वास्तूशास्त्रविषयक लेखमाला : लेखांक २२
२५ एप्रिल या दिवशीच्या लेखामध्ये आपण पाणी, सांडपाणी आणि जिना यांचे वास्तूशास्त्रानुसार स्थान कुठे असावे, ते वाचले. या लेखामध्ये आपण घरातील मुख्य सभागृह, स्नानगृह आणि शौचालय यांचे स्थान कुठे असावे, ते पाहूया.
लेखांक २१ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1033383.html
१. सभागृह
वास्तूमध्ये सभागृह हे मुख्य प्रवेशद्वारालगतच असावे. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार ज्या दिशेला आहे, त्या दिशेलाच आपल्याला सभागृह घेणे आवश्यक असते. त्यामुळे सर्वप्रथम मुख्य प्रवेशद्वार योग्य दिशेला असेल, तर सभागृहसुद्धा योग्य दिशेला घेणे सोयीचे होते. सभागृह, म्हणजे वास्तूतील मोकळा भाग, त्यामुळे तो उत्तर-पूर्व भागात असल्यास त्याचा चांगला परिणाम वास्तूवर होतो. आग्नेय दिशा मात्र सभागृहासाठी योग्य नाही, त्यामुळे कामकाजामध्ये अडचणी निर्माण होतात. स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. दक्षिण दिशेला सभागृह असल्यास हानी आणि अस्थिरता प्राप्त होते. व्यवसाय आणि नोकरी यांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. ही दिशा उघडी आणि अधिक खिडक्या असल्यास त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो.
नैर्ऋत्य दिशेमध्ये सभागृह नसावे. घरातील व्यक्तींच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा सर्वच गोष्टींवर विपरीत परिणाम होतात. एका पाठोपाठ एक संकटे निर्माण होतात. नैर्ऋत्य दिशेला सभागृह असले, तर बर्याच वेळा ईशान्य दिशा बंद असते. त्यामुळे शुभ ऊर्जा घरात येण्यास प्रतिबंध निर्माण होतो आणि अशुभ ऊर्जा घरामध्ये साठते.
पश्चिम दिशेस सभागृह असेल, तर प्रगती मंदावते. उत्साह न्यून रहातो. वादविवाद वाढतात. वायव्येला सभागृह चालू शकते; परंतु उघडा भाग हा उत्तर दिशेकडे असला पाहिजे, तर त्याचा लाभ मिळतो.
२. स्नानगृह

स्नानगृहासाठी सर्वांत उत्तम दिशा, म्हणजे पूर्व दिशा ! कारण सकाळी स्नान करतेवेळी पूर्वदिशेकडून येणार्या शुभ ऊर्जेचा लाभ होतो. त्यामुळे पूर्व दिशेप्रमाणेच उत्तर दिशेलाही स्नानगृह लाभदायक असते. स्नानगृहाचा उतार उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा. स्नान करतांना पूर्व दिशेकडे तोंड करून स्नान करणे अधिक लाभदायक आहे. सध्या स्नानगृह आणि शौचालय एकत्र केले जाते; परंतु वास्तूशास्त्रानुसार स्नानगृह अन् शौचालय एकत्र नसावेत; कारण ‘स्नानातून शुभ ऊर्जेची प्राप्ती व्हावी’, हा उद्देश असतो, तसेच शौचालयामुळे अशुभ ऊर्जा वाढते.
३. शौचालय
मूळ वास्तूशास्त्रानुसार स्नानगृह आणि शौचालय हे दोन्ही वास्तूच्या बाहेर एका ठराविक दिशेत असणे अपेक्षित आहे; परंतु सध्याच्या काळात ते शक्य होत नाही. म्हणून शौचालयाच्या स्थानाचा वास्तूमध्ये विचार करतांना शुभ स्थानाची ऊर्जा न्यून होणार नाही आणि वास्तूमध्ये अशुभता वाढणार नाही, हा विचार करून स्थान निश्चित करावे लागते. ईशान्य, आग्नेय आणि नैर्ऋत्य या दिशांच्या कोपर्यांमध्ये शौचालय घेऊ नये.
पश्चिम-वायव्य दिशेमध्ये रोग, पाप, शोष आणि रोग या पदांमध्ये शौचालय करता आले, तर अधिक योग्य ठरेल.
याम्य नैर्ऋत्ययोर्मध्ये पुरिषत्यागमन्दिरम् । – विश्वकर्मप्रकाश
अर्थ : दक्षिण आणि नैर्ऋत्य या दिशांमध्ये शौचालयाचा विचार आपण करू शकतो.
वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढावी, यासाठी स्नानगृह आणि शौचालय याची दिशा योग्य असणे आवश्यक आहे. शुभ दिशा किंवा शुभ पदांमध्ये शौचालय येऊ नये, याची सर्वच वास्तूविशारदांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.
(संदर्भ ग्रंथ : विश्वकर्मप्रकाश, मयमतम् आणि मानसार)
– गुरुसेवक श्री. श्रेयस पिसोळकर (वास्तूविशारद, ज्योतिष होराभूषण, होरारत्न), फोंडा, गोवा. (२८.४.२०२६)
लेखांक २३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1038056.html

क्रिकेटचा उदो उदो नको !
बलात्कार प्रकरणी पोलीस आणि प्रशासन यांना निर्देश देणारे झारखंड उच्च न्यायालयाचे निकालपत्र !
मनुष्याचे शरीर, चित्त, मन आणि बुद्धी यांच्यावर प्रारब्धाचा असलेला प्रभाव अन् त्यांचा ग्रहांशी असलेला संबंध !
ओस पडत चाललेल्या चर्चचा पंचनामा ?
स्त्रीत्वाचा उत्सव !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘सत्संग’ आणि कला !