‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. हिंदुद्रोह्यांकडून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
‘भारत मूळ हिंदु राष्ट्र आहे; पण त्याला धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवून आपल्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशात विविध पंथ, संप्रदाय आणि विविध विचार यांनी चालणारे लोक आहेत. हिंदु राष्ट्राच्या उपासनापद्धतीविषयी विचार केला, तर आपण शिव, विष्णु, शक्ती, गणपति आणि सूर्यदेवता अशा पंचदेवतांची उपासना करणारे सर्व हिंदूच आहोत; पण यात शिवाची उपासना करणार्या लोकांमध्ये काही विरोधी लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ते ‘लिंगायत आणि वीरशैव वेगळे आहेत, त्याही पुढे जाऊन वीरशैव लिंगायतपासून ब्राह्मण वेगळे आहेत अन् आता ते हिंदूंपासूनही वेगळे आहेत’, असे सांगण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक लिंगायत हे हिंदु धर्माचे अभिन्न अंग आहे.
पू. श्री ष.ब्र.प. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांचा परिचय

विद्यावाचस्पति पूज्य श्री षट्लस्थल ब्रह्मीप्रणामस्वरूपी १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, नांदेड येथील गणाचार्य मठ संस्थानचे मठाधिपती आहेत. गणाचार्य मठ संस्थानाच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. मुखेड येथील म. फुले महाविद्यालयात संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी ते आर्थिक स्वरूपात पुरस्कार देतात. गणाचार्य मठामध्ये सतत शिवनाम सप्ताह, वीरशैव समाजाच्या बालकांसाठी रुद्र प्रशिक्षण शिबिर, शिव दीक्षा कार्यक्रम इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
२. गळ्यात लिंग धारण करणारे ‘लिंगायत’ !
भारतातील विविध संप्रदायांत शिवाची उपासना केली जाते. शिवाची उपासना करणारे गळ्यात लिंग धारण करतात; म्हणून त्यांना ‘लिंगायत’ म्हणतात. वास्तविक ग्रांथिक शब्द ‘वीरशैव’, असा आहे. लिंगायत म्हटल्याने तो वेगळा होत नाही; कारण लिंग शिवाचे प्रतीक आहे.
वीरशैवच्या सिद्धांताविषयी काही सांगायचे झाले, तर वीरशैव सिद्धांत आगम-निगम विधीतून आला आहे. (आगम, म्हणजे श्रुति आणि निगम, म्हणजे स्मृति होय. या दोन प्रकारच्या शास्त्रांचा एकत्रित विचार (आगम म्हणजे वेदांसारखे श्रुति आधारित ज्ञान), जे अपौरुषेय (मनुष्याने न रचलेले) मानले जाते, तर निगम म्हणजे ऋषिमुनींनी रचलेल्या स्मृति आधारित ज्ञानाचा संदर्भ.) वेद, उपनिषदे, आरण्यक इत्यादी सर्व ग्रंथांना मानणार्यांना हिंदु म्हणतात. असे असतांना लिंगायत विचारांचे लोक स्वत:ला वेगळे समजतात. ‘फोडा आणि राज्य करा’, अशी इंग्रजांची एक पद्धत होती. त्याप्रमाणे काही निधर्मी पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडून राज्य करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
३. लिंगायत आणि वीरशैव एकच !
रूढ झालेला लिंगायत शब्द ग्रंथानुसार वीरशैवच आहे. त्यासाठी जगद्गुरु श्री रेणुकाचार्यांच्या ‘सिद्धान्तशिखामणि’ ग्रंथानुसार
वीशब्देनोच्यते विद्या शिवजीवैक्यबोधिका ।
तस्यां रमन्ते ये शैवा वीरशैवास्तु ते मतः ।। – सिद्धान्तशिखामणि, परिच्छेद ५, श्लोक १६
अर्थ : ‘वी’ शब्दाने शिव आणि जीव यांच्या ऐक्याचे प्रतिपादन करणारी विद्या, असे सांगितले आहे. या विद्येत रममाण होणारे शिवभक्त, म्हणजे वीरशैव असे म्हटले आहे.
शिव आणि जीव वेगळे नाहीत. दोघांना एकमेकांत विलीन होण्यासाठी विद्या शिकणार्याला आणि त्यात रममाण होणार्या शैवाला ‘वीरशैव’ असे म्हणतात. सर्व जीव शिवापासून शब्दाने वेगळे असल्याचे दिसतात; पण ते वेगळे नाहीत. जीव शिवाचाच एक अंश आहे. त्यांच्या कर्मानुसार त्यांनी मृत्यूलोकात (पृथ्वीवर) जन्म घेतल्याने त्यांना ‘मी शिवापासून विलग (वेगळा) आहे’, असे वाटू लागते. वास्तविक ते विलग नसून शिवच आहेत.
त्याच्या खोलात गेल्यावर एकोत्तर स्थल, म्हणजे १०१ स्थळ. त्यांचे विभाजन करतांना षट्स्तल ज्ञान देणारे दत्त, महेश प्रसादी, प्राणई, शरण हे एकोत्तर स्थळ आहेत. एकोत्तर स्थळाकडे जाण्यासाठी जीव-शिव एकच आहे, अशी विद्या शिकणार्याला आणि त्यात रममाण होणार्याला ‘वीरशैव’ म्हणतात. वीरशैव कोण आहे, तर लिंग रूपात शिवाची आराधना करतो, तो वीरशैव !
४. स्थावर लिंग आणि इष्ट लिंग
स्थावर (अचल किंवा स्थिर) आणि इष्ट (वांछनीय) लिंग हे थोडे भिन्न वाटतात; पण ते भिन्न नाहीत; कारण शिवाची उपासना करणार्या सर्वांना शिव, म्हणजे स्थावर लिंग (अचल, स्थिर) असे वाटते. स्थावर लिंग म्हणजे काय, तर ज्या मंदिरात जाऊन आपण पूजापाठ करू शकतो. ही शिव-जीव एकरूपतेची विद्या आहे. ही त्याची साधना आहे. ती तो करू शकत नाही; म्हणून जगद्गुरु श्री रेणुकाचार्य यांनी ‘आगम-निगम’ हा एक सिद्धांत प्रचलित केला. त्यांच्या मताप्रमाणे स्थावर लिंग आणि इष्ट लिंग हे वेगळे नसून एकच आहेत. इष्ट लिंग हे कंठामध्ये धारण केले. त्यामुळे ते प्रतिदिन एक क्षणही त्यांच्यापासून दूर होत नाही. त्यांनी इष्ट लिंग उजव्या हातात धारण करून ‘शिवयोग साधना’ करण्यास सांगितले. शिवयोग साधना, म्हणजे त्राटक योग. ‘शिवयोगाच्या समवेत त्राटकयोग करतांना स्वतःचा जीव आणि शिव वेगळे नाहीत’, हा सिद्धांत नित्य नियमाने पालन करणार्या लोकांना ‘वीरशैव’ म्हणतात. लिंगायत लोकांनी हीच एक संकल्पना ग्राह्य धरून ‘लिंग धारण करणारे हिंदु नाहीत’, असे सांगण्याचे प्रयत्न चालू केले; पण लिंग, म्हणजे शिवलिंग आहे. शिवलिंग आणि स्थावर लिंग यांत काहीही भेद नाही.
५. लिंगायत नाही, तर ‘वीरशैव लिंगायत’ म्हणा !
लिंगायत आणि वीरशैव वेगळे आहेत, असा भेद निर्माण करण्यात आला. लिंगायत हिंदूंपासून भिन्न नाहीत, ते अभिन्नच आहेत. लिंगायत नाही, तर ते ‘वीरशैव लिंगायत’ आहेत. लिंगायत हा रूढ झालेला शब्द असून सहज बोली भाषेतून आलेला आहे. वास्तविक त्यांना ‘वीरशैव लिंगायत’ म्हणायला हवे. लिंगायत रूढीतून आलेला शब्द आहे; पण ग्रांथिक शब्द तर ‘वीरशैव’ हाच आहे. त्यामुळे सर्वांनी ‘वीरशैव लिंगायत’ असेच संबोधले पाहिजे आणि वीरशैव लिंगायत हिंदूंचाच एक भाग आहेत. हिंदूंच्या काही आचारपद्धती आहेत. आम्ही विभूती लावतो, तर वीरशैव गंध लावतात, म्हणजे सर्व टिळा लावतात. सर्व पूजापाठ करतात. सर्व वेदोक्त मंत्रांप्रमाणे आपण उपचार करतो.’
– पूज्य श्री ष.ब्र.प.१०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, मठाधिपती, गणाचार्य मठ संस्थान, मुखेड, नांदेड.
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !