सौ. साधना सुतार (पूर्वाश्रमीच्या कु. सविता केरेमणी) या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करतात. या भागात आपण ‘त्यांचे बालपण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट, सौ. साधना यांनी पूर्णवेळ साधना करण्याचा केलेला निश्चय आणि त्यांनी केलेल्या विविध सेवा’, यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

१. जन्म
‘माझा जन्म वर्ष १९८६ मध्ये बेळगाव, कर्नाटक येथे झाला. माझा जन्म होण्याआधी माझ्या आईला आधुनिक वैद्यांनी ‘तुम्हाला मुलगा होणार आहे’, असे सांगितले होते. आईला आधी तीन मुली असल्यामुळे ‘चौथा मुलगाच व्हायला हवा’, असे वाटत होते.
२. बालपणी विविध त्रास आणि अपघात यांतून रक्षण होणे

मी वयाच्या १५ वर्षापर्यंत अनेक प्रकारच्या त्रासांतून वाचले आहे. एकदा मला साप चावला. त्यानंतर एकदा माझ्या डोक्यावर झाडाची मोठी फांदी पडत होती. त्या वेळी त्या फांदीला मी हाताने धरले. अशा प्रकारे मी छोट्या-मोठ्या अपघातांतून वाचले आहे. तेव्हा ‘देवाने साधना करण्यासाठी मला वाचवले’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
३. साधना करण्याचा निश्चय
३ अ. बेळगाव येथे झालेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रथम भेट : अनुमाने वर्ष १९९६ मध्ये मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सभेसाठी आमच्या असोगा (जि. बेळगाव) या गावातून बेळगाव येथे गेले होते. तेव्हा मी १० वर्षांची होते. मी आमच्या गावातील अन्य साधकांच्या समवेत त्या कार्यक्रमाला गेले होते. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे पाहून माझ्या मनात विचार आला, ‘हे एवढे मोठे संत आहेत. मला त्यांना भेटायला आणि त्यांच्याशी बोलायला मिळेल का ?’
३ आ. साधिकेने बहिणीच्या पूर्णवेळ साधना करण्याला आरंभी विरोध करणे; पण नंतर साधिकेचाच पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय होणे : त्या वेळी मला साधनेविषयी विशेष ठाऊक नव्हते. मी माझे शिक्षण, घरातील आणि शेतीची कामे यांमध्ये रमत होते. माझी बहीण कु. गंगा केरेमणी (आताची सौ. आराधना गाडी) त्या वेळी सनातन संस्थेच्या प्रसारसेवेसाठी जात होती. ती स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गही घेत होती. वर्ष २००० मध्ये ती पूर्णवेळ साधना करू लागली. त्या वेळी माझे शिक्षण चालू होते. तेव्हा मी तिला साधनेसाठी विरोध करत होते. नंतर मलाही ‘पूर्णवेळ साधना करावी’, असे वाटू लागले; पण आई-बाबांची तशी इच्छा नव्हती. असे असले, तरी माझा साधनाच करण्याचा निश्चय झाला होता.
३ इ. सेवेला आरंभ
३ इ १. बेंगळुरू सेवाकेंद्रातील स्वयंपाकादी अनेक सेवा दायित्व घेऊन सांभाळू लागणे : एकदा मला बेंगळुरू येथे सेवेसाठी जायचे होते; पण तिथे जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. बेंगळुरू येथील सेवाकेंद्रात जाता यावे, यासाठी पैसे मिळवण्यासाठी मी घराजवळ असलेल्या एका शेतात एक आठवडा मजुरीचे काम केले. त्यातून मिळालेल्या पैशातून साधकांच्या साहाय्याने मी रेल्वेचे आरक्षण केले आणि बेंगळुरूला पोचले. बेंगळुरू सेवाकेंद्रात गेल्यावर आधी मला स्वयंपाक इत्यादी करायला जमत नव्हते; पण मी पंधरा दिवसांत स्वयंपाक करण्यास शिकून घेतले आणि ३५ ते ५० साधकांचा स्वयंपाक करू लागले. ‘बाजारातून धान्य, भाज्या आणणे, स्वयंपाकाचे नियोजन करणे आदी सर्व सेवांचे पूर्ण दायित्व घेऊन मी त्या सांभाळू लागले. तेथील सर्व साधकांनी मला पुष्कळ प्रेम दिले आणि मी त्यांची लाडकी झाले.
३ इ २. ‘बेंगळुरू ते चेन्नई’ हा आगगाडीचा प्रवास एकटीने करून चेन्नई येथे जाणे आणि तेथील साधकांशी पुष्कळ जवळीक होणे : काही कालावधीनंतर मला एक मास चेन्नई येथे सेवेसाठी जायचे होते. तेव्हा मी ‘बेंगळुरू ते चेन्नई’ हा आगगाडीचा प्रवास एकटीनेच केला. मला तमिळ भाषा थोडीसुद्धा समजत नव्हती, तरी चेन्नई येथील साधकांशी माझी पुष्कळ जवळीक झाली. त्यांना ‘मी त्यांची मुलगीच आहे’, असे वाटत होते. त्यांना माझ्याविषयी एवढे प्रेम वाटू लागले की, मला ते साधक परत पाठवण्यास सिद्ध नव्हते.
४. चेन्नई येथील रमण महर्षींच्या आश्रमातील अनुभव
४ अ. रमण महर्षींच्या आश्रमात प.पू. भक्तराज महाराज यांच्या अस्थी ठेवलेल्या स्थानाचे दर्शन घेतल्यावर पुष्कळ आनंद होणे : चेन्नई येथे असतांना मी एकदा साधकांसमवेत रमण महर्षींचा आश्रम पहाण्यासाठी तिरुवण्णामलई येथे गेले होते. तेथे मला प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचे छायाचित्र दिसले. त्यांचे छायाचित्र पाहून आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटले. त्याविषयी तेथील भक्तांना विचारल्यावर समजले की, ‘तेथे प.पू. बाबा येणार होते; पण त्याआधीच त्यांनी देह ठेवला. त्यामुळे ते तेथे पोचू शकले नाहीत. नंतर प.पू. रामानंद महाराज यांनी तेथे प.पू. बाबांच्या थोड्या अस्थी आणून ठेवल्या आणि तेथे तुळशीवृंदावन बांधले.’ हे आमच्यासाठी एक आनंददायी दर्शन होते.
४ आ. ‘प.पू. भक्तराज महाराज डॉ. आठवले यांचे गुरु आहेत आणि आम्ही डॉ. आठवले यांचे साधक आहोत’, असे समजल्यावर तेथील भक्तांनी आम्हाला देवस्थानाच्या गर्भगृहात जाऊन देवाचे दर्शन घेण्याची सोय करून दिली. ही आमच्यावरील मोठी गुरुकृपाच होती; कारण ही सोय सर्वांसाठी नव्हती.
४ इ. स्वामीजींनी दिलेला आशीर्वाद ! : त्या आश्रमाच्या आवारात फिरत असतांना आमची एका स्वामीजींशी भेट झाली. ते स्वामीजी मला म्हणाले, ‘‘तुला अन्नपूर्णादेवीचे आशीर्वाद आहेत. तू जे काही करशील, ते द्विगुणित होईल आणि कधी अल्प पडणार नाही.’’
(क्रमशः)
– सौ. साधना सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२६)
———————————————————————————-
लेखाचा पुढील भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1041834.html
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !