सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांचा देहत्याग आणि त्यानंतरचा प्रवास यांचे सूक्ष्म परीक्षण !

सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९२ वर्षे) यांनी २२.१२.२०२५ या दिवशी देहत्याग केला. त्यांचा देहत्याग आणि त्यानंतरचा प्रवास यांच्या सूक्ष्म परीक्षणाचा पहिला भाग ७ जानेवारी २०२६ या दिवशी प्रसिद्ध झाला होता. २२ मे २०२६ या दिवशी त्यांच्या देहत्यागाला ५ मास पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सूक्ष्म परीक्षणाचा दुसरा भाग येथे देत आहे.       

(भाग २)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पू. दातेआजींचा आदि भ्रम आणि अनादि भ्रम दूर करून त्यांना अनुक्रमे आत्मज्ञान अन् ब्रह्मज्ञान देणे

सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी

‘१५.३.२०१५ या दिवशी पू. दातेआजींना ‘संत’ म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचा ‘आदि भ्रम’, म्हणजे ‘मी म्हणजे स्थूलदेह आहे’, हा भ्रम दूर केला. त्यानंतर गुरुदेवांनी पू. आजींना ‘आत्मज्ञान’, म्हणजे ‘मी देह नसून परमेश्वराचा अंश असलेला आत्मा आहे’, हे दिव्य ज्ञान दिले. त्यामुळे संत झाल्यावर त्या ‘सोऽहं’भावात होत्या, म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, याची अनुभूती सतत घेत होत्या. त्यामुळे पू. दातेआजी संत झाल्यापासून त्यांच्या देहातील अनाहतचक्राच्या ठिकाणी आत्मज्ञानाचे निळसर पिवळ्या रंगाचे तेजस्वी वलय कार्यरत झाले होते.

त्यानंतर जून २०२४ पासून जेव्हा पू. दातेआजी बेशुद्धावस्थेत अंथरुणाला खिळून होत्या, तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांचा ‘अनादि भ्रम’, म्हणजे ‘हे संपूर्ण जग सत्य आहे’, हा भ्रम दूर केला, तसेच त्यांना ‘केवळ ब्रह्म सत्य असून हे भौतिक जग म्हणजे माया आहे ’, हे ‘ब्रह्मज्ञान’ दिले. त्यामुळे जून २०२४ मध्ये त्यांच्या कपाळावर ब्रह्मज्ञानाचे प्रतीक असलेले १०० पाकळ्यांचे पिवळे धमक ज्ञानकमळ सूक्ष्मातून उमलले.२३.१२.२०२५ या दिवशी जेव्हा मी पू. (कै.) दातेआजींच्या अंत्यदर्शनाला गेले होते, तेव्हा मला त्यांच्या कपाळावर उमललेल्या १०० पाकळ्यांच्या पिवळ्या धमक ज्ञानकमळाचे सूक्ष्मातून दर्शन झाले.

१०. पू. आजी स्थुलातून बेशुद्ध दिसत असल्या, तरी सूक्ष्मातून त्या ‘योगनिद्रा’ या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेत असल्याचे जाणवणे

जून २०२४ ते २२.१२.२०२५ या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी रुग्णाईत असलेल्या पू. दातेआजींसाठी प्रतिदिन आध्यात्मिक स्तरावरील उपाय केले. त्यामुळे पू. दातेआजींची सुषुम्ना नाडी पुष्कळ जागृत राहून तिच्यात ईश्वरी चैतन्य कार्यरत झाले होते. पू. आजींच्या देहत्यागापूर्वी त्यांचा देह इतका पवित्र झाला की, त्यामध्ये ‘जातवेद’ नावाचा अग्नि कार्यरत झाला. (वेदांनी अग्नीच्या उपासकांना अग्नीच्या ‘जातवेद’, या पवित्र रूपाची उपासना करण्यास सांगितली आहे.) त्यामुळे त्यांचा देह अग्निमय झाला होता, तसेच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीमुळे त्यांचे अस्तित्व ज्ञानमय झाले होते. परिणामी पू. आजी या स्थुलातून बेशुद्ध दिसत असल्या, तरी सूक्ष्मातून त्या ‘योगनिद्रा’ या उच्चतम आध्यात्मिक अवस्थेत असल्याचे मला जाणवले.

११. पू. आजींचा स्थूलदेह ‘प्रयागराज’प्रमाणे तीर्थक्षेत्र झाल्याने ऋषिमुनींनी सूक्ष्मातून पू. आजींच्या सप्तचक्रांवर विराजमान होऊन चैतन्य ग्रहण करणे

पू. दातेआजींच्या देहातील सुषुम्ना नाडीवरील सप्तचक्रे पूर्णपणे जागृत होऊन सक्रीय झाली होती. त्यामुळे त्यांचा स्थूलदेह हा ‘प्रयागराज’प्रमाणे चैतन्यदायी तीर्थक्षेत्र झाला होता. त्यामुळे महर्, जन, तपस् आणि सत्य या लोकांतील ऋषिमुनी पृथ्वीवर सूक्ष्म अन् लघु रूप धारण करून पू. आजींच्या देहातील सप्तचक्रांवर विराजमान झाले होते आणि गाढ ध्यान लावून चैतन्य ग्रहण करत होते. तेव्हा ‘पू. आजींची सप्तचक्रे देवीच्या यंत्राप्रमाणे तेजस्वी आणि गतीमान झाली आहेत’, असे दिसत होत. त्यामुळे अनेक ऋषिमुनींची आध्यात्मिक उन्नती होऊन ते पुढच्या लोकांत गेले.

१२. पू. दातेआजींच्या सप्तचक्रांवर सूक्ष्मातून विराजमान होऊन ध्यान लावणार्‍या ऋषिमुनींचा लोक आणि त्यांची नावे

१३. पू. (कै.) दातेआजींचा दहनविधी हा सोमयागाप्रमाणे पवित्र झाल्याचे जाणवणे आणि पू. आजींच्या पार्थिव देहावर ऋषिमुनी अन् देवता यांनी दैवी फुलांची वृष्टी करून त्यांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करणे

सुश्री (कु.) मधुरा भोसले

पू. दातेआजींचा अंत्यसंस्कारविधी चालू होण्यापूर्वीच त्यांचा देह अग्नीसमान पवित्र झाला होता. त्यामुळे तो स्थुलातूनही पुष्कळ हलका झाला होता. जेव्हा ‘क्रव्याद’ नावाच्या अग्नीने पू. दातेआजींच्या पार्थिव देहाला स्पर्श केला, तेव्हा अग्नीतील रजोगुण नष्ट होऊन तो पूर्णपणे सात्त्विक झाला. त्यामुळे दहनविधीतील ‘क्रव्याद’ नावाच्या अग्नीचे रूपांतर ‘पावक’ नावाच्या पवित्र अग्नीमध्ये झाले. परिणामी पू. आजींच्या पार्थिव देहाचा दहनविधी हा सोमयागाप्रमाणे पवित्र झाल्याचे जाणवत होते. या दहनविधीच्या वेळी पू. आजींच्या पार्थिव देहावर ऋषिमुनी आणि देवता यांनी विविध दैवी फुलांची वृष्टी करून त्यांच्या चरणी पुष्पमय श्रद्धांजली अर्पण केली. तेव्हा वातावरणात यज्ञाची पवित्र विभूती, तसेच गुलाब, चंदन, मोगरा, चाफा इत्यादी फुलांचे दैवी सुगंध सूक्ष्मातून दरवळत होते.

१४. सप्तर्षींनी पू. दातेआजींचा शिवात्मा ‘दिव्यप्रभा’ या विमानातून जनलोकात नेणे आणि तेथे पू. आजींचे स्वागत होणे

पू. दातेआजींची वृत्ती निरागस आणि विरक्त झाली होती. त्यामुळे त्या स्वतःचे सर्व मृत्यूत्तर विधी साक्षीभावाने पहात होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कार विधीनंतर त्यांचा शिवात्मा घेऊन जाण्यासाठी अरुंधतीसहित सप्तर्षी ‘दिव्यप्रभा’ या नावाचे विमान घेऊन आले होते. हे विमान सप्तर्षींच्या योगबळाने सक्रीय झाले आणि पू. आजींच्या ज्ञानबळाने गतीमान होऊन काही क्षणांतच भूलोकातून (पृथ्वीवरून) जनलोकापर्यंत पोचले. तेथे सप्तर्षींनी पू. आजींच्या शिवात्म्याचे स्वागत करून त्यांना आरती ओवाळली आणि त्यांच्या गळ्यात सुवासिक दैवी पुष्पांची माळ घालून त्यांचा सन्मान केला.

१५. ‘जनलोकवासी पू. दातेआजी काही दिवसांनी ‘सद्गुरुपदी’ विराजमान होऊन तपोलोकात जाणार आहेत’, अशी पूर्वसूचना साधिकेला मिळणे

पू. दातेआजींमध्ये आदर्श शिष्याचे सर्व गुण विद्यमान होते. त्यामुळे जनलोकात गेल्यावरही पू. आजींच्या शिवात्म्याची ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ जागृत राहून त्या संतपदाच्या पुढे आध्यात्मिक उन्नती करणार आहेत. त्यामुळे ‘पू. आजींच्या शिवात्म्याने काही दिवस जनलोकात व्यतीत केल्यानंतर त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊन काही दिवसांनंतर त्या ‘सद्गुरुपदी’ विराजमान होणार आहेत. (पू. (कै.) श्रीमती दातेआजी ३१.१२.२०२५ या दिवशी ‘सद्गुरु’ पदी विराजमान झाल्या. – संकलक) त्यानंतर सप्तर्षी पू. आजींच्या शिवात्म्याला ‘तेजस’ नावाच्या यानात बसवून तपोबळाच्या साहाय्याने जनलोकातून तपोलोकापर्यंत नेणार आहेत’, अशी पूर्वसूचना मला मिळाली. त्या तपोलोकात जाऊन पृथ्वीवर होणारे त्यांच्या दशक्रिया विधीचे साक्षीभावाने अवलोकन करणार आहेत. पू. आजी अशा विदेही अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या मनात पृथ्वीवरील मागील जन्मांतील स्थूलदेह किंवा आप्तेष्ट यांच्याविषयी लेषमात्रही आसक्ती उरणार नाही.

१६. पू. (कै.) दातेआजी देहत्यागानंतर जनलोकात निवास करत असतांना आणि काही काळानंतर ‘सद्गुरुपदी’ विराजमान होऊन तपोलोकात गेल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे दैवी घटक

निष्कर्ष : वरील सारणीतून हे लक्षात येते की, संतांमध्ये ‘चैतन्य’ आणि सद्गुरूंमध्ये ‘आनंद’, हे घटक प्रमुख असून ते अन्य घटकांच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात.

१७. पू. दातेआजींच्या चरणी काव्यपुष्पमय श्रद्धांजली !

दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती ।
आत्मज्ञानाची येते प्रचीती अन् तेथे ज्ञानज्योती उजळती ।।

‘विदेही अवस्थेतील पू. (कै.) दातेआजींच्या कृपेने त्यांचा देहत्याग आणि त्यानंतरचा प्रवास याविषयीचे सूक्ष्मतर पैलू भगवंताने आम्हाला उलगडून दाखवले आणि हे ज्ञानमोती दिले’, याबद्दल भगवंताच्या चरणी आमचे कोटी कोटी नमन !’

(समाप्त) 

(हे लिखाण पू. (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी ‘सद्गुरु’ होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पू.’ असा केलेला आहे. – संकलक)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक २३.१२.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.