‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने गयागदाधर मंदिराची स्वच्छता !

गयागदाधर मंदिर येथे आज स्वच्छता करतांना ‘ब्राह्मण पुरोहित संघा’चे सदस्य (संकेतस्थळावर)

कोल्हापूर – ‘कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघा’च्या वतीने पद्मपुराण अंतर्गत ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथातील प्राचीन गयागदाधर मंदिर येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती श्री. प्रसाद निगुडकर यांच्यासह संघाचे सदस्य उपस्थित होते. हे मंदिर अतिशय प्राचीन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते. ‘येथे पितृकार्य, तर्पण आदी धार्मिक विधी केल्यास उत्तम फलप्राप्ती होते’, असे पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. या मंदिरात विष्णुपादासह विविध देवतांची पादचिन्हे गदाधराची मूर्ती स्थानापन्न आहे.

मंदिर परिसराची संपूर्ण स्वच्छता करून मंदिरातील सर्व देवतांचे विधीवत् पूजन करून आरती आणि प्रार्थना करण्यात आली. या वेळी पुरोहित संघाच्या सर्व सदस्यांनी सामूहिक मंत्रपठण केले. या प्रसंगी मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

अत्यंत प्राचीन असलेल्या मंदिराचे महत्त्व लोकांना कळण्यासाठी, तसेच त्याचा लाभ भाविकांना व्हावा, यांसाठी श्री. उमाकांत राणिंगा गेली अनेक वर्षे विशेष प्रयत्न करत आहेत. या मंदिराची माहिती लोकांना कळण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’ने विशेष व्हिडिओ सिद्ध केला आहे. यात श्री. राणिंगा यांनी या मंदिराचे महत्त्व विस्तृत विवेचन करून सांगितले आहे.