वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक २४
आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण वास्तूमधील विविध भागांच्या अंतर्गत रचना समजून घेतली. या लेखामध्ये चित्रकर्माविषयी माहिती जाणून घेऊया. वास्तूमध्ये सजावटीसाठी विविध चित्रे, मूर्ती ठेवण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. त्याविषयी वास्तूशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. ते आपण जाणून घेऊया.
लेखांक २३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1038056.html

१. चित्रे लावण्याविषयीचे नियम
देवानां च द्विजानां चावासे योग्यं सनातनम् ।
बहिरन्तश्च सर्वेषां चित्रं युन्जीत बुद्धिमान् ।।
सुमङ्गलकथोपेतं श्रद्धानृत्तक्रियान्वितम् ।
विप्रादीनां च वर्णानां निवासं सम्पदां पदम् ।।
संग्रामं मरणं दुःखं देवासुरकथान्वितम् ।
नग्नं तपस्विलीलां चामयाव्यादि न योजयेत् ।।
– मयमतम्, अध्याय १८, श्लोक १०९ ते १११
अर्थ : देवालये, तसेच ब्राह्मणादिकांच्या (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र) निवासस्थानाच्या आतमध्ये अन् बाहेर लावायची चित्रे ही त्यांच्या दृष्टीने योग्य अशीच लावावीत. मंगल कथांचे प्रतिपादन करणारी आणि श्रद्धेने नृत्यादी क्रियांची चित्रे असावीत. अशी चित्रे लावलेली घरे सुख-समृद्धी प्रदान करतात. युद्धाची चित्रे, मृत्यू, दुःख दर्शवणारी घरात लावू नयेत. नग्न चित्रे, देवासुरांच्या कथा असलेली चित्रे, तपस्वींच्या दिव्य लीलांची चित्रे घरात लावू नयेत.
अ. ज्यातून स्फूर्ती घेता येईल, अशी चित्रे घरात लावू शकतो; परंतु मनामध्ये राग, द्वेष आणि वासना जागृत करणारी चित्रे लावू नयेत.
आ. घरामध्ये चित्रे लावतांना वास्तूशास्त्राच्या मूळ नियमांना लक्षात घेऊन लावायला हवीत. जसे उत्तर आणि पूर्व दिशा या अधिक प्रसारित आणि मोकळ्या असणे आवश्यक असते. त्या दिशांना डोंगर आणि मोठे खडक अशी चित्रे नसावीत, तसेच पश्चिम आणि दक्षिण दिशा या बंद असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या दिशांना दूरवर जाणारे रस्ते, जंगल, जलाशय, समुद्र आणि हिरवळ अशी चित्रे लावू नयेत.
इ. वायव्य दिशेमध्ये हलणारी दृश्य असणारी चित्रे लावू शकतो. देव, संत आदींची शुभ स्वरूपातील चित्रे घरात कुठेही लावू शकतो.
ई. उत्तर दिशेमध्ये धबधबा, पूर्वेकडे वहाणारे पाणी, फुलझाडे आणि पुष्पगुच्छ अशी चित्रे लावू शकतो.
उ. दैत्य, ग्रह, तारे, यक्ष, गंधर्व, पिशाच्च, पितर, प्रेत, नाग, भुतांचा समूह, अप्सरा गण यांची चित्रे घरात लावणे वर्ज्य आहेत, तसेच मोकळा झोपाळा आणि राजांच्या लढाया इत्यादी चित्रे घरात लावू नयेत.

२. वृक्षांची वर्ज्य असणारी चित्रे
फळे आणि फुले नसलेली झाडे, एकाकी पक्षी असलेली झाडे, एक किंवा दोनच फांद्या असलेले, रुक्ष, सुकलेले, फांद्या मोडलेले यांची चित्रे लावू नयेत. कदंब, शाल्मली (देवकापूस), शेलू, तार, लुक, राळ इत्यादी झाडांवर अनिष्ट शक्तींचा वास असल्याने या वृक्षांची चित्रे घरात लावू नयेत. कडू आणि काटेरी झाडे यांची चित्रेही घरात असू नयेत.
३. पक्ष्यांची वर्ज्य असणारी चित्रे
गिधाडे, घुबड, कबूतर, ससाणा, कावळा, करकोचा इत्यादी पक्ष्यांची चित्रे घरात लावू नयेत. ती अशुभ असल्याने वर्ज्य आहेत, असे शास्त्रात सांगितले आहे.
४. वन्य प्राण्यांची वर्ज्य असणारी चित्रे
वनातील एकाकी हत्ती, घोडा, उंट, म्हैस, गाढव, माकड, सिंह, वाघ, तरस, डुक्कर, कोल्हा इत्यादींची चित्रे घरात लावू नयेत. अशा चित्रांमुळे आर्थिक हानी सोसावी लागते, तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊन कष्ट भोगावे लागतात. हत्तींचा कळप, घोड्यांचा कळप आणि सजवलेले उंट यांची चित्रे चालतील.
५. कोणती चित्रे असावीत ?
अ. आपल्या उपास्यदेवता, गुरु आणि कुलदेवता यांची चित्रे आपण घरात योग्य ठिकाणी कुठेही लावू शकतो.
आ. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपालांची चित्रे घ्यावीत. हातात वेताची काठी, म्यानासहित तलवार, देखणे, बहुरंगी पोषाख आणि अलंकार परिधान केलेले असे द्वारपालांच्या चित्रांची योजना करावी.
इ. तसेच ‘मुख्य प्रवेशद्वारावर कमळावर बसलेली, भरलेला कुंभ असलेली, रत्न, वस्त्र आदींनी भूषित, पुष्प, छत्र, चामर असलेली अशा मंगलागौरीचे चित्र घराच्या द्वारावर करावे’, असे ‘समराङ्गण सूत्रधार’ या ग्रंथात सांगितले आहे.
(संदर्भ ग्रंथ : मयमतम् आणि समराङ्गण सूत्रधार)
– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२८.५.२०२६)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
‘सनातन क्रांती’ची नांदी !
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !