स्वयंसूचनांचे सत्र करतांना आनंद जाणवण्याचे कारण आणि नवीन स्वयंसूचना बनवण्याचे महत्त्व साधिकेला श्रीकृष्णाने सूक्ष्मातून सांगणे

१. स्वयंसूचनांचे सत्र करतांना मन एकाग्र होऊन आनंद जाणवणे आणि श्रीकृष्णाने त्याचे कारण सांगणे 

कु. मधुरा देशपांडे

‘२४.४.२०२३ या दिवशी मी स्वयंसूचनांचे सत्र आणि प्रार्थना करत असतांना श्रीकृष्णाच्या कृपेने माझे मन एकाग्र झाले. त्या स्थितीत मला एक आनंददायी ओढ जाणवत होती. मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाला विचारले, ‘हे श्रीकृष्णा, आज मला असे का होत आहे ? एरव्ही मी स्वयंसूचना देतांना मला अशी स्थिती कधीच अनुभवायला आली नाही.’ तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘जेव्हा तुझ्या मनाला आनंद जाणवतो, तेव्हा मन आपोआपच आनंद देणार्‍या त्या कृतीवर एकाग्र होते. हा आनंद मानसिक स्तरावर असणार्‍या सुखासारखा नसतो. मानसिक स्तरावरच्या सुखात मन अडकून रहाते. त्यामुळे व्यक्तीतील स्वभावदोष उफाळून येतात. आध्यात्मिक स्तरावरील आनंद शुद्ध स्वरूपात असल्यामुळे तो व्यक्तीला त्यात गुंतू किंवा अडकू देत नाही.’

१ अ. आत्म्याला लागलेल्या आनंदाच्या ओढीमुळे तो साधनेकडे खेचला जाणे आणि साधनेच्या ज्या अंगावर त्याचे मन एकाग्र होते, ते अंग परमेश्वराशी जोडणारा दुवा बनणे : श्रीकृष्णाच्या कृपेने ही स्थिती अनुभवतांना माझ्या लक्षात आले, ‘माझे मन मी देत असलेल्या स्वयंसूचनांमध्ये एकाग्र झाले होते. स्वयंसूचना ही एका सूक्ष्म आणि वेगळ्याच स्तरावर कार्य करते. त्या माध्यमातून मला ईश्वर आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवले.’

श्रीकृष्णाने हेही माझ्या लक्षात आणून दिले, ‘ऋषिमुनी आणि इतर उन्नत जीव दीर्घकाळापर्यंत साधनेत मग्न रहातात. त्यांचे साधनेतील सातत्य टिकून रहातो; कारण त्यांचा आत्मा त्या दिव्य आनंदाची अनुभूती घेत असतो. त्यामुळे तो त्या आनंदाकडे आपोआप आकर्षिला जातो. तसेच तो आनंद पुनःपुन्हा अनुभवण्याची तीव्र इच्छा त्यांच्या अंतःकरणात निर्माण होते.’

‘जेव्हा आत्म्याला आनंदाची ओढ लागते आणि त्या आनंदामुळे तो साधनेकडे खेचला जातो, तेव्हा त्याचे मन साधनेवर आपोआपच एकाग्र होते. तसेच साधनेचे ते अंग (स्वयंसूचना) हा परमेश्वराशी जोडणारा दुवा बनतो’, हे मला उमगले.’

२. श्रीकृष्णाने स्वयंसूचना पालटण्याचे महत्त्व सांगणे 

२९.५.२०२३ या दिवशी मी स्वयंसूचना देत असतांना माझ्या लक्षात आले की, मी नवीन स्वयंसूचना न बनवता जुन्या स्वभावदोषावरच स्वयंसूचना देत आहे. (‘एखाद्या स्वभावदोषावर काही कालावधीसाठी स्वयंसूचना दिल्याने तो उणावतो. अशा वेळी साधक नवीन स्वभावदोषावर स्वयंसूचना बनवून ती देतात.’ – संकलक) त्या वेळी श्रीकृष्णाने मला स्वयंसूचना देण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले, ‘नवीन स्वयंसूचना बनवल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कार्यरत होतो. त्यामुळे त्यातील शब्दांमध्ये चैतन्य प्रवाहित होऊन त्या शब्दांभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते. परिणामी नवीन स्वयंसूचनेमधून उत्साह आणि सात्त्विकता यांच्या लहरी प्रक्षेपित होतात. जेव्हा एखादा साधक नवीन स्वयंसूचना बनवत नाही, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कार्यरत होत नाही. त्यामुळे त्या शब्दांमध्ये चैतन्य प्रवाहित होत नाही. परिणामी त्या शब्दांतील सकारात्मकतेचा र्‍हास होतो आणि मनाला जडपणा अन् आळस जाणवू लागतो. अशा प्रकारे आपण देत असलेल्या जुन्या स्वयंसूचनांचे कार्य खुंटते.’

– कु. मधुरा उदय देशपांडे, एशिया पॅसिफिक (१९.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक