संपादकीय : झळा या लागल्या जिवा !

महिन्याचा शेवटचा आठवडा चालू झाला आहे. उष्णतेचा पारा प्रतिवर्ष उच्चांक गाठत आहे. ४७ अंश (डिग्री) सेल्सियसच्या पुढे तापमान जात आहे. कदाचित् पुढच्या वर्षी भारतात ५० अंश सेल्सियस तापमान गेले, तर आश्चर्य वाटणार नाही. काही दशकांपूर्वी ३० अंश सेल्सियस इतके तापमान उन्हाळ्याच्या काळात असे. हळू हळू जागतिक स्तरावर उष्णतेत वाढ होत गेली आणि भारतातील तापमान आज ४७ अंश सेल्सियसवर पोचले. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ (पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ) विषयीची चेतावणी काही दशकांपूर्वी दिली गेली होती; मात्र कोणत्याही देशाने त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना काढली नाही. त्यात भारताचाही समावेश आहे. त्यामुळे आज केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीचे तापमान वाढले आहे आणि प्रतिदिन वाढत आहे. यामुळेच बर्फाच्छादित डोंगर, तसेच अंटार्टिका आणि आर्टिक (उत्तर आणि दक्षिण) ध्रुवांवरील बर्फ वितळू लागला आहे. भारतात हिमालयाचीही हीच स्थिती दिसून येत आहे. ‘येत्या काही वर्षांत जगातील समुद्रकिनार्‍यांवरील भाग पाण्याखाली जातील’, अशी चेतावणी तज्ञांनी काही वर्षांपूर्वीच दिलेली आहे. ती खरी ठरणार, यात शंका नाही; कारण सध्याची स्थिती पहाता त्यावर कठोर उपाययोजना काढतांना किंवा सांगितलेल्या प्रयत्नांवर कृती करतांना कुणी दिसत नाही. जगातील मोठ्या लोकसंख्येला तर याविषयी कल्पनाच नाही. ज्यांना कल्पना आहे, त्यांना याचे गांभीर्यच नाही. ही स्थिती पृथ्वीच्या विनाशाकडे जाणारी आहे. जगात तिसरे महायुद्ध होण्यावर चर्चा होत असतांना पर्यावरणाच्या हानीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

भारतातील ९७ शहरे उष्ण !

आज भारत जगातील सर्वाधिक उष्णतेचा सामना करणार्‍या देशांपैकी एक बनला आहे. अलीकडील अहवालानुसार भारतातील ९७ शहरांना ‘अती-उष्ण’ क्षेत्रांतर्गत वर्गीकृत करण्यात आले आहे. यामागे केवळ ‘एल् निनो’सारखी नैसर्गिक चक्रे नाहीत, तर मानवनिर्मित कारणे आहेत. यात मुख्य म्हणजे क्राँक्रीटचे जंगल ! शहरांमधील काँक्रीटची बांधकामे उष्णता शोषून घेतात आणि ती रात्रीही उत्सर्जित करतात. यामुळे शहरांचे तापमान ग्रामीण भागापेक्षा ५ ते ७ अंशांनी अधिक असते. या काँक्रीटच्या ‘जंगलां’साठी म्हणजे तथाकथित विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे आणि होत आहे. शहरीकरणाने नद्या, नाले आणि तळे बुजवली आहेत. ज्यामुळे निसर्गाची वातानुकूलन यंत्रणा नष्ट झाली आहे. दुसरीकडे आपण घराबाहेरची उष्णता अल्प करण्याऐवजी घराच्या आत थंड रहाण्यासाठी वातानुकूलन यंत्राचा (एअर कंडिशनर्सचा) वापर करतो. त्यातून बाहेर पडणारी गरम हवा वातावरणातील उष्णता अधिकच वाढवते. परिणामी केवळ घामाच्या धारा नाहीत, तर आयुष्याची होरपळ होते. वाढत्या तापमानाचे परिणाम केवळ ‘उष्णता’ या शब्दापर्यंत मर्यादित नाहीत, तर त्याचा आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. उष्णतेच्या लाटांमुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. मूत्रपिंडाचे आजार आणि मानसिक तणाव यांमुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे पिके करपून जात आहेत. विशेषतः गहू आणि तांदुळ यांच्या उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होत असून भविष्यात उपासमारीचे संकट ओढवू शकते. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे, ज्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होत आहे.

शाश्वत उपाययोजना 

जागतिक स्तरावर उष्णता वाढण्यामागे औद्योगीकरण हेच सर्वांत मोठे कारण आहे. औद्योगीकरणामुळेच सर्व प्रकारचे प्रदूषण होत आहे. मानवाने विज्ञानाच्या आधारे जगाचा जो काही विकास केला आहे, तोच विकास या पृथ्वीच्या विनाशाला कारण ठरत आहे. १०० वर्षांपूर्वी जगात स्वच्छ पाणी, हवा आणि आकाश होते, तर जंगलांनी मोठा भूभाग व्यापला होता. आज पाहिले, तर पाणी अस्वच्छच नाही, तर त्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हवा प्रदूषित झाल्याने विविध आजार होत आहेत, तर आकाश निरभ्र किंवा निळे दिसणे दुर्मिळ होऊ लागले आहे. जंगल म्हणजे हरित पट्टा प्रतिदिन नष्ट होत आहे. त्यामुळे उष्णता अल्प करण्यासाठी प्रथम विज्ञानाद्वारे होणारा विनाश थांबवणे आवश्यक आहे. जे सर्वाधिक कठीण झाले आहे. आज जागतिक स्तरावर जग जवळ आले आहे. त्यासाठी लागणारी संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी उद्योगांची आवश्यकता असते आणि हेच उद्योग बंद होऊ शकत नाहीत. तसे करायचे असेल, तर सर्व काही नैसर्गिक स्तरावर करायला हवे आणि जे आता शक्य होणे कठीण आहे. कोरोनाच्या काळात जगात ‘लॉकडाऊन’ केल्याने अनेक ठिकाणी पर्यावरणात पालट जाणवला होता. सर्वकाही स्वच्छ झाले होते. भारतात यमुना नदी स्वच्छ दिसू लागली होती. पंजाबमधून हिमालय दिसू लागला होता. याचाच अर्थ म्हणजे आज जगात जे काही चालू आहे त्या सर्वांचा परिणाम जागतिक पर्यावरणाचा र्‍हास होण्यात होत आहे. तेच थांबवणे आवश्यक आहे. प्रत्येक देशातील शासनकर्त्यांना याची जाणीव आहे; मात्र ते करणे अवघड आहे. त्यातही काही गोष्टी आतापासून करता येऊ शकतात. त्यात जीवाश्म इंधनाचा वापर पूर्णपणे थांबवून सौर आणि पवन ऊर्जा यांचा वापर करणे, मोठ्या स्तरावर वृक्षारोपण करून झाडे जगवणे, घनदाट जंगल निर्माण करणे आवश्यक आहे. यामुळे प्राणवायूत (ऑक्सिजनमध्ये) वाढ होऊन शीतलता निर्माण होईल.

अध्यात्म अंगीकारणे !

जेव्हा विज्ञानाचे सर्व मार्ग अपुरे पडतात, तेव्हा अध्यात्म आपल्याला शिकवते. वाढत्या उष्णतेचे मूळ कारण मानवाचा अती-उपभोग आहे. अध्यात्मानुसार जगणारी व्यक्ती उपभोगाऐवजी त्यागाला महत्त्व देते आणि तसे आचरण करते. विज्ञानाद्वारे लावण्यात आलेले सर्व शोध हे उपभोगासाठीच असतात. मग ते मिळवण्यासाठी निसर्गाला ओरबाडले जाते आणि हाच निसर्ग परत जीवसृष्टीची हानी करतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी आपली नाळ तुटली आहे. आपण आकाशाचा वापर ओझोन थराच्या विनाशासाठी केला, पृथ्वीचा वापर कचरा डेपो म्हणून केला आणि जलाचा वापर प्रदूषणासाठी केला. ही एक प्रकारची पापाची कृती आहे, ज्याचे फळ आपल्याला उष्णतेच्या रूपात मिळत आहे. अध्यात्मानुसार निसर्ग हा देव आहे. निसर्ग प्रत्येक जिवाला देत असतो. त्याच्याकडून कधीच काही घेत नाही; मात्र स्वार्थी मनुष्य त्याच निसर्गाला नष्ट करून आत्मघात करत आहे. यामुळे प्रत्येकाला अध्यात्म शिकवणे आणि त्याचे आचरण करण्यास सांगणे आवश्यक झाले आहे. ‘पृथ्वी वाचली, तरच आपण वाचू’, हा विचार आता कृतीत आणण्याची वेळ आली आहे.

विज्ञानाद्वारे होणारा निसर्गाचा र्‍हास रोखण्यासाठी जगाने अध्यात्माचा अंगीकार करणे आवश्यक !