वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक २३
वास्तूची अंतर्गत रचना बघतांना आपण आतापर्यंत काही महत्त्वाच्या भागांचे स्थान कुठे असावे, याचा अभ्यास केला. आजच्या लेखामध्ये आपण आलिंद (व्हरांडा), वाहनतळ, तिजोरी आणि तळघर यांच्या वास्तूतील रचनेविषयी माहिती जाणून घेऊया.
लेखांक २२ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1035769.html
१. आलिंद (व्हरांडा)
पूर्वीच्या काळी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर किंवा मागच्या बाजूला मोकळी जागा ठेवली जायची, त्याला ‘आलिंद’ किंवा ‘व्हरांडा’ असेही म्हणतात. काही जुन्या घरांच्या बांधकामांमध्ये आपल्याला तो भाग बघायला मिळतो. त्याची रचना कशी असावी, याविषयीही नियम वास्तूशास्त्रामध्ये सांगितले आहेत.
समोरच्या बाजूस आणि घराच्या उजव्या बाजूस आलिंद घेण्यास वास्तूशास्त्रामध्ये सांगितले आहे. ते सुख वाढवणारे आणि धनवृद्धी करणारे असते. घराच्या मागे आणि पुढे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आलिंद असल्यास त्या घराच्या मालकास उत्तम धनधान्य अन् सौभाग्य यांची प्राप्ती होते.
घराच्या पुढच्या बाजूला आणि उजवीकडे आलिंद घेतल्यास मालकावर राजकृपा होऊन समृद्धी प्राप्त होते; परंतु प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आलिंद घेतल्यास अर्थ नाश, स्त्रियांना त्रास आणि राजदंड इत्यादी फल सांगितले आहे, तसेच घराच्या मागच्या बाजूला द्वाराच्या डाव्या बाजूस आलिंद ठेवू नये. तो दुर्भाग्यपूर्ण आणि आपत्ती ओढवणारा असतो, असे फल ‘समराङ्गण सूत्रधार’ या वास्तूग्रंथामध्ये सांगितले आहे.

२. वाहनतळ
भवनातील कोणत्याही गोष्टीचे स्थान निश्चित करतांना तिचे कार्य, भवनातील त्याचा उपयोग आणि दिशांचे तत्त्व यांचा विचार आपल्याला करावा लागतो. वाहनतळ वायव्य दिशेत असल्यास ती दिशा वायुतत्त्वाची आहे, म्हणजेच चंचल आणि अस्थिर असल्याने वाहने सतत कार्यरत रहातात. त्यानंतर आग्नेय दिशेसही आपण वाहनतळ करू शकतो. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे. त्यामुळे वाहने ऊर्जावान राहू शकतात. नैर्ऋत्य दिशा ही पृथ्वी तत्त्वाची दिशा असल्याने या दिशेत वाहनतळ असल्यास त्यांचा उपयोग घरासाठी अधिक न होता वाहने एकाच जागी उभी रहातात.
३. तिजोरी
वास्तूच्या उत्तर दिशेमध्ये सोमपदामध्ये लक्ष्मीचे स्थान आहे. त्या ठिकाणी तिजोरी ही पूर्व दिशेत उघडणारी असल्यास त्याचा लाभ होतो. पृथ्वीधरपदामध्ये पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे उघडणारी तिजोरी असल्यास धनवृद्धी होते. ‘समराङ्गण सूत्रधार’ या ग्रंथानुसार तिजोरी वरच्या बाजूला उघडणारी नसावी. पश्चिमेकडे उघडणारी असल्यास कटकटी वाढतात. दक्षिणेकडे उघडणारी असल्यास धनक्षय होतो. ज्या गोष्टी स्थिर ठेवायच्या आहेत किंवा जपून ठेवायच्या आहेत, अशा मौल्यवान गोष्टींची तिजोरी ही नैर्ऋत्य दिशेस पूर्वेकडे आणि उत्तरेकडे उघडणारी अशी ठेवावी.
४. तळघर
वास्तूशास्त्रानुसार निवासी वास्तूमध्ये तळघर घेण्यास निषेध आहे; परंतु काही मोठ्या इमारतींमध्ये सध्या तळघर घेतले जाते. त्यामध्ये वास्तूच्या नियमांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दक्षिण, नैर्ऋत्य आणि पश्चिम या भागात खड्डा अन् उतार असू नये. म्हणून तळघर या दिशांमध्ये घेतल्यास त्याचे अनिष्ट परिणाम वास्तूमालकाला भोगावे लागतात. तेच उत्तर ईशान्य आणि पूर्वेस घेतल्यास त्या दिशेत उतार निर्माण होतो. शास्त्रानुसार या दिशांना उतार चालतो. म्हणून त्याचे तुलनेने अल्प परिणाम वास्तूमालकावर होतो. म्हणून तळघर याच दिशांना घ्यावे.
५. ब्रह्मस्थान
वास्तूशास्त्रानुसार वास्तूच्या मध्यभागातील एक नवमांश भाग हा ब्रह्मस्थानाचा असतो. एकूण क्षेत्रफळाच्या ११.२ टक्के भाग एवढा भाग ब्रह्मस्थान असते. ज्याप्रमाणे शरिरामध्ये नाभीचे महत्त्व आहे, तसेच वास्तूमध्ये ब्रह्मस्थानाचे महत्त्व आहे.
ब्रह्मस्थानाचा भाग हा पूर्णपणे मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करावा. तेथे कोणत्याही प्रकारचे वजन, म्हणजेच भिंत, कॉलम, पोटमाळा, पायर्या इत्यादी जड बांधकाम असू नये. हे स्थान जड झाल्यास या ठिकाणच्या आकाशतत्त्वाकडून अन्य तत्त्वांना मिळणार्या ऊर्जेत अडथळा निर्माण होतो. यामुळे वास्तूतील कार्यक्षमता विस्कळीत होते.
यासह ब्रह्मपदामध्ये झोपायची खोली, देवघर, पाण्याची साठवण, स्वयंपाकघर, स्नानगृह, शौचालय आणि खड्डा असू नये. यामुळे ब्रह्ममंडलाला वेध निर्माण होतो. यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे अडथळे निर्माण व्हायला लागतात. घरामध्ये अशांतता, वादविवाद, आजारपण आणि कष्ट इत्यादी परिणाम भोगावे लागतात. म्हणून सर्व प्रयत्न करून ब्रह्मस्थान मोकळे ठेवावे, असे वास्तूशास्त्रकार म्हणतात.
(संदर्भ ग्रंथ : समराङ्गण सूत्रधार, विश्वकर्मप्रकाश, मयमतम् )
– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (६.५.२०२६)
लेखांक २४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1045457.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !