वार्षिक ३ सहस्र रुपयांऐवजी आता मिळणार १ लाख रुपये

मुंबई – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’ची देखभाल आणि दिवाबत्ती यांसाठी देण्यात येणार्या शासकीय अनुदानात तब्बल ५५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाढ करण्यात आली आहे. महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ऐतिहासिक मंदिराला पूर्वी मिळणार्या वार्षिक ३ सहस्र रुपयांच्या अनुदानात वाढ करून आता प्रतिवर्षी १ लाख रुपये इतके अनुदान संमत करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकमेव असे श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. या ऐतिहासिक मंदिराचे व्यवस्थापन ‘श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यास’ (सिंधुदुर्ग किल्ला विश्वस्त मंडळ) पहाते. या मंदिराची प्रतिदिन पूजाअर्चा, देखभाल आणि दिवाबत्ती करण्यासाठी महसूल विभागाकडून १ एप्रिल १९७० च्या शासकीय ठरावानुसार प्रतिमहिना अवघे २५० रुपये म्हणजेच वार्षिक ३ सहस्र रुपये इतकीच रक्कम दिली जात होती. गेल्या ५५ वर्षांत महागाई गगनाला भिडलेली असतांनाही आणि अनेक सरकारे पालटली, तरी या अनुदानात एक रुपयाचीही वाढ करण्यात आली नव्हती, ही खेदाची बाब होती.
कालानुरूप मंदिरातील पुजारी आणि इतर सेवेकरी यांचे मानधन, प्रतिदिनचा दिवाबत्तीचा वाढता खर्च, तसेच मंदिराच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे शिवकालीन उत्सव आणि शिवजयंती सोहळा यांसाठी हे जुने अनुदान अत्यंत अपुरे पडत होते.
या पार्श्वभूमीवर, शिवराजेश्वर देवस्थान न्यासाच्या विश्वस्तांनी १४ फेब्रुवारी २०२० या दिवशी शासनाकडे सविस्तर निवेदन देऊन अनुदान वाढवण्याची आग्रही विनंती केली होती, तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकार्यांनीही वर्ष २०२५ मध्ये सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता.
सुधारित अनुदानाचे हे नवे दर बुधवार, २० मे २०२६ पासून लागू झाले आहेत. या खर्चाचे प्रावधान कोकण विभागीय आयुक्तांच्या अधिनियमातील विशेष लेखाशीर्षातून केले जाणार आहे. शिवछत्रपतींच्या पावन स्मृती जतन करणार्या या मंदिराच्या अनुदानात वाढ करावी, अशी अनेक दशकांपासून मागणी प्रलंबित होती. यावर विद्यमान शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण राज्यातील शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि मंदिर देवस्थान न्यास यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
२७ जून : शिवराज्याभिषेक (हिंदुसाम्राज्य) दिन !
आद्यगोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या हस्ते अनावरण !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री