केरळ : काँग्रेसच्या नेत्याचा महिला आमदाराला बलपूर्वक मिठी मारण्याचा प्रयत्न ! : Kerala MLA Hugged

थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चेरियन फिलिप यांनी पक्षाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीपूर्वी निवडून आलेल्या बिंदू कृष्णा या महिला आमदाराला बलपूर्वक मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या वेळी आमदार बिंदू कृष्णा या प्रचंड अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

१. ही घटना काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घडली. ४८ वर्षीय बिंदू कृष्णा या पांढर्‍या आणि पिवळ्या रंगाच्या साडीत बैठकीच्या ठिकाणी पोचल्या.

२. तेथे उपस्थित प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी त्या हस्तांदोलन करत होत्या.

३. या वेळी त्या ७१ वर्षीय चेरियन फिलिप यांच्याजवळ पोचल्या. बिंदू यांनी हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता फिलिप यांनी त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना मिठी मारण्याचा प्रयत्न केला.

४. या वेळी बिंदू यांनी तातडीने त्यांचा हात खाली केला आणि त्यांना मागे ढकलले; मात्र तरीही फिलिप यांनी पुन्हा दुसर्‍यांदा तसाच प्रयत्न केला. यावर बिंदू यांनी हात जोडले आणि त्या अस्वस्थ अवस्थेतच पुढे निघून गेल्या.

५. अद्याप या प्रकरणावर दोन्ही नेत्यांनी कुठल्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही; पण या प्रकाराने काँग्रेसमधील अंतर्गत शिस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

फिलिप यांच्यावर प्रचंड टीका !

ही घटना घडत असतांना तिथे अनेक पत्रकार आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. सामाजिक माध्यमांवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर चेरियन फिलिप यांच्यावर प्रचंड टीका झाली. अनेकांनी महिला आमदाराच्या व्यक्तीगत सीमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

संपादकीय भूमिका

  • इतर वेळी स्त्रियांचा स्वाभीमान आणि सक्षमीकरण यांविषयी गप्पा मारणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • स्वपक्षातील महिला आमदाराचा मान राखू न शकणारे काँग्रेसचे आमदार स्त्रियांच्या समस्या काय सोडवणार ?