रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील देवपूजेसाठी लागणारी फुले आणण्याची सेवा करतांना साधकाला झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती !

‘श्री गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे मी २ वर्षांपासून देवपूजेसाठी फुले आणण्याची सेवा करत आहे. मी प्रतिदिन पहाटे लवकर उठून लागवडीत जाऊन फुले काढतो. नंतर मी ही फुले मोजून त्यांचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून संतांना, ध्यानमंदिरातील देवतांच्या पूजेसाठी, तसेच विविध ठिकाणी सेवा करत असलेल्या साधकांना देतो. ही सेवा करतांना मला झालेले लाभ आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

१. सेवा करतांना झालेले लाभ  

१ अ. शारीरिक लाभ : ‘मला सकाळी ६ वाजता लवकर उठण्याची चांगली सवय लागली. मी लागवडीत जाऊन फुले आणत असतांना माझा नियमितपणे चालण्याचा व्यायाम होतो. मला पहाटेच्या शुद्ध हवेचा लाभ होतो. मला निसर्गदेवतेचे सुंदर दर्शन घडते.

१ आ. मानसिक लाभ : सेवा करतांना माझे मन अधिक एकाग्र होते. माझे मन दिवसभर प्रसन्न आणि उत्साही रहाते.

१ इ. आध्यात्मिक लाभ : ‘गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सतत आपल्या समवेत आहेत’, याची मला प्रत्येक क्षणी अनुभूती येते. मला या सेवेच्या माध्यमातून संतसेवा करण्याची संधी मिळते. माझे मन निर्विचार होऊन आनंद मिळतो. मी झाडावरून फुले काढत असतांना माझा नामजप चालू होतो.

२. आलेल्या अनुभूती 

श्री. शिवप्रसाद कब्बुरे

अ. एकदा एका संतांना विशिष्ट प्रकारची अनुमाने २० फुलांची आवश्यकता होती; मात्र त्या दिवशी ती फुले उपलब्ध नव्हती. माझ्या मनात विचार आला, ‘ही फुले कशी मिळतील ?’ नंतर दुसर्‍या दिवसांपासून ती फुले नियमित उपलब्ध होऊ लागली. यातून ‘निसर्गही संतांना कसा साहाय्य करतो !’, याची सुंदर अनुभूती मला आली.

आ. लागवडीतील भूमी उंच सखल आहे. तेथे दगडही आहेत. तेथे मी पडत असतांना वाचलो आहे. प्रत्येक वेळी ‘गुरुदेवांनीच माझे रक्षण केले’, असे मला अनुभवायला मिळाले.

इ. मी फुले काढत असतांना बर्‍याच वेळा मला लाल मुंग्या चावल्या आहेत. त्या वेळी तीव्र वेदना होत असतांना मी केवळ गुरुदेवांचे स्मरण केल्यावर मला होत असलेल्या वेदना क्षणात न्यून होतात. मला गुरुस्मरणातील शक्तीची नेहमी प्रचीती येते.

ई. काही वेळा इतर सेवांमुळे मला फुले काढून आणायला विलंब झाला, तरीही गुरुदेवांच्या कृपेने विविध प्रकारची फुले, तुळशीची पाने आणि बेलपत्र एकाच ठिकाणी सहजतेने उपलब्ध होतात आणि माझी सेवा वेळेत पूर्ण होते.

‘गुरुकृपेमुळेच ही सेवा मला निर्विघ्नपणे करता येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेमुळे मला या चैतन्यदायी सेवेची संधी मिळते’, त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शिवप्रसाद कब्बुरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(३०.४.२०२६)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक