निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील श्री. सागर बळगुर्गी यांना तबला वादनाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !

‘श्री. सागर बळगुर्गी हे तबला विशारद आहेत. ते नियमितपणे एक ते दीड घंटा तबलावादनाचा सराव करतात. ते तबलावादन करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. सागर बळगुर्गी

१. गुरुपौर्णिमेच्या वेळी साधक आरती म्हणत असतांना तबलावादन करायचे असणे

१ अ. साधक आरती म्हणण्याचा सराव करत असतांना तबल्याचा नाद, संवादिनीचे (पेटीचे) सूर आणि गाणार्‍या साधकांचे स्वर एकमेकांशी जुळत नसणे : ‘वर्ष २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षी मला गुरुपौर्णिमेच्या वेळी म्हणण्यात येणार्‍या ‘ज्योतसे ज्योत जगाओ’ या आरतीच्या वेळी तबल्याची साथ करण्याची संधी मिळाली. वर्ष २०२५ मधील गुरुपौर्णिमेच्या १० दिवस आधीपासून साधक आरती म्हणण्याचा सराव करत होते. साधकांनी १० दिवस सराव करूनही कधी गायक साधकांचा स्वर आणि तबल्याचा नाद व्यवस्थित जुळत नव्हता, तर कधी तबल्याचा नाद, संवादिनीचे सूर आणि गाणार्‍या साधकांचे स्वर हे जुळत नव्हते. साधकांनी पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर गायक साधकांचा स्वर, तबल्याचा नाद, संवादिनीचे सूर जुळू लागले, तरीही मनासारखा सराव होत नव्हता.

१ आ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि भावजागृतीचा प्रयोग करणे अन् साधक आरती म्हणत असतांना ‘तबला आणि डग्गा यांतून निघालेले नाद अन् संवादिनीचे सूर गायकांच्या सुरांशी जुळणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सर्व साधकांनी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली, ‘गुरुदेव, आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी आरती म्हटली जाऊ दे.’ त्यानंतर आम्ही भावजागृतीचा प्रयोग केला. नंतर साधक आरती म्हणत असतांना  ‘माझा डग्गा नरम झाला आहे आणि त्यातून सुंदर ध्वनी येत आहे. तबला आणि डग्गा यांतून सुंदर नाद येत आहे’, असे माझ्या लक्षात आले. आरती झाल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘संवादिनीचे ‘स्टॉपर’ (संवादिनीचे सूर उघडणारी कळ) बंद होते’, तरीही संवादिनीतून सूर येत होते आणि संवादिनीचे सूर गायकांच्या सुरांशी जुळले होते.

१ इ. मला गुरूंची कृपा अनुभवता आली. तेव्हा माझी प्रथमच भावजागृती झाली. तेव्हापासून ‘गुरुदेवांच्याच कृपेमुळे माझी ‘कलेतून ईश्वरप्राप्ती’ या मार्गाने साधना चालू झाली आहे’, असे मला वाटले.

२. ‘संगीत साधना’ सत्संगात सांगितल्यानुसार भगवान शंकराला प्रार्थना करून तबलावादनाला आरंभ केल्यावर आलेल्या अनुभूती

आम्हाला ‘संगीत साधना’ सत्संगात (कलेला साधनेची जोड देण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या सत्संगात) महाशिवरात्रीच्या आधी १ आठवडा कलेचा सराव करण्यापूर्वी किंवा कला सादर करण्यापूर्वी भगवान शंकराला प्रार्थना करण्याचे ध्येय दिले होते. त्याप्रमाणे त्या आठवड्यात मी भगवान शिवाचा नामजप करून तबलावादनाला आरंभ केला. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.

अ. भगवान शिवाला प्रार्थना करून तबलावादनाला आरंभ केल्यावर थोड्या वेळानंतर ‘मी हिमालयात जात आहे’, असे मला जाणवले.

आ. मला ‘दोन पर्वतांमधून डमरूचा आवाज येत आहे’, असे जाणवत होते.

इ. काही क्षण ‘मी काय वाजवत आहे’, याचा मला विसर पडला होता.

ई. काही क्षणांनंतर माझ्या लक्षात आले, ‘मी तबल्यावर जे बोल वाजवण्याचे ठरवले होते, ते बोल वाजत नव्हते. माझ्याकडून तबल्यावर वेगळेच बोल वाजवले जात होते. याआधी मी तबल्यावर हे बोल कधीच वाजवले नव्हते.’

उ. नंतर माझी भावजागृती झाली.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला हे सर्व अनुभवता आले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्री. सागर बळगुर्गी, तबला विशारद, निपाणी, जिल्हा बेळगाव. (२.५.२०२६)

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक