सात्त्विकतेची ओढ असणारा ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बारामती (जिल्हा पुणे) येथील चि. श्रीहरि वैभव कुंभार (वय १ वर्षे ९ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. श्रीहरि वैभव कुंभार हा या पिढीतील एक आहे !

चि. श्रीहरि वैभव कुंभार

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गर्भारपण

१ अ. पहिला मास : ‘मला दिवस गेल्यानंतर पहिल्या मासात स्वप्नात बाळकृष्ण खेळतांना दिसायचा, तसेच स्वप्नात ‘श्रीकृष्णाची मूर्ती पोटातून बाहेर येत आहे’, असे दृश्य दिसत असे.

१ आ. तिसर्‍या मासात मला रक्ताची उलटी झाली. तेव्हा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला ‘महाशून्य’, हा नामजप ९ मास सतत केला.

१ इ. ४ ते ९ मास

१ इ १. त्रास होत असतांना सूक्ष्मातून ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे दिसणे : माझ्या पोटात सतत दुखायचे. मला त्रास झाल्यावर सूक्ष्मातून ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहेत’, असे मला दिसायचे. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘सर्वकाही चांगले होणार आहे’, असे मला सांगायच्या.

१ इ २. नामजपादी उपाय करणे : संपूर्ण गरोदरपणात मी ‘सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेला ‘महाशून्य’ हा नामजप करणे, त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, दृष्ट काढणे’, असे आध्यात्मिक स्तरावरील सर्व उपाय केले. माझा श्रीकृष्णाचा नामजप अखंड होत होता.

१ इ ३. रात्री झोपतांना मला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमाचे दर्शन होत असे.

१ इ ४. ‘तू श्रीरामाचा दास आहेस’, असे गर्भाला सांगितल्यावर, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतांना गर्भाने हालचाल करणे : मी एक दिवस पोटावर हात ठेवून बाळाला ‘तू श्रीरामाचा दास आहेस’, असे सांगितले. ते ऐकल्यावर ‘पोटातील बाळ जोरात हालचाल करत आहे’, असे मला जाणवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतांना ते असाच प्रतिसाद देत असे.’

– सौ. गौरी वैभव कुंभार (चि. श्रीहरीची आई), बारामती, जिल्हा पुणे.

सौ. गौरी वैभव कुंभार

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते ३ मास

२ अ १. सात्त्विकतेची ओढ

अ. ‘माझ्या सुनेच्या (सौ. गौरी कुंभार हिच्या) प्रसुतीनंतर तिला डेंग्यू झाला. तेव्हा श्रीहरि दोन मासांचा होता. त्यामुळे त्याला वरचे दूध पाजावे लागत होते. मी त्याला नामजप करत अथवा भजने म्हणत दूध दिले, तर तो कोणताही त्रास न देता ते पीत असे.

आ. मी श्लोक म्हणत असतांना आणि नामजप करत असतांना श्रीहरि नाचतो.

२ अ २. श्रीहरीच्या संपर्कात आलेल्या मुलांना नामजप करण्याची सवय लागणे : आमच्या शेजारी रहाणारे सर्व जणच श्रीहरीमुळे नामजप आणि श्लोक म्हणू लागले आहेत. एक दिवस तो त्याच्या आईसह त्याच्या आजीकडे (आईच्या आईकडे) गेला होता. तेथील लहान मुले श्रीहरीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’, हा नामजप करत खेळवत असत. तेव्हापासून तेथील सर्व मुलांना नामजप करण्याची सवय लागली आहे.’

– सौ. सिंधु कुंभार (श्रीहरीची आजी (वडिलांची आई)), बारामती, जिल्हा पुणे.

२ आ. ४ मास ते ६ मास

१. ‘श्रीहरि चार मासांचा असतांना त्याचा मामा त्याला श्रीरामाचे भजन आणि नामजप म्हणत खेळवत असे. त्याच कालावधीत श्रीहरीने ‘राम’, हा शब्द उच्चारला.

२. श्रीहरीला गायीशी खेळायला आवडते.’

– सौ. सुवर्णा कुंभार (श्रीहरीची आजी (आईची आई)), कांबळेश्वर, बारामती, पुणे.

३. ‘तो ६ मासांचा असतांना त्याचा ‘अन्नप्राशन विधी’ केला. त्या वेळी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या संत, वय ४४ वर्षे) यांना भेटून आल्यानंतर तो घरी आनंदाने खेळत होता.’ – सौ. गौरी वैभव कुंभार (श्रीहरीची आई)

२ इ. ११ मास ते दीड वर्ष

२ इ १. देवाची ओढ

अ. ‘एकदा श्रीहरीच्या बाबांनी त्याला त्यांच्या भ्रमणभाषवर प्रार्थना ऐकवली. ती ऐकल्यावर त्याने लगेच नमस्कार केला.

आ. सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात गेल्यावर तेथे कन्नड भक्तीगीत लावले होते. ते ऐकूनही त्याने हात जोडून नमस्कार केला. वास्तविक त्याला ती भाषा समजत नाही, तरीही त्याने ही कृती केली.

इ. श्रीहरीचे बोरन्हाण चालू असतांना त्याचे आजोबा ‘हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप करत होते. ते ऐकून श्रीहरि टाळ्या वाजवत होता. नामजप पूर्ण होईपर्यंत तो शांत बसून होता.’

– सौ. सिंधु कुंभार (श्रीहरीची आजी (वडिलांची आई)), बारामती, जिल्हा पुणे.

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.१.२०२६)

चि. श्रीहरि कुंभार याच्या जन्मानंतर आलेल्या अनुभूती !

१. ‘श्रीहरीचा जन्म झाल्यानंतर आमची आर्थिक प्रगती झाली.

२. माझे श्रीकृष्णाशी अनुसंधान वाढले.’

– सौ. सुवर्णा कुंभार (श्रीहरीची आजी (आईची आई)), कांबळेश्वर, बारामती, पुणे. (२९.१.२०२६)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.