सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना गीतेतील श्रीकृष्णाच्या एका वचनाची अनुभूती येण्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण  !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण 

‘२८.४.२०१३ या दिवसापासून मलाही पुढीलप्रमाणे वाटते.

भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत पुढीलप्रमाणे सांगितले आहे,

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २२

अर्थ : हे पार्था (म्हणजे पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्यकर्म करतच असतो.

२. वरील विषयाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

श्रीकृष्ण

२ अ. श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये : श्रीकृष्ण हा अनादि असल्याने तो जन्म-मृत्यूच्या पलीकडे आहे. तो परिपूर्ण, सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान आहे. त्याला मनुष्याप्रमाणे कुठलेही संचित आणि प्रारब्ध नाही. श्रीकृष्ण भक्तवत्सल असून त्याचे भक्तावर निःस्सीम प्रेम आहे.

२ आ. श्रीकृष्ण ऐश्वर्यवान असणे : श्रीकृष्ण सर्वव्यापी असून समृद्धी, संपत्ती, यश आणि भाग्य हे सर्व त्याच्या अधीन आहे. त्यामुळे श्रीकृष्ण गीतेत म्हणतो, ‘मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मला मिळाली नाही, असे नाही.’

२ इ. श्रीकृष्ण केवळ भक्तांसाठी सृष्टी-नियमात हस्तक्षेप करत असणे : मायेमुळे अनेक पृथ्वींची उत्पत्ती, स्थिती आणि लय होत असते. काळानुसार ‘सत्त्व, रज आणि तम’ या गुणांमध्ये पालट होत जातो, तसतसे पृथ्वीवर चांगली आणि वाईट परिस्थिती निर्माण होत असते. मायेच्या अव्याहतपणे चालू असलेल्या या कार्याकडे श्रीकृष्ण तटस्थपणे पहात असतो. जेव्हा पृथ्वीवर प्रामाणिक आणि मनोभावे साधना करणारे जीव असतात, तेव्हा त्यांचे दुःख आणि अडचणी दूर करून त्यांना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवणे, हे महत्त्वाचे असते. त्यासाठी श्रीकृष्ण मायेच्या कार्यात हस्तक्षेप करून भक्तांना साहाय्य करतो.

२ ई. श्रीकृष्ण केवळ भक्तांसाठी पृथ्वीवर जन्म घेत असणे : श्रीकृष्ण हे अनादि तत्त्व आहे. श्रीकृष्ण सूक्ष्मरूपाने भक्तांची काळजी सतत घेत असतो; परंतु आवश्यक तेव्हा तो स्वतः पृथ्वीवर जन्म घेऊन भक्तांसाठी आवश्यक असलेले कार्य करतो.

२ उ. श्रीकृष्ण बंधनमुक्त असूनही तो भक्ताच्या बंधनात असणे : श्रीकृष्ण सर्वशक्तीमान आणि बंधनमुक्त आहे; परंतु श्रीकृष्ण हा भक्तवत्सल असल्यामुळे तो भक्ताच्या बंधनात रहातो. त्यामुळे ‘श्रीकृष्णाला भक्तीचे बंधन आहे’, असे म्हटले जाते.

२ ऊ. श्रीकृष्णाचे कर्तव्यकर्म कोणते ? : ‘भक्तांची सर्वतोपरी काळजी घेणे’, हेच श्रीकृष्णाचे कर्तव्यकर्म आहे.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पूर्णत्व प्राप्त झालेले असल्याने ते श्रीकृष्णाप्रमाणे बंधनमुक्त असणे 

श्री. राम होनप

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे ईश्वरस्वरूप असून त्यांचे कार्य अवतारी आहे. त्यांना मनुष्याप्रमाणे जन्म-मृत्यू, सुख-दुःख, पाप-पुण्य, संचित-प्रारब्ध असे कुठलेही बंधन नाही. ते श्रीकृष्णाप्रमाणे बंधनमुक्त आहेत.

३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य 

३ अ १. साधकांचे रक्षण करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक कार्य करतात. त्यावर चिडून सप्तपाताळांतील वाईट शक्ती सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि साधक यांवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या देहाद्वारे प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे साधकांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते.

३ अ २. साधकांची आध्यात्मिक उन्नती करून घेणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर साधकांना करत असलेले मार्गदर्शन अचूक, परिपूर्ण आणि चैतन्यमय आहे. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होते.

३ अ ३. ज्ञानकार्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर ईश्वरी प्रेरणेनुसार ज्ञानाचे कार्य करत आहेत. ते साधना आणि धर्म यांच्याविषयीचे ज्ञान ग्रंथरूपात संकलित करत आहेत. याचा लाभ जिज्ञासू आणि साधक यांना सहस्रो वर्षे होणार आहे.

३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कर्तव्यकर्म कोणते ? : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना ईश्वरमय अवस्था प्राप्त झाली असल्याने त्यांना मिळवण्याजोगे काही राहिलेले नाही, तसेच त्यांना कोणतेही कर्तव्य शेष नाही. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर श्रीकृष्णाप्रमाणे भक्तवत्सल आहेत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे ‘साधकांची सर्वतोपरी काळजी घेणे’ हे कर्तव्यकर्म असून त्याप्रमाणे ते कार्य करत आहेत. यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना श्रीकृष्णाच्या गीतेतील वरील वचनानुसार अनुभव होत आहे.

४. श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील साम्य 

श्रीकृष्णाला मनुष्याप्रमाणे कुठलेही बंधन आणि कर्तव्य नाही, तरीही तो कर्तव्यकर्म करतो. याला श्रीकृष्णाची ‘लीलाधर अवस्था’, असे म्हणतात. ‘लीला’ याचा अर्थ ‘आनंद’ आणि ‘धर’ याचा अर्थ ‘धारण करणारा’, असा आहे. श्रीकृष्ण आनंदस्वरूप असून तो भक्तांचा सांभाळ करून त्यांची आध्यात्मिक प्रगती करून घेतो. त्यामुळे श्रीकृष्णाला ‘लीलाधर’, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हेसुद्धा आनंदस्वरूप आहेत. ते सर्व साधकांची काळजी घेऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती करून घेत आहेत. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हेही ‘लीलाधर’ आहेत.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : ५.२.२०२६)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.