क्र. १० वर दिलेली आहे.)

५. इंधन टंचाईमुळे झालेले विपरित परिणाम !

इंधन आणि अन्न टंचाई

अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम इंधन संकट आणि आर्थिक अस्थिरता यांवर मोठ्या प्रमाणात झाला. भारतात पेट्रोलच्या किमती भरमसाठ वाढल्या. इंधन महाग झाल्यामुळे वाहतुकीचा व्यय वाढला. परिणामी अन्नधान्य आणि इतर वस्तूही महाग झाल्या. भाज्या, दूध आणि गॅस यांचे दर वाढल्यामुळे मध्यमवर्गियांवर त्यांच्या खिशाला कात्री लावण्याची वेळ ओढावली. सिलिंडरअभावी अनेक उपाहारगृहे बंद पडल्याने अनेकांना जेवणासाठी वणवण फिरावे लागले. काही विद्यार्थ्यांची प्रसंगी उपासमारही झाली. काहींना तर केवळ भातावरच अनेक दिवस काढावे लागले. कोची (केरळम्) येथे ५ सहस्र उपाहारगृहे बंद पडली. असा काळ जर पुन्हा उद्भवला, तर जनता त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे का ? याचा प्रत्येकाने विचार करून ठेवायला हवा.

६१ वर्षांपूर्वीचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आवाहन वर्तमानात आवश्यक !

लालबहादूर शास्त्री

वर्ष १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जनतेला ‘जय जवान, जय किसान’ हा मूलमंत्र देऊन २ आघाड्यांवर युद्ध करायला सांगितले होते. पहिले सीमेवरील शत्रूशी, तर दुसरे देशांतर्गत निर्माण झालेल्या अन्नधान्याच्या टंचाईशी ! त्यांनी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात धान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन्नटंचाईचा सामना करण्यासाठी जनतेला आठवड्यातून किमान एक वेळ उपवास करण्याचेही आवाहन केले. ते केवळ आवाहन करून शांत बसले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष कृती करून जनतेला प्रेरणा दिली. परकीय साहाय्यावर विसंबून न रहाता स्वबळावर समस्येचा सामना करण्याचे धैर्य त्यांनी दिले. आज ६१ वर्षांनंतर पुन्हा शास्त्री यांच्या आवाहनाचे अनुकरण करण्याची वेळ आली आहे.

– सौ. नम्रता दिवेकर

अन्नधान्य अन् साहित्य यांची साठवणूक

६. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक उपाययोजना कराव्यात !

आपत्काळ संपलेला नाही. तो पुनःपुन्हा येत रहाणारच आहे. कोरोना काळात ज्यांच्याकडे बचत होती, त्यांना तुलनेत अल्प त्रास सहन करावा लागला. ज्यांच्याकडे बचतच नव्हती, त्यांना कर्ज घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने अनावश्यक व्यय टाळायला हवा. अन्नधान्य, औषधे आणि गॅस यांचा मर्यादित साठा ठेवावा. स्वतःसह कुटुंबाच्याही आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. संकटकाळात मन शांत आणि स्थिर ठेवावे. यासाठी प्रत्येकाने आतापासूनच सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्यावी.

साधना करणे हाच उपाय !

७. मनोबल वाढवण्यासह साधना करणे हाच उपाय !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे या दिवशी देशवासियांना सोने खरेदी न करणे, शक्यतो परदेशवारी न करणे यांसारखी काही आवाहने केली. या आवाहनांनंतर प्रत्येक नागरिक सतर्क झाला आहे. त्यांचे आवाहन म्हणजे पुढील आपत्काळाची धोक्याची घंटा तर नसेल ना ? या अनुषंगाने भारतियांनी सदैव सिद्ध असायला हवे. वर उल्लेख केलेल्या दोन संकटांचेच परिणाम गंभीर आणि भीषण आहेत, तर ‘पुढील काळात आणखी काय काय वाढून ठेवलेले असणार आहे ?’, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कोरोना महामारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्ध यांतून लक्षात आले असेलच की, मानवी जीवन अनिश्चित आहे. संकटकाळात खंबीर रहाण्यासाठी आणि त्याला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचे मनोबल वाढवावे. त्यासाठी देवाची आराधना (साधना) करणे, हाच सर्वाेत्तम उपाय आहे !

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.५.२०२६)