Hindu Vidhidnya Parishad Demands : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घराप्रमाणे महाराष्ट्रातील ‘सावरकर सदन’ खरेदी करून त्याचे संवर्धन करावे !

‘हिंदु विधीज्ञ परिषदे’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी !

मुंबई येथील उपेक्षित असलेले ‘सावरकर सदन’

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर महाराष्ट्र सरकारने खरेदी करून त्याचे संवर्धन केले जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्या ठिकाणी ३८ वर्षे वास्तव्य होते, ते मुंबईतील ‘सावरकर सदन’ मात्र उपेक्षित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराप्रमाणे ‘सावरकर सदन’ही महाराष्ट्र सरकारने खरेदी करून त्याचे संवर्धन करावे आणि त्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह आणि दलित अधिकारांसाठी लढा दिला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिराची स्थापना करून तेथे आंतरजातीय भोजनाचे आयोजन करून आणि मंदिरात हरिजनांना प्रवेश देऊन जातीयवाद संपवण्याचे कार्य केले. डॉ. आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३६ कोटी ४ लाख रुपये, तर त्यामध्ये विविध साहित्याच्या खरेदीसाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च केले. अन्य विविध स्मारकांसाठी ५६ कोटी रुपये, तर देहली येथील आंतरराष्ट्रीय केंद्रासाठीही सरकारने १९६ कोटी रुपये खर्च केले आहेत. याउलट सावरकर सदनाविषयी मात्र सरकार उदासीन आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर
अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेले पत्र –

सरकारचा हस्तक्षेप आवश्यक !

सध्या मुंबई उच्च न्यायालयात या वास्तूविषयी एक जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) आहे. यामध्ये एका नामांकित विकासकाने हस्तक्षेप याचिका प्रविष्ट केली आहे. यावरून या ऐतिहासिक वास्तूमध्ये विकासकाला रस असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक वास्तू वाचवण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा.

“Maharashtra to purchase Ambedkar’s UK house in 10 days”
(चित्रावर क्लिक करा)

सावरकर कुटुंबाने देशासाठी मोठा त्याग केला आहे. त्या कुटुंबाच्या घराच्या संवर्धनाचा आर्थिक भारही त्याच कुटुंबावर टाकणे, हे अन्यायकारक ठरेल. ‘सावरकर सदना’ची जागा संबंधित मालकांकडून खरेदी करून येणार्‍या पिढ्यांसाठी हे सदन प्रेरणास्थान बनवावे. या वास्तूचे संवर्धन आणि त्याचा प्रसार यांसाठी पुरेसा निधी द्यावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रासाठीचे बलीदान आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यातील योगदान यांचा गौरव करण्यासाठी केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, अशी आग्रही विनंतीही अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या पत्रात केली आहे.