
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ।’, म्हणजेच ‘वृक्षवल्ली हेच आमचे खरे सोयरे (नातेवाईक) आहेत.’ आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस केवळ पळत आहे… स्वतःचे आणि कुटुंबियांचे जीवन समृद्ध करण्यासाठी तो धन कमवण्यासाठी मेहनत करत आहे. लोकसंख्या वाढत आहे, वैज्ञानिक प्रगती होत आहे. त्यामुळे शहरे विकसित करावी लागत आहेत. तो समृद्ध तर होत आहे; पण निसर्गाचे काय ? नैसर्गिक संपत्ती तोडून आपण आपले घरकुल उभारत आहोत. जगभरात आणि देशात वेगवान शहरीकरणामुळे प्रचंड जंगलतोड होत आहे. निसर्गाने दिलेले दान मानव केवळ ‘लुटत’ आहे. त्या तुलनेत त्याला तो परत काय देत आहे ?
प्रतिवर्षी उन्हाळा पुष्कळ कडक होत आहे. दुपारी बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. उन्हाळ्याचा पारा काही ठिकाणी ४४ ते ४६ सेल्सिअस आहे. काही नद्या आटल्या आहेत. ही पाणीटंचाई थोड्याच दिवसांत तीव्र रूप धारण करू शकते. पर्वतरांगा ओसाड दिसत आहेत. डोंगर झाडांविना केवळ उन्हाळाची झळ वाढत आहे, असेच वाटते. ‘यंदा पर्जन्यवृष्टी अल्प असेल’, असे तज्ञ सांगत आहेत. जंगलतोड करून झालेला विकास आणि शहरीकरण हे आता सुखावह अन् आवश्यक वाटत असले, तरी आपण आपल्या येणार्या पिढीसाठी सुखसाधनांसह जगण्यासाठी एक ‘जळती भट्टी’ निर्माण करत आहोत, हे एक कटु सत्य आहे.

वाढत्या उष्णतेमुळे आपण वीजनिर्मिती केंद्रे आणि वीज कपातीमुळे प्रशासनावर संताप व्यक्त करतो; पण खर्या अर्थाने आपली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. एकीकडे आपण वातानुकूलन यंत्र लावून थंडावा निर्माण करतो; मात्र त्याच वेळी पर्यावरणात प्रचंड उष्णता सोडून बाहेरील तापमान वाढवतो. हा निव्वळ स्वार्थीपणा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वाहने आणि वीज यांच्या अतीवापरामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. आपण स्वतःला विनाशाच्या जवळ ओढून घेऊन जात आहोत, हे सत्य समजून घेऊन नैसर्गिक वातानुकूलनासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. वृक्षांची सावली, हे एक उत्तम नैसर्गिक वातानुकूलन आहे. ‘वृक्षांची लागवड’ हाच सध्याच्या पर्यावरणाच्या समस्यांवरील खरा उपाय आहे. प्रत्येकाने जरी एक झाड लावले आणि वाढवले, तरी आपण काही प्रमाणात या विश्वासाठी योगदान देऊ शकतो. ‘एक झाड एक व्यक्ती’ ही संकल्पना जगात एक नवीन हरितक्रांती घडवू शकते. महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा झाडे लावण्यास देऊया. सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, सौर ऊर्जेचा स्वीकार करणे, हीच काळाची आवश्यकता आहे. निसर्गाने दिलेल्या संपत्तीचा सांभाळ करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नवीन जग निर्मितीसाठी कृतीशील होऊया आणि वृक्षांना आपलेसे बनवूया !
– श्री. आल्हाद माळगांवकर, पनवेल
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !