१९.५.२०२६ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात आपण ‘सौ. साधना सुतार यांचे बालपण, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी झालेली प्रथम भेट, त्यांचा पूर्णवेळ साधना करण्याचा झालेला निश्चय आणि त्यांनी साधनेला केलेला आरंभ’, यांविषयीची सूत्रे पाहिली. या भागात आपण ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी नवीन सेवा शिकण्यासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यांची अनुभवलेली प्रीती आणि त्यांनी शिकवलेली सूत्रे’, यांविषयीची माहिती पाहूया.
लेखाचा मागील भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/1041616.html
(भाग-२)

५. बेंगळुरू सेवाकेंद्रात अनेक सेवा उत्साहाने आणि सक्षमपणे करणे
नंतर चेन्नई येथील सेवा पूर्ण करून मी बेंगळुरू येथे परतले. तेथील सेवाकेंद्रात मी ‘दोन वेळचा अल्पाहार आणि दोन वेळचा स्वयंपाक बनवणे, आश्रमस्वच्छता, तसेच भांडी घासणे इत्यादी सर्व सेवा एकटीच सक्षमपणे करत होते. त्या वेळी मला नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा पुष्कळ उत्साह असायचा.

६. सुखसागर, फोंडा, गोवा येथील सेवाकेंद्रात आल्यावर केलेल्या सेवा
६ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा स्वयंपाक करण्याची संधी मिळणे : वर्ष २००३ – २००४ मध्ये मी आणि माझी बहीण सौ. आराधना हिचे साधनेसाठी बेंगळुरूहून सुखसागर, गाेवा येथील सनातनच्या सेवाकेंद्रात जाण्याचे नियोजन झाले. तेथे उत्तरदायी साधकांनी आम्हाला प्रसाराला जाणे, सत्संगाला जाणे इत्यादी सेवा शिकण्यास सांगितले. त्यानंतर २ मास मला स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी मिळाली. नंतर मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी स्वयंपाक बनवणे, तसेच त्यांच्या खोलीची स्वच्छता करणे, या सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा गुरुदेवांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या.
६ आ. सेवाकेंद्रात येणार्या संतांसाठी स्वयंपाक करण्याची संधी मिळून त्यांचा आशीर्वाद मिळणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटायला येणारे संत, उदा. प.पू. आबा उपाध्ये, योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन, प.पू. परुळेकर महाराज आदी संतांसाठीही स्वयंपाक बनवण्याची संधी मला मिळाली. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मी त्यांचा स्वयंपाक एकटी करू शकायचे. मला या सर्व संतांचे साधनेसाठी आशीर्वाद मिळाले.
७. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रेमाने दिलेली शिकवण
७ अ. शुद्ध मराठी बोलायला शिकवणे : मी कर्नाटकमधील असल्याने मराठी भाषा अशुद्ध बोलत असे. तेव्हा गुरुदेवांनी माझ्या बोलण्यातील चुकलेले शब्द सुधारून मला शुद्ध बोलायला शिकवले.
७ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘त्यांना वाढलेले जेवण थंड आहे’, ही जाणीव करून देतांना ‘दुसर्यांना जेवण वाढतांना ते गरम करून वाढायला हवे’, असे प्रेमाने सांगणे : एकदा मी गुरुदेवांचा स्वयंपाक केला; पण काही पाहुणे आल्याने त्यांना जेवणास उशीर झाला. पाहुणे गेल्यावर मी थंड झालेला स्वयंपाक तसाच घेऊन त्यांना वाढायला गेले. जेवण वाढल्यानंतर गुरुदेवांना ‘ते थंड आहे’, हे लक्षात आले; म्हणून त्यांनी मला बोलावले आणि पदार्थांच्या भांड्यांना हात लावून पहाण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘आपण थंड जेवण कुणाला कधी वाढतो का ? दुसर्यांना जेवण वाढतांना ते गरम करूनच वाढायला हवे.’’ अशा प्रकारे त्यांनी मला प्रेमाने सांगून शिकवले. या चुकीची जाणीव झाल्यानंतर मी आठ दिवस सतत रडत होते. ‘मी भगवंताला थंड झालेले जेवण दिले. मला हे लक्षात कसे आले नाही ?’ याचे मला वाईट वाटत होते. त्यानंतर ‘यापुढे वाढतांना मी प्रत्येक व्यक्तीला गरम जेवणच वाढीन’, असा मी दृढ निश्चय केला. त्यानंतर आतापर्यंत मी ही चूक पुन्हा होऊ दिली नाही.
७ इ. सेवा परिपूर्ण करण्याविषयी सांगितलेले सूत्र : मी प.पू. गुरुदेवांच्या खोलीची स्वच्छता करत असतांना ते मला विचारायचे, ‘‘सेवा करतांना तुझ्या मनात कोणते विचार असतात ?’’ त्यांनी पुढे सांगितले, ‘‘निर्विचार स्थितीत किंवा अनुसंधानात राहून सेवा केली, तर ती परिपूर्ण होते.’’
७ ई. प.पू. डॉक्टरांनी साधिकेला केर काढण्यामागील शास्त्र समजावून सांगणे : मी खोलीची स्वच्छता करत असतांना काही वेळा प.पू. डॉक्टर मला साहाय्य करत असत. ते मला ‘केर काढतांना झाडू कसा धरायचा ? कुठल्या दिशेने केर काढायचा ? केर खाली बसून का काढू नये. तो वाकून का काढायचा ?’ यामागील शास्त्रही समजावून सांगत असत.
साधिकेचा वाढदिवस लक्षात ठेवून प.पू. डॉक्टरांनी प्रत्येक वर्षी तिला नवीन पोषाख किंवा एखादी भेटवस्तू देणे

मी खेडेगावात राहिले असल्याने आम्ही कधीच आमचे वाढदिवस साजरे केले नव्हते. आश्रमात आल्यानंतर साधक आमचे वाढदिवस प्रेमाने साजरे करायचे. प्रारंभी प्रतिवर्षी वाढदिवसाला प.पू. डॉक्टर मला नवीन पोषाख किंवा एखादी वस्तू भेट म्हणून द्यायचे आणि मला ‘पोषाख आवडला कि नाही ? तुला आणखी काही आणायचे आहे का ?’, असेही विचारायचे. माझ्या एका वाढदिवसाला प.पू. डॉक्टर मिरज, सांगली येथील सनातनच्या आश्रमात होते. माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच ते तिथून गोव्याला परत येणार होते. त्यांनी माझा वाढदिवस लक्षात ठेवून येतांना माझ्यासाठी एक नवीन पोषाख आणला होता. अशा प्रकारे मी त्यांची प्रीती प्रत्येक क्षणी अनुभवत होते.
– सौ. साधना सुतार
८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती
८ अ. गुरुदेवांना थालीपीठ देतांना ‘ते मोडत आहे’, असे सांगितल्यावर त्यांनी ‘थालीपीठ मोडूनच खायचे असते आणि याची चव छान आहे’, असे साधिकेला सांगणे : गुरुदेवांना ‘चांगले पदार्थ खायला मिळावेत’, यासाठी मी अनेक नवीन नवीन पदार्थ करण्यास शिकले. नवीन पदार्थ शिकण्यासाठी मी वेगळे ग्रंथवाचन करायचे आणि त्याप्रमाणे पदार्थ बनवण्यास शिकायचे. पदार्थ बनवल्यावर तो मी प्रथम गुरुदेवांना देत असे. गुरुदेव तो पदार्थ आवडीने खायचे. एक दिवस मी प्रथमच थालीपीठ बनवले. त्यात मोहन (पिठात गरम करून घालायचे तेल) अधिक झाल्यामुळे ते खुसखुशीत झाले होते. त्यामुळे त्याचे तुकडे पडत होते. मी प.पू. डॉक्टरांना थालीपीठ वाढतांना ‘थालीपीठ मोडत आहे’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘थालीपीठ मोडूनच खायचे असते ना ! याचे तुकडे पडलेले असले, तरी चव छान आहे.’’
८ आ. सतत साधकांचा विचार करणे : सकाळी बनवलेला एखादा पदार्थ शिल्लक राहिला असल्यास प.पू. डॉक्टर तो पदार्थ रात्रीसाठी ठेवायला सांगत. तेव्हा ‘साधकांना पुन्हा पदार्थ बनवण्याचा त्रास होऊ नये’, असा त्यांचा विचार असायचा.
८ इ. प.पू. डॉक्टरांची साधिकेच्या कुटुंबियांवरील प्रीती ! : मी घरी जायचे. तेव्हा प.पू. डॉक्टर मला सांगायचे, ‘‘घरी गेल्यावर कुटुंबियांना वेगवेगळे पदार्थ करून दे आणि ते करण्यासाठी लागणारे साहित्य येथूनच घेऊन जा; कारण ते तेथे मिळणार नाही.’’
८ ई. रामनाथी, गोवा येथील आश्रमाचे बांधकाम चालू असतांना तेथे केलेल्या सेवा पाहून गुरुदेवांना कौतुक वाटणे : आम्ही फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’ सेवाकेंद्रातून रामनाथी येथील आश्रमात आलो. तेव्हा आश्रमाचे बांधकाम चालू होते. त्या वेळी बांधकामाच्या अनुषंगाने सामूहिक सेवा असायची. ‘बांधकामाच्या विटा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेणे, माती काढणे, वाळू चाळणे’ इत्यादी सेवा असायच्या. एकदा मी लाद्यांना ‘पॉलीश’ करण्याच्या यंत्राने भोजनकक्षातील लाद्यांचे ‘पॉलीश’ केले. तेव्हा आमची ही सेवा पाहून गुरुदेवांना कौतुक वाटले.
(क्रमश:)
– सौ. साधना सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२६)
——————————————————————-
लेखाचा पुढील भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1042172.html
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !