Trump, Netanyahu Differences : इराणवर पुन्हा आक्रमण करण्यावरून ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यामध्ये मतभेद

ट्रम्प यांना युद्ध नको, तर नेतान्याहू आक्रमणाच्या सिद्धतेत !

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणवर पुन्हा आक्रमण करण्याच्या सूत्रावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यामध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. नेतान्याहू यांना इराणवर आक्रमण करायचे आहे, तर ट्रम्प यांना चर्चा आणि करार यांना संधी द्यायची आहे. या दोन्ही नेत्यांनी १९ मे या दिवशी एक घंटा दूरभाषवर चर्चा झाली. या वेळी त्यांच्यात मतभेद झाले.

यापूर्वी ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना कळवले होते की, अमेरिका इराणवर एका नवीन लक्ष्यित आक्रमण करण्याची सिद्धता करत आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन स्लेजहॅमर’ असे नाव दिले जाणार होते. तथापि २४ घंट्यानंतर ट्रम्प यांनी नियोजित असलेले आक्रमण  स्थगित केल्याची घोषणा केली. ट्रम्प म्हणाले की, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या आखाती देशांच्या विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला.

अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याची मागणी : प्रस्ताव संमत

अमेरिकेच्या संसदेत इराणसमवेतचे युद्ध थांबवण्याची मागणी करणारा प्रस्ताव संमत करण्यात आला. ४ रिपब्लिकन खासदारांनीही ट्रम्प यांच्या विरोधात मतदान केले. जर हा कायदा बनला, तर इराणविरुद्ध युद्ध चालू ठेवण्यासाठी ट्रम्प यांना संसदेची संमती घ्यावी लागेल.

आमच्याकडे अजूनही अनेक गुप्त शस्त्रे शेष आहेत ! – इराण

अमेरिकेच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने म्हटले की, त्याच्याकडे अजूनही अनेक अत्याधुनिक शस्त्रे आहेत, ज्यांचा अद्याप युद्धात वापर झालेला नाही. जर पुन्हा आक्रमण झाले, तर या वेळी कोणताही संकोच न बाळगता प्रत्युत्तर दिले जाईल.

इराणच्या संमतीने २६ नौकांनी हॉर्मुझ सामुद्रधुनी केली पार

इराण सैन्याने दावा केला की, गेल्या २४ घंट्यांत २६ नौकांनी इराणच्या संमतीनंतर  हॉर्मुझ सामुद्रधुनी पार केली. यात तेल टँकर आणि व्यावसायिक नौका यांचा समावेश आहे.

संयुक्त अरब अमिरात हॉर्मुझला वगळण्यासाठी नवीन पाइपलाइन घालत आहे ! ‘अबूधाबी नॅशनल आईल कंपनी’ने सांगितले की, हॉर्मुझ सामुद्रधुनीला वगळून जाणार्‍या नवीन तेल पाइपलाइनचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

हॉर्मुझ संकटामुळे अन्न संकटाचा धोका ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने सांगितले की, हॉर्मुझमध्ये अडथळा वाढल्यास जगात अन्न संकट आणि महागाई वाढू शकते. यंत्रणांनी देशांना पर्यायी पुरवठा मार्ग सिद्ध करण्याचे आवाहन केले.