Kerala ‘Vande Mataram’ : (म्हणे) ‘वन्दे मातरम्’चे पूर्ण गायन हा रा.स्व. संघाच्या धोरणाचा भाग !’ – माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन्

केरळम्चे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

पिनराई विजयन्

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – संपूर्ण ‘वन्दे मातरम्’गाण्याची आवश्यकता नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वन्दे मातरम्’ची केवळ पहिली २ कडवी गायली जात असतांना उभे रहाण्याचीही आवश्यकता नाही. ‘वन्दे मातरम्’चे पूर्ण गायन करणे हा रा.स्व. संघाच्या धोरणाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी संपूर्ण गाणे गायले गेले, जे व्हायला नको होते.

त्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्णय घेतल्याचे दिसते. हीच भूमिका घेतली पाहिजे, असे विधान केरळम्चे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन् यांनी केले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या अभिभाषणाच्या वेळी केरळम् विधानसभेत संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ न गायल्याने राष्ट्रीय गाण्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला होता. यानंतर विजयन् यांनी या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’ पूर्ण सादर करण्याचे केंद्रशासनाचे निर्देश आहेत; परंतु केरळम् विधानसभेने त्याचे पालन केले नाही. हा राज्यपालांचा अपमान आहे. ‘१५० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘वन्दे मातरम्’चा अनादर करण्यात आला’, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार व्ही. मुरलीधरन् यांनी केला.

संपादकीय भूमिका

संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ न गाणे हे काँग्रेसचे मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचे धोरण होते आणि ते आता केंद्रातील भाजप सरकारने कायद्याद्वारे रहित केले आहे. त्यामुळे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गाणे कायदेशीर झाले आहे. त्याचे कुणी उल्लंघन करत असेल, तर अशांवर कारवाई झाली पाहिजे. मग ते विजयन् असले, तरी कारवाई झालीच पाहिजे !