ओमानच्या समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : जीवितहानी नाही

नवी देहली – आखाती देश ओमानच्या समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर १३ मे या दिवशी आक्रमण करण्यात आले. या आक्रमणाचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निषेध करत ‘ही घटना अस्वीकारार्ह आहे. या भागात व्यापारी नौकांवर आणि नागरी वाहतुकीवर होणारी आक्रमणे चिंताजनक आहेत’, असे म्हटले. या नौकेवर असणारे भारतीय सदस्य सुखरुप असून तात्काळ साहाय्य देणार्‍या ओमान प्रशासनाचे भारताने आभार मानले.

१३ भारतीय नौका पर्शियाच्या आखातामध्ये अडकल्या

भारतीय नौका हॉर्मुझ सामुद्रधुनीमधून (दोन मोठ्या जलसाठ्यांना (उदा. समुद्र, महासागर) जोडणारा अरुंद जलमार्ग) सुरक्षितपणे बाहेर पडावेत, यासाठी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय काम करत आहे. सध्या १३ भारतीय नौका पर्शियाच्या आखातामध्ये अडकून पडल्या असून त्या प्रवासाच्या अनुमतीची वाट पाहत आहेत.