अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास यांचे महत्त्व !

१७ मे या दिवशीपासून ‘अधिक मास’ प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने...

१. ‘अधिक मास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ म्हणजे काय ?

‘ज्योतिषशास्त्रामध्ये सौर पंचांगानुसार एका वर्षात ३६५ दिवस, १५ घटी, ३१ पल आणि ३० विपल असतात, तर चंद्रमानानुसार एका वर्षात ३५४ दिवस, २२ घटी, १ पल आणि २३ विपल असतात. अशा प्रकारे आपल्याला असे आढळून येते की, एका वर्षचक्रातील सौर आणि चंद्र वर्षामध्ये अनुमाने ११ दिवसांचे अंतर असते. त्यामुळेच हिंदु कालगणनेत प्रत्येक ३ वर्षांनी एका चंद्र मासाची पुनरावृत्ती करून एक अतिरिक्त मास जोडला जातो. अशा प्रकारे सौर आणि चंद्र वर्षातील हे अंतर नाहीसे होते किंवा न्यून होते. या अतिरिक्त मासाला ‘अधिक मास’ किंवा ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतात. त्यामुळे सौर वर्ष आणि चंद्र वर्ष यांच्यात एक प्रकारचा सुसंवाद राखला जातो अन् मानवी समाजाला वेळेच्या संदर्भात सूर्यमान आणि चंद्रमान दोन्ही कालखंडांचा योग्य लाभ मिळत रहातो.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आपला आत्म्याचा आणि चंद्र हा आपल्या मनाचा कारक समजला जातो. अशा प्रकारे आत्मा (परलोक, म्हणजे मृत्यूनंतरचे जीवन) आणि मन (इहलोक, म्हणजे वर्तमान जग) यांच्यात सुसंवाद रहातो अन् मानवजातीला जीवनात  दोन्ही प्रकारच्या गोष्टी प्राप्त होत रहातात.

२. अधिक मास शुभ कि अशुभ ?

आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्रा

आता प्रश्न असा निर्माण होतो की, अधिक मास शुभ किंवा अशुभ आहे का ? या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सर्व ४ युगे, १२ मास, ६ ऋतू आणि सर्व दिवस यांचे कारक देवता आहेत. तथापि जेव्हा कालगणनेत अधिक मासाचे प्रयोजन करण्यात आले, तेव्हा त्याला ‘मल मास’ म्हणून तुच्छ समजले गेले, ज्याचा अर्थ अस्वीकारार्ह आणि अमान्य असा होतो. त्यामुळे अधिक मास अत्यंत दुःखी झाला. भगवान विष्णूकडे जाऊन त्याने प्रार्थनापूर्वक त्याचे दुःख व्यक्त केले. भगवान विष्णूंनी अधिक मासाला दुःखी न होण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘मनुष्यांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे माझे एक नाव ‘पुरुषोत्तम’ आहे आणि आजपासून तुम्ही ‘पुरुषोत्तम मास’ म्हणून ओळखले जाल. या पुरुषोत्तम मासात केलेले शांतीकर्म आणि आध्यात्मिक कर्मे माझ्याशी संबंधित समजली जातील आणि ती अनंत पुण्यवान आणि श्रेष्ठ असतील.’

३. अधिक मासात काय करावे ?

अ. व्यावहारिक दृष्टीकोनातून कर्मांचे २ प्रकार आहेत.

१. ‘पौष्टिक कर्म’, म्हणजेच सांसारिक व्यवहाराशी संबंधित कर्म

२. शांती कर्म, म्हणजेच पारलौकिक किंवा धार्मिक-आध्यात्मिक गोष्टींशी संबंधित कर्मे. त्यात उपवास, नामजप, ध्यान, उपासना आणि निष्काम यज्ञयाग यांचा समावेश आहे.

आ. अधिक मासात तीर्थयात्रा करावी आणि गंगेत स्नान करावे.

इ. थोर महापुरुष आणि संत यांच्या सहवासात राहून सत्संग प्राप्त करावा.

ई. उपासना आणि साधना यांविषयी अध्ययन करावे.

उ. अधिक मासात दान करण्याला विशेष महत्त्वाचे समजले जाते.

ऊ. धर्मकार्य कार्य आणि मुमुक्षत्व (ईश्वराविषयी तळमळ) यांमध्ये रुची असावी.

ए. अधिक मासात दीपदान आणि ध्वजादान करावे.

ऐ. श्रीराम कथावाचन, भागवत कथावाचन, श्रीमद्भगवद्गीतेतील पुरुषोत्तम अध्याय नामक १४ व्या अध्यायाचे पठण आणि सत्संग करणे पुण्यकारक समजले जाते.

ओ. अधिक मासात भगवान श्रीहरि विष्णूची विशेष पूजा करावी आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ याचा अधिकाधिक जप करावा.

४. अधिक मासात काय करू नये ?

अ. अधिक मासात सांसरिक व्यवहाराशी संबंधित शुभ कार्ये, म्हणजेच विवाह, गृहप्रवेश, उपनयन, मुंडन इत्यादी मांगलिक कार्ये करू नये.

आ. अशुद्ध आचरण टाळावे.

इ. चुकीचे खाद्य आणि पिण्याअयोग्य पदार्थांचे सेवन करू नये.

ई. अधिक मासात नवीन कामाचा शुभारंभ करू नये. तथापि निष्काम भावाने समाजोपयोगी कार्य करण्यास मनाई नाही.

उ. वस्त्र, दागिने, घर, दुकाने, वाहन इत्यादींची खरेदी करू नये. तथापि या मासाच्या मध्यात एखादा शुभ मुहूर्त असल्यास ज्योतिषाचा सल्ला घेऊन दागिने खरेदी करता येतात.

५. यंदाच्या अधिक मासाविषयी काही महत्त्वाची सूत्रे

यावर्षी अधिक मासाच्या स्वरूपात क्रमानुसार ज्येष्ठ मासाची (शुद्ध ज्येष्ठ कृष्ण पक्ष + अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्ष + अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्ष + शुद्ध ज्येष्ठ शुक्ल पक्ष) पुनरावृत्ती होत आहे. अधिक मासाच्या माध्यमातून भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद असतो. या ज्येष्ठ मासातच भगवान विष्णूच्या त्रिविक्रम रूपाची पूजा केल्याने सुख-समृद्धी वाढते.

६. ज्येष्ठ मासातील प्रमुख उपवास आणि सण

अ. गंगा दशहरा : या दिवशी गंगामाता पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे या दिवशी गंगेत स्नान आणि दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, असे समजले जाते.

आ. निर्जला एकादशी : या तिथीला निराहार राहून किंवा पाणी न पिता व्रत करण्याची प्रथा आहे, जो वर्षभरातील सर्व एकादशींचे फळ देतो.

इ. वटसावित्री व्रत : या दिवशी विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात.

ई. शनि जयंती : याच ज्येष्ठ मासाच्या अमावास्येच्या दिवशी कर्माचे अधिपती भगवान शनिदेव यांचा जन्म झाला होता. त्यामुळे हा दिवस ‘शनि जयंती’ म्हणून साजरा केला जातो.

उ. मोठा मंगळ : या मासातील मंगळवार ‘मोठा मंगळ’ म्हणून साजरा केला जातो,  हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी प्रभु श्रीराम आणि हनुमान यांची पूजा केल्याने जीवनात सुख आणि शांती लाभते.

ऊ. जलसेवा आणि दान यांचे पुण्य : या मासात तीव्र उष्णता असते. त्यामुळे वाटसरूंना थंड पाणी देणे, म्हणजेच ‘पाणपोई’ लावणे, सरबताचे वितरण करणे, पंखे आणि सत्तू यांचे दान करणे यांना विशेष पुण्य समजले जाते. यासमवेतच यामासात सूर्याला जल अर्पण करणे, हे  आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

अधिक मास हा आत्मशुद्धी आणि परोपकार यांच्यासाठी विशेष काळ असतो.  त्यामुळे असे म्हणता येईल की, यावर्षीचा ज्येष्ठ अधिक मास आध्यात्मिक साधना, भक्ती, व्रते, उपवास, सण, आरोग्य आणि परोपकार इत्यादींच्या दृष्टीकोनातून विशेष लाभदायक आहे.

– आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चॅप्टर, विश्व ज्योतिष महासंघ, पाटलीपुत्र, बिहार.