संयुक्त अरब अमिरातच्या मालवाहू नौकेवर इराणचे आक्रमण : ३ भारतीय घायाळ

तेहरान (इराण) – युद्धस्थगित असतांनाही इराणकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. एका मालवाहू नौकेवर क्षेपणास्त्र डागण्यात आले. यामध्ये ३ भारतीय नागरिक घायाळ झाले, असे वृत्त संयुक्त अरब अमिरातने दिले आहे. अमिरातच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून देशाच्या वेगवेगळ्या भागांत ४ क्रूज क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यांपैकी ३ क्षेपणास्त्रे देशाच्या समुद्री हद्दीत यशस्वीरित्या नष्ट करण्यात आली, तर एक समुद्रात पडले.

हे स्वीकारार्ह नाही ! – पंतप्रधान मोदी यांच्याकडून आक्रमणाचा तीव्र निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले की,

आम्ही संयुक्त अरब अमिरातवर झालेल्या आक्रमणांचा, ज्यामध्ये ३ भारतीय नागरिक घायाळ झाले आहेत, त्याचा तीव्र निषेध करतो. नागरिक आणि पायाभूत सुविधा यांना लक्ष्य करणे स्वीकारार्ह नाही. भारत संयुक्त अरब अमिरातसमवेत पूर्णपणे एकनिष्ठ आहे आणि संवाद अन् मुत्सद्देगिरी यांच्या माध्यमातून सर्व सूत्रांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी पाठिंबा व्यक्त करतो. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून (दोन मोठ्या जलाशयांना जोडणार्‍या अरुंद जलमार्गातून) सुरक्षित आणि विनाअडथळा दळणवळण सुनिश्चित करणे प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, अशा प्रकारची आक्रमणे आणि नागरिकांना दुखापत करणे अमान्य आहे अन् ते तातडीने थांबवले पाहिजेत. भारत पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थिरता इच्छितो अन् त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी यांचे समर्थन करतो.

इराणने आक्रमणाचे दायित्व स्वीकारले नाही

इराणने या आक्रमणाचे थेट दायित्व स्वीकारलेले नाही; मात्र त्याचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात यांनी परिस्थिती बिघडवणे टाळले पाहिजे.

इराणच्या एका सैन्याधिकार्‍यानेही सांगितले की, त्यांचा अमिरातवर किंवा कोणत्याही तेल ठिकाणावर आक्रमण करण्याचा कोणताही विचार नव्हता. त्यांनी आरोप केला की, अमेरिकेच्या सैनिकी धोरणांमुळेच हा तणाव वाढत आहे.

अमेरिकेने इराणच्या ७ लहान युद्धनौका केल्या उद्ध्वस्त

अमेरिकेने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या ७ लहान वेगवान युद्धनौका नष्ट केल्या आहेत, तर इराणने संयुक्त अरब अमिरातमधील एका तेल प्रकल्पावर आक्रमण केले. इराणने मात्र त्याच्या नौकांवर कोणतेही आक्रमण झाले नसल्याचा दावा केला आहे. संयुक्त अरब अमिरातने सांगितले की, फुजैराह येथील मुख्य तेल बंदराला लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे तेथे आग लागली आणि ३ जण घायाळ झाले.

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची म्हणाले की, सामुद्रधुनीतील घटनांवरून हे स्पष्ट होते की राजकीय संकटावर कोणताही सैनिकी तोडगा नाही.