भगवान परशुराम आणि केरळची अष्टवैद्य परंपरा यांचा संबंध अत्यंत प्राचीन अन् सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. ‘भगवान परशुरामाने कोकण आणि केरळ यांची भूमी समुद्रातून बाहेर काढली’, अशी पौराणिक मान्यता आहे. या भूमीच्या रक्षणासह तिचे आरोग्य जपण्यासाठी त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली, त्यातूनच ‘अष्टवैद्य’ परंपरेचा जन्म झाला.
‘अपरान्तभूमी’ (कोकणभूमी) वसवत असतांना भगवान परशुरामाने उर्वरित भारतातून काही विद्वान ब्राह्मण कुटुंबांना येथे पाचारण केले. या कुटुंबांना त्यांनी समाजाचे विविध उत्तरदायित्व वाटून दिले, ज्यामध्ये आयुर्वेद हे सर्वांत महत्त्वाचे दायित्व काही ठराविक कुटुंबांना देण्यात आले.

१. अष्टवैद्य परंपरा म्हणजे काय ?
‘अष्टवैद्य’ या शब्दाचा अर्थ होतो, ‘आयुर्वेदाच्या आठही अंगांमध्ये नैपुण्य मिळवलेले वैद्य.’ आयुर्वेदाची ही ८ अंगे खालीलप्रमाणे आहेत –
अ. कायचिकित्सा (General Medicine)
आ. बालचिकित्सा (Paediatrics, Gynaecology, Obstetrics)
इ. ग्रहचिकित्सा (Psychiatry/Microbiology)
ई. ऊर्ध्वांगचिकित्सा (ENT and Ophthalmology)
उ. शल्यचिकित्सा (Surgery)
ऊ. दंष्ट्रचिकित्सा (Toxicology/Venomology)
ए. जराचिकित्सा (Geriatrics/Immunology)
ऐ. वृष्यचिकित्सा (Aphrodisiac therapy, Infertility treatment)

२. अष्टवैद्य परंपरेची वैशिष्ट्ये
भगवान परशुरामाने प्रारंभीला १८ कुटुंबांना ही विद्या दिली होती, अशी मान्यता आहे; मात्र काळाच्या ओघात केवळ काही मोजकीच कुटुंबे (मुख्यतः ८) ही परंपरा जिवंत ठेवू शकली. अष्टवैद्य परंपरेचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे आचार्य वाग्भट यांच्या ‘अष्टांग हृदयम्’ या ग्रंथावर असलेली त्यांची अढळ निष्ठा. उत्तर भारतात जेव्हा या ग्रंथाचा प्रभाव न्यून झाला होता, तेव्हा केरळच्या या वैद्यांनी तो जतन करून ठेवला.
हे वैद्य केवळ औषधोपचार करत नसत, तर ते मंत्रशास्त्र आणि भक्तीचाही आधार घेत. त्यांच्या घराण्यांमध्ये आयुर्वेदाचे शिक्षण उपनयनानंतर लगेच चालू व्हायचे. याच्या जोडीला तंत्रविद्येचाही एक भाग आहे; मात्र त्याविषयी लिहिण्याची मला अनुमती नसल्याने अधिक भाष्य करणार नाही.
आज जगभरात प्रसिद्ध असलेले केरळीय पंचकर्म (उदा. पिळिचिल, नवारा किळी) विकसित करण्यात अष्टवैद्य कुटुंबांचे मोठे योगदान आहे. खालील ८ कुटुंबे ‘अष्टवैद्य’ म्हणून ओळखली जातात –
अ. कुट्टनचेरी
आ. तैकद
इ. वयस्कर
ई. ओलानामत्तोम
उ. इलेडथु थैकड
ऊ. पुलमान्धोल
ए. अलेथियूर
ऐ. कुट्टुल्ली
भगवान परशुरामाने दिलेला हा वारसा अष्टवैद्य परंपरेने पिढ्यान्पिढ्या जपला आहे. ही केवळ एक वैद्यकीय पद्धत नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे. ही सर्वंकष परंपरा आपल्याला प्रदान करणे, हा भगवान परशुराम यांचा मोठाच अनुग्रह आहे !
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली.
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?