परेच्छेने वागणार्‍या आणि पंढरपूरच्या पांडुरंगावर अपार श्रद्धा असणार्‍या आरवली, सोन्सुरे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील कै. (सौ.) प्रेमावती प्रभाकर सोन्सुरकर (वय ७५ वर्षे) !

‘३.१.२०२६ या दिवशी सौ. प्रेमावती प्रभाकर सोन्सुरकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (सौ.) प्रेमावती प्रभाकर सोन्सुरकर

१. श्री. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर (कै. (सौ.) प्रेमावती सोन्सुरकर यांचा मुलगा), म्हापसा, गोवा.

१ अ. मुलांना लहानपणापासून साधनेची गोडी लावणे : ‘माझी आई (कै. (सौ.) प्रेमावती सोन्सुरकर) हिने आम्हाला लहानपणापासून साधनेची गोडी लावली. आमच्या आजोबांनी गळ्यात माळ घातल्यामुळे ‘वारकरी’ म्हणून आमची साधना चालू झाली. आई आमच्याकडून हरिपाठ आणि स्तोत्रे म्हणून घेत असे. ती काम करतांना अभंग, ओव्या आणि भक्तीगीते म्हणत असे.

श्री. प्रशांत प्रभाकर सोन्सुरकर

१ आ. पंढरपूरच्या पांडुरंगावर अपार श्रद्धा असणे : मी ६ वर्षांचा असतांना आम्ही पंढरपूरला गेलो होतो. एकादशीला पंढरपूरला पुष्कळ गर्दी असते. आम्ही सर्व जण दिंडीतून नाचत जात होतो. एका काकांनी माझा हात धरला होता. दिंडीत नाचत असतांना काकांनी धरलेला माझा हात सुटला आणि मी आईपासून दूर गेलो. काकांनी आईला सांगितले, ‘‘प्रशांत हरवला आहे.’’ तेव्हा आई म्हणाली, ‘‘पांडुरंग त्याचे रक्षण करील; नाहीतर ‘तो गंगेला मिळाला’, असे मी समजेन.’’ हे सांगून आई दिंडीत नाचत पुढे गेली. तिच्या या श्रद्धेमुळे मला एका चांगल्या व्यक्तीने पोलिसांकडे नेऊन पोचवले. त्यानंतर दीड घंट्याने आई मला न्यायला आली.

१ इ. मुलाला पूर्णवेळ साधना करायला अनुमती देणे आणि साधना करण्यास साहाय्य करणे : मी २० वर्षांचा असतांना आई-वडिलांनी मला सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती दिली. मी १५ वर्षे पूर्णवेळ साधना केली. या कालावधीत त्यांनी मला सणानिमित्त घरी येण्यासाठी कधीही आग्रह केला नाही. ‘‘तुला वेळ असेल, तर तू घरी ये, नाहीतर तू तुझी सेवा कर’’, असे ते म्हणत असत. त्यामुळे मी आनंदाने गुरुसेवा करू शकलो.

१ ई. परेच्छेने वागणे : माझ्या बाबांनी एखादी गोष्ट ऐकली नाही किंवा त्यांना हवे तसे त्यांनी केले, तर आई आपले मत बाजूला ठेवून बाबांना हवे, तसे करत असे. आई परेच्छेने वागत असे. ती ‘माझ्या मनाविरुद्ध झाले’, असे म्हणून कधीही रागावत नसे. आईचा विवाह झाल्यापासून मागील ५१ वर्षे शेवटपर्यंत न कंटाळता आणि आनंदाने आईने बाबांच्या समवेत सर्व कामे केली. ती कोणतेही काम आनंदाने करत असे.

१ उ. पांडुरंगाप्रती भाव – वयाच्या ७३ व्या वर्षी पंढरपूरची वारी पायी करणे : आईला पंढरपूरला चालत जाण्याची तीव्र इच्छा होती. तिची ती इच्छा वयाच्या ७३ व्या वर्षी पूर्ण झाली. आमच्या गावातून पंढरपूरला पायी वारी जाते. त्यांच्या समवेत आई आणि बाबा दोघेही पंढरपूरला जाण्यासाठी निघाले. आईला सर्व जण ‘जाऊ नको’, असे सांगत होते; मात्र तिचा निश्चय ठाम होता. ‘मी पंढरपूरला जाणार आणि पांडुरंग माझ्या समवेत आहे. तोच मला घेऊन जाणार आहे’, असे ती म्हणत होती.’ पंढरपूरला जातांना ‘कोणी थकले, तर चारचाकी वाहनात बसू शकतो’, अशी सुविधा असते; मात्र १२ दिवसांच्या प्रवासात आई एकही दिवस गाडीत बसली नाही. तिची प्रकृती नाजूक आहे; मात्र तिला कोणताही त्रास झाला नाही. आईने संपूर्ण वारी पायी चालत केली; म्हणून दिंडीच्या प्रमुखांनी आईचा सत्कार केला.’

२. सौ. प्रार्थना प्रशांत सोन्सुरकर (कै. (सौ.) प्रेमावती सोन्सुरकर यांची सून), म्हापसा, गोवा.

२ अ. कुणी कसेही वागले, तरी त्यांच्याशी चांगले वागणे : ‘आई (माझ्या सासूबाई) ‘सतत वर्तमान स्थितीत राहिले पाहिजे’, असे म्हणत असत. त्यांना एखाद्या व्यक्तीने त्रास दिला, तरीही त्या त्यांच्याशी चांगलेच वागत असत. ‘‘देव काय ते बघून घेईल !’’, असे त्या म्हणत असत. त्या जसे बोलायच्या, तसेच त्या शेवटच्या क्षणापर्यंत वागल्या. आईंनी कोणाविषयीही नकारात्मक विचार केला नाही.

सौ. प्रार्थना प्रशांत सोन्सुरकर

२ आ. प्रेमभाव :आई स्वयंपाक चांगला बनवत असत. घरी कुणीही आले, तरी त्या सर्वांचे प्रेमाने आदरातिथ्य करत असत.

२ इ. व्यवस्थितपणा :आई घरातील कामे व्यवस्थितपणे करत असत. त्या नेहमी घर स्वच्छ ठेवत असत. त्या भाजी नेहमी बारीक चिरत असत.

२ ई. संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास : आईंना पुष्कळ गोष्टींचे ज्ञान होते. त्यांना आजूबाजूचे लोक माहिती विचारत असत. आईंचा आपली संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास होता.

२ उ. देवाप्रती श्रद्धा : आईंची देवाप्रती पुष्कळ श्रद्धा होती. त्या प्रत्येक सोमवारी कोकणेश्वराच्या मंदिरात चालत जात असत. ते मंदिर आमच्या घरापासून २ कि.मी. अंतरावर आहे. त्यांना चालत जाण्याचा कधीच कंटाळा येत नव्हता.

२ ऊ. आईंना त्यांच्या इच्छेप्रमाणे मरण येणे : आई सर्वांना सांगत असत, ‘‘मला बसलेल्या ठिकाणीच आणि अहेवपणी (सुवासिनी असतांना) मरण येऊ दे. माझा कुणालाही त्रास होता कामा नये.’’ देवाच्या कृपेने त्यांचे झोपेतच निधन झाले आणि त्यांना अहेवपणी मरण आले.

२ ए. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

१. ३.१.२०२६ या दिवशी सायंकाळी ५ वाजता आईंचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या वेळी नक्षत्रही चांगले होते.

२. आईंच्या निधनाच्या दिवशी सकाळपासूनच आम्हा दोघांना (मला आणि माझे यजमान श्री. प्रशांत यांना) जरा वेगळे वाटत होते. ‘नेमके काय ?’, ते आम्हाला समजत नव्हते. आम्ही रात्री १० वाजता सोन्सुरे येथील घरी पोचलो, तेव्हा आम्हाला आईंचे निधन झाल्याविषयी समजले. परम पूज्य गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे आम्ही सावरलो.

३. त्या वेळी माझा आतूनच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप होऊ लागला. त्यानंतर हळूहळू माझे मन शांत होऊ लागले. माझी दत्तमाऊलीला ‘आईंच्या आत्म्याला गती मिळू दे’, अशी प्रार्थना होऊ लागली. आम्ही नामजप करत होतो. त्यामुळे आम्हा दोघांनाही स्थिर रहाता आले.

४. आम्ही रात्रभर आईंच्या समोर बसून होतो. घरातील वातावरण पुष्कळ शांत वाटत होते. ‘त्या शांतपणे झोपल्या आहेत’, असे आम्हाला वाटत होते.’

३. श्री. स्वप्नील सुरेश सोन्सुरकर (कै. (सौ.) प्रेमावती सोन्सुरकर यांचा पुतण्या), सोन्सुरे, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग.

श्री. स्वप्नील सुरेश सोन्सुरकर

अ. ‘माझी काकू (कै. (सौ.) प्रेमावती सोन्सुरकर) नेहमी हसतमुख असे.

आ. काकूने मोठ्या सुखाची कधीच अपेक्षा केली नाही. ती मिळेल त्यात समाधान मानत असे.

इ. मी लहान असल्यापासून ते आतापर्यंत तिने माझ्यावर केलेले चांगले संस्कार माझ्या कायम लक्षात रहातील.

ई. काकूला जुन्या गोष्टी, रूढी, परंपरा, रिती-रिवाज यांचा अभिमान होता. ती ‘आपल्या पिढीपासून चालत आलेले रिती-रिवाज, रूढी आणि परंपरा’ यांविषयी पुढच्या पिढीला पुष्कळ मायेने समजावून सांगत असे.

उ. तिने ‘आयुष्यात आलेल्या लहान-मोठ्या प्रत्येक संकटाला न घाबरता निर्भयपणे सामोरे कसे जायचे ?’, याविषयी स्वतःच्या उदाहरणातून अनेक लोकांना शिकवले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १७.४.२०२६)