घरविक्रीचे पैसे मिळण्यासाठी करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेत ३ वर्षे अनेक अडथळे येणे आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला जप केल्यावर केवळ २ मासांत पैसे मिळणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. नवीन घर विकत घेण्यात अनेक अडचणी येणे 

‘वर्ष २०१७ मध्ये अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील आमचे रहाते घर विक्री झाले. आम्ही गोव्यात नवीन घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत होतो. नवीन घर मिळेपर्यंत जुन्या घरविक्रीचे मिळालेले पैसे ‘कॅपिटल गेन अकाऊंट’मध्ये गुंतवण्याचा सल्ला आमच्या लेखापालांनी (सी.ए.नी) दिला. त्यात पैसे ठेवल्यावर ३ वर्षांच्या आत नवीन घर घ्यावेच लागते. अन्यथा कर भरावा लागतो; परंतु नवीन घर मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या.

२. एका संतांनी साधिकेला नवीन घर न घेता आश्रमातच रहाण्यास सांगणे 

घर मिळण्यात येणार्‍या अडचणींसंदर्भात आम्ही एका संतांना सांगितले. तेव्हा त्यांनी ‘तुम्ही घर घेतल्यास भविष्यात आई आजारी पडल्यावर तिच्या सेवेसाठी तुला आणि बाबांना घरी थांबावे लागल्याने तुमची सेवा थांबेल. त्यामुळे नवीन घर घ्यायचे नाही. तुम्ही तिघांनी आश्रमातच रहायचे. प्रत्येक कृती करतांना ‘सेवा होते का ?’, याचा विचार करायला हवा’, असे सांगितले.

३. ठाणे येथील आयकर (इनकम टॅक्स) कार्यालयातून कागदपत्रे गोवा येथे स्थलांतरित होण्यात अनेक अडथळे येणे 

आम्ही नवीन घर घेण्याचे रहित करून ‘कॅपिटल गेन अकाऊंट’मध्ये गुंतवलेले पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागलो; पण त्यातही अनेक अडचणी येत होत्या. पैसे मिळण्यासाठी अधिकोशातील अधिकारी आम्हाला आयकर (इनकम टॅक्स) कार्यालयातून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) आणण्यास सांगत होते. आम्ही ते प्रमाणपत्र मिळवण्यास आरंभ केला; पण ठाणे येथील आयकर अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार आम्ही आता गोवा येथे स्थायिक झाल्यामुळे आम्हाला गोव्याहून ती सगळी प्रक्रिया करावी लागणार होती. त्यानुसार करत असतांना ठाणे येथून सगळी कागदपत्रे गोवा येथे स्थलांतरित होण्यात अनेक अडचणी येत होत्या. अशा प्रकारे गेली ३ वर्षे आम्ही पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. या सर्व प्रक्रियेत पू. पृथ्वीराज हजारे यांचे आम्हाला मोलाचे साहाय्य लाभले.

४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी पैसे मिळण्यासाठी त्यांनी दिलेले आध्यात्मिक उपाय २ घंटे करण्यास सांगणे 

जानेवारी २०२१ मध्ये मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना ‘अडथळे दूर होण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय करायचा का ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी ओठांसमोर तळहात ठेवून ‘महाशून्य’ हा नामजप २ घंटे करण्यास सांगितला.

५. मी आणि बाबा यांनी १ मास तो नामजप केला; मात्र नंतर बाबांचे आजारपण आणि माझी व्यस्तता यांमुळे आम्हाला तो नामजप करण्यास जमले नाही. 

६. केवळ १ मासाच्या नामजपाने अडचणी दूर होऊन पैसे परत मिळणे 

मार्च २०२१ मध्ये पू. हजारेकाका यांनी एका साधकाला ‘या प्रकरणातील खरी परिस्थिती काय आहे ?’, हे जाणण्यासाठी अधिकोशात पाठवले. तेव्हा अधिकोशातील कर्मचार्‍यांनी त्या साधकाला ‘तुम्हाला खाते बंद करायचे आहे का ?’, असे विचारले. त्या साधकाने त्यास होकार दिल्यावर त्यांनी खाते बंद करून त्यातील घरविक्रीचे पैसे आमच्या खात्यात व्याजासहित हस्तांतरित केले. तेव्हा साडेतीन वर्षे येणार्‍या अनेक अडचणींमुळे जे जमले नव्हते, ते केवळ १ मासाच्या नामजपाने जमले. एक संत, पू. हजारेकाका आणि सद्गुरु डॉ. गाडगीळकाका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– एक साधिका