भारतातील सिनेमाचा मनोरंजनापलीकडे जाऊन लाखो लोकांच्या सांस्कृतिक ओळखीवर एक अद्वितीय आणि दूरगामी प्रभाव आहे. ज्याला अनेकदा ‘बॉलीवूड’ म्हटले जाते, तो एका व्यापक चित्रपटसृष्टीचा केवळ एक भाग आहे, ज्यामध्ये विविध प्रादेशिक उद्योगांचा समावेश आहे. त्यातील प्रत्येक उद्योग एका सामायिक सांस्कृतिक अभिव्यक्तीमध्ये योगदान देतो. एकत्रितपणे हे सर्व मिळून भारतीय सिनेमा सिद्ध करतात. ही एक व्यापक चित्रपट परंपरा आहे, जी भाषा, प्रदेश आणि सीमा ओलांडून भारतभर अन् जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचते. यामध्ये विशाल भारतीय ‘डायस्पोरा’चा (परदेशस्थ भारतीय समुदायाचा) समावेश आहे.

१. कथात्मक अभिव्यक्तीचे आधुनिक रूप म्हणजे सिनेमा !
या परंपरेची मुळे सिनेमाच्याही पुष्कळ आधीची आहेत. वेद आणि इतिहास यांच्या मौखिक परंपरेपासून अभिजात नाट्यकला, मंदिरातील कला, लोककथा, संगीत आणि नृत्य इथपर्यंत भारताने पिढ्यान्पिढ्या मूल्ये, ज्ञान, नीतीमत्ता अन् सांस्कृतिक सातत्य हस्तांतरित करण्याचे साधन म्हणून कथात्मक अभिव्यक्तीचा फार पूर्वीपासून वापर केला आहे. सिनेमा हा याच परंपरांचा एक आधुनिक विस्तार म्हणून उदयास आला, ज्याने प्रतिमा, ध्वनी, भाषा, संगीत आणि सादरीकरण यांना एकत्र आणून समकालीन युगातील सर्वांत प्रभावशाली सांस्कृतिक माध्यमांपैकी एक बनवले. परदेशात रहाणार्या भारतीय वंशाच्या अनेक व्यक्तींसाठी सिनेमा हा वारशाशी जोडणारा एक जिवंत पूल आहे. जसजसे चित्रपटांचे भाषांतर, ‘डबिंग’ (ध्वनी संयोजन किंवा आवाज देणे) आणि व्यापक प्रसारण होते, तसतसे हे नाते पिढ्यान्पिढ्या टिकून रहाते.
२. परदेशी नागरिकांवरही भारतीय सिनेमाचा प्रभाव

भारतीय सिनेमाचा प्रभाव परदेशस्थ भारतियांच्या पलीकडेही पसरलेला आहे. मध्यपूर्व, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन यांसारख्या प्रदेशांमध्ये भारताच्या चित्रपटांनी खोलवर प्रभाव टाकला असून लोकप्रिय संगीत, फॅशन अन् सामाजिक अभिव्यक्तीच्या विविध पैलूंना आकार दिला आहे. ही व्यापकता केवळ त्याच्या कलात्मक आकर्षणाचेच नव्हे, तर त्याच्या विषयांच्या सार्वत्रिकतेचेही द्योतक आहे. मुळात सिनेमा केवळ कथा सांगण्यापलीकडे जाऊन दृष्टीकोन घडवतो. प्रेक्षक पडद्यावर जे वारंवार पहातात, त्याचा प्रभाव त्यांच्या मते काय अर्थपूर्ण, काय इष्ट आणि काय मिळवण्यासारखे आहे, यांवर पडू लागतो.
३. सिनेमाचा प्रभाव महसूल किंवा प्रसिद्धीपेक्षा त्याने दिलेल्या मूल्यांवरून मोजणे महत्त्वाचे !
अशा प्रभावासह उत्तरदायित्वही येते. जेव्हा कथा विभाजन, संघर्ष किंवा संकुचित अस्मिता यांवर भर देतात, तेव्हा समाजात विखंडन अधिक दृढ होण्याचा धोका असतो. याउलट जेव्हा चित्रपट सहकार्य, निःस्वार्थ सेवा आणि सामायिक उद्देशाला महत्त्व देतात, तेव्हा ते ऐक्य अन् सामाजिक सलोख्यासाठी योगदान देऊ शकतात. त्यामुळे सिनेमाचा प्रभाव केवळ महसूल किंवा प्रसिद्धी यांवरून मोजता येत नाही, तर तो ज्या मूल्यांना दृढ करतो, त्यावरून मोजला पाहिजे.
४. सिनेमामध्ये भारतासारख्या विविधता असलेल्या देशात समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता
भारतासारख्या विविधतेने नटलेल्या राष्ट्रात जिथे अनेक संस्कृती, भाषा आणि परंपरा एकत्र नांदतात, तिथे सिनेमाची भूमिका विशेषतः महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यामध्ये केवळ समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याचीच नव्हे, तर त्याला एकत्र बांधून ठेवणारे बंध अधिक घट्ट करण्याचीही क्षमता आहे. देशभक्ती केवळ आपल्या राष्ट्रावरील प्रेमच नव्हे, तर तेथील लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या सामायिक उत्तरदायित्वाची भावनाही दर्शवते. ती हे ओळखते की, वैयक्तिक कृती सामूहिक परिणामांना हातभार लावतात.
हा दृष्टीकोन धर्माच्या वैश्विक संकल्पनेशी सुसंगत आहे. ही जगण्याची एक सकारात्मक पद्धत असून संतुलन, उत्तरदायित्व आणि जीवनाचा उद्देश यांच्याशी एकरूपतेला प्रोत्साहन देते. धार्मिक जीवनशैली ही जीवनशास्त्राचा पाया आहे, जी हेतू, निवड, शब्द आणि कृती यांना कल्याणाच्या एका सुसंगत मार्गात एकत्रित करते.
५. भारतीय सांस्कृतिक परंपरेचा जागतिक स्तरावर प्रभाव
धर्माची ही समज भारताच्या सांस्कृतिक वारशात खोलवर रुजलेली आहे. भारताच्या वैदिक पायातून अशा ज्ञानप्रणाली उदयास आल्या आहेत, ज्या जगभर पसरल्या आहेत. वेदांमध्ये रुजलेल्या परंपरांनी ज्यात योग, ध्यान आणि आयुर्वेद यांसारख्या पद्धतींचा समावेश आहे, त्यांनी जागतिक स्तरावर आरोग्य, जीवनशैली अन् आंतरिक संतुलनाच्या दृष्टीकोनांवर प्रभाव टाकला आहे. आज ही तत्त्वे मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जातात आणि अनेकदा त्यांचा मूळ उद्देश कायम ठेवून स्थानिक संस्कृतीनुसार त्यात पालट केले जातात.
६. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या सत्याकडे नेणारी भारताची संस्कृती आणि चित्रपटसृष्टीची व्यापक लोकप्रियता
भारताची संस्कृती आणि चित्रपटसृष्टीची व्यापक लोकप्रियता एका गहन सत्याकडे निर्देश करते की, भाषा, प्रदेश किंवा राष्ट्रीयतेच्या पलीकडे मानवजात एकमेकांशी जोडलेली आहे. जगाला एक कुटुंब म्हणून पाहिले जाऊ शकते, म्हणजे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.) या संस्कृत संकल्पनेतून व्यक्त झालेला एक जागतिक समाज. त्यामुळे जे भारतीय सिनेमाची निर्मिती करतात आणि त्यात योगदान देतात, ते केवळ मनोरंजन करत नाहीत, तर ते ज्या व्यक्तींची ओळख, उद्देश अन् सहअस्तित्व यांविषयीचा समज घडवून आणतात, अशा जागतिक सांस्कृतिक संवादात सहभागी होत आहेत.
७. सिनेमामध्ये सामाजिक मूल्यांवर आधारित समाज घडवण्याची क्षमता
जर सिनेमामध्ये आकांक्षांना आकार देण्याचा प्रभाव असेल, तर त्यात त्यांना उन्नत करण्याची क्षमताही आहे. प्रामाणिकपणा, करुणा, सेवा, सामायिक उत्तरदायित्व आणि सकारात्मकता यांवर प्रकाश टाकणार्या कथा प्रेक्षकांना समाजातील त्यांच्या भूमिकेवर चिंतन करण्यास प्रोत्साहित करू शकतात. त्या सुचवतात की, सामर्थ्य केवळ वर्चस्व किंवा संघर्षातूनच नव्हे, तर संयम, सहकार्य आणि सामूहिक कल्याणाप्रती असलेल्या वचनबद्धतेतूनही व्यक्त होते. अशा कथाकथनाचा प्रभाव समाज यशाची व्याख्या कशी करतो, यावर पडू शकतो. केवळ संपत्ती, प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक समाधान यांतून मिळणार्या पूर्ततेच्या ऐवजी सिनेमामध्ये योगदान, दायित्व, प्रतिष्ठा आणि इतरांशी सुसंवाद यांवर भर देण्याची क्षमता आहे. असे करतांना समाजाचा एक उत्तरदायी सदस्य म्हणून अर्थपूर्ण जीवन जगण्याचा अर्थ काय आहे, याविषयीचा समज तो अधिक व्यापक करतो.
सिनेमा सामायिक मूल्यांवर आधारित समाज घडवण्यास साहाय्य करू शकतो. असा समाज ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एका मोठ्या समूहाचा भाग म्हणून ओळखले जाते. भारतीय सिनेमा जसजसा व्याप्ती आणि प्रभावाने वाढत आहे, तसतसा तो राष्ट्रीय एकता सशक्त करण्याची अन् अधिक सुसंवादी, तसेच शांततापूर्ण जागतिक समाजासाठी योगदान देण्याची क्षमता बाळगतो.
लेखक : आनंदा मॅथ्यूज, हॉलीवूड ‘सिनेमॅटोग्राफर’ (चलचित्रीकरण तज्ञ), ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ पुस्तकाचे लेखक, गोवा.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !