जोधपूर (राजस्थान) येथील पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७५ वर्षे) आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग !

१०.१.२०२२ या दिवशी जोधपूर (राजस्थान) येथील पू. (श्रीमती) सुशीला मोदी (सनातनच्या ६३ व्या संत, वय ७५ वर्षे) आणि त्यांचे कुटुंबीय रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले होते. त्या वेळी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा अनमोल सत्संग लाभला. या सत्संगातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.                   

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पू. मोदीभाभी बोलत असतांना सत्संगातील साधकांना सुगंध येणे आणि त्यामागील गुरुदेवांनी सांगितलेले कारण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांना उद्देशून) : ‘काहीतरी सांगा. मी ऐकण्यासाठीच येथे बसलो आहे. तुम्ही घरातही सर्वांना शिकवता ना ? मग येथे का बोलत नाही ?

पू. (श्रीमती) सुशीला मोदी :

गुरुजी मेरे अवगुण चित न धरो ।
समदर्शी है नाम तिहारो ॥
चाहे तो पार करो, प्रभुजी मेरे अवगुण चित न धरो ।
गुरुजी मेरे अवगुण चित न धरो ॥

अर्थ : हे गुरुदेवा, माझ्या अवगुणांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. सर्वांवर कृपेचा वर्षाव करता. तुम्ही मला भवसागरातून पार करू शकता. माझा उद्धार करू शकता.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सत्संगातील साधकांना) : पू. मोदीभाभी भजनाच्या ओळी म्हणत असतांना कुणाला सुगंध आला का ? ५ – ६ जणांना आला. फारच सुंदर ! यांनी (पू. मोदीभाभींनी) केवळ ४ ओळी म्हटल्या, तर सर्वांना सुगंध आला. यांच्या आत किती सुगंध असेल ? संतांचे हेच वैशिष्ट्य आहे. ते जेव्हा बोलतात, तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांमधील जे तत्त्व त्यांच्यात आता सूक्ष्मातून क्रियाशील आहे, त्याची अनुभूती येते.

प्रत्येक तत्त्वाची वेगवेगळी लक्षणे आहेत. सुगंध हे पृथ्वीतत्त्वाचे लक्षण आहे. आता सुगंध आला ना ? तुमच्या घरात सर्वत्र सुगंधच सुगंध असेल ना ? तो पृथ्वीतत्त्वाचा सुगंध असतो. चव हे आपतत्त्वाचे लक्षण असते, उदा. तिखट, गोड. ‘देवतांचे दर्शन होणे आणि प्रकाश दिसणे’, ही तेजतत्त्वाची लक्षणे आहेत. स्पर्श हे वायुतत्त्वाचे लक्षण आहे आणि नाद हे आकाशतत्त्वाचे लक्षण आहे. तुमच्यामधील जे पंचमहाभूत आता सूक्ष्मातून क्रियाशील आहे, त्याची अनुभूती येते.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी यांचा परिचय

पू. (श्रीमती) सुशीला मोदी

पू. (श्रीमती) सुशीला बंकटलाल मोदी (सनातनच्या ६३ व्या (समष्टी) संत, वय ७५ वर्षे) या जोधपूर (राजस्थान) येथील आहेत. पूर्वीपासून त्या प्रसाराची सेवा करतात आणि त्यांचा संपूर्ण परिवार साधना करत आहे. त्यांनी कुटुंबियांवर साधनेचेे संस्कार केले. त्यामुळे त्यांच्या परिवारात दैवी बालक आणि दैवी युवा-साधकसुद्धा आहेत.

२. ‘भाभीजी, तुमच्या परिवारासारखा साधना करणारा परिवार कुठे पाहिला नाही’, असे लोक म्हणत असल्याचे पू. मोदीभाभींनी सांगणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : बाहेरचे लोकही पू. मोदीभाभींना काही विचारत असतील ना ?

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : बाहेरचे लोक म्हणतात, ‘‘असा परिवार आम्ही कधी पाहिला नाही.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सनातनमध्येही असा परिवार कुठे नाही. तो परिवार तुम्ही सनातनला दिलात.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : गुरुदेव, हा आपलाच परिवार आहे. लोक म्हणतात, ‘‘तुमच्या लहान वयाच्या नाती, मोठमोठे व्यवसाय करणारे तुमचे पुत्र आणि एवढ्या उच्चशिक्षित सुना, सर्व जण तुमच्या सांगण्यानुसार साधना करत आहेत. असा परिवार कुठेही पहायला मिळत नाही.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘असा परिवार कुठे पाहिला नाही’, असे अन्य लोकही म्हणतात; पण मला आज हा परिवार पहायला मिळाला.

३. पू. मोदीभाभींनी त्यांचे मन निश्‍चिंत आणि अनासक्त झाले असल्याचे सांगितल्यावर त्यांची साधनेत पुष्कळ प्रगती झाली असल्याचे गुरुदेवांनी सांगणे

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : गुरुदेव, ही सर्व आपलीच कृपा आहे, म्हणजे आपल्यामुळे माझे मन निश्‍चिंत झाले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : केवढी प्रगती झाली आहे आपली !

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : आता मनात शेष काही राहिले नाही. ‘मला काही हवे आहे’, असे काही राहिलेच नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आता ईश्‍वरच मिळाला आहे, तर आणखी काय पाहिजे ?

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : ‘आपण माझ्या हृदयात आहात आणि मी आपल्या चरणी आहे’, हा भाव प्रत्येक क्षणी टिकून रहावा’, असे माझ्या मनात सदैव असते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मलाही अनुभूती आली. ४ – ५ दिवसांपूर्वी मला तुमची आठवण आली आणि नंतर साधकांनी ‘तुम्ही इकडे (रामनाथी आश्रमात) येणार आहात’, असे मला सांगितले.

४. पू. मोदीभाभींनी त्यांचे मन स्थिर आणि सतत वर्तमानात रहात असल्याचे सांगणे अन् त्या वेळी सुगंध येत असल्याचे सांगून गुरुदेवांनी त्यांचे कौतुक करणे

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : माझे मन एकदम स्थिर रहाते. मनात कुठलाच विचार नसतो. माझ्या यजमानांचे निधन झाले. त्या आधी प्रसाराला जातांना मुले मला म्हणायची, ‘‘आई, बाबांची प्रकृती नाजूक आहे. तू प्रसाराला गेली नाहीस, तर चालणार नाही का ?’’ तेव्हा मी म्हणायचे, ‘‘चालवले तर सर्वकाही चालून जाते; परंतु माझे गुरुदेव आहेत ना ? तर काही होणार नाही. ‘काय होणार आहे ?’, ते मला ठाऊक आहे.’’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण साधे विषय बोललो, तरीही सुगंध येत आहे.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : ही सगळी आपलीच कृपा आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुम्हाला तर आता सवयीचे झाले असेल. त्यामुळे काही पालट (सुगंध येणे) होत असल्याचे तुमच्या लक्षातही येत नसेल.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : मला भूतकाळातील कोणताही प्रसंग आठवत नाही. मला ‘भविष्यात काय होणार ? कसे होणार ?’, याची मुळीच चिंताही वाटत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : साधनेत ‘वर्तमानकाळात रहा !’, असे म्हणतात. भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांत रहायचे नाही. भविष्यकाळाची चिंता नाही. तुम्ही केवळ वर्तमानकाळात असता. फारच सुंदर !

५. गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर प्रत्येक सेवा स्वीकारून ती करणार्‍या पू. मोदी !

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : माझ्याकडे एकाच वेळी २ – ३ सेवा आल्या, तरी माझ्या मनावर ताण येत नाही. मला वाटते, ‘गुरुदेवांच्या कृपेने सेवा मिळाल्या आहेत, तर तेच माझ्याकडून त्या सेवा करून घेतील.’ ‘त्या सेवा प्राधान्याने कशा करायला हव्यात ?’, हा विचार माझ्या मनात असतो. आपण नियोजन केले, तर ती सेवा होणारच ! ‘सेवेसाठी कुणाचे साहाय्य मिळो अथवा ना मिळो, आपल्याला ही सेवा कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचीच आहे’, असे मला वाटते. त्यामुळे ‘ती सेवा आपोआप पूर्ण कशी होते ?’, ते कळतच नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : किती चांगले विचार आहेत ना ! एकेक वाक्य महत्त्वाचे आहे !

६. ‘समष्टी संत असूनही पू. मोदी यांच्यामध्ये पुष्कळ भाव आहे’, असे गुरुदेवांनी सांगणे

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : प्रत्येक क्षणी आपण माझ्या समवेत असता. खरे सांगू गुरुदेवा (येथे पू. मोदी यांचा भाव जागृत झाला), माझ्याकडे ना शब्द आहेत, ना भक्ती आहे ना भाव आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मीच कृतज्ञ आहे. आपण एवढे सर्व चांगले चांगले सांगितले. मलाच पुष्कळ शिकायला मिळाले.

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : ‘माझे मन आपल्या चरणी आहे’, असा माझा भाव असतो. मला सूक्ष्मातले फारसे काही समजत नाही. माझ्यामध्ये शिकण्याची वृत्तीही फारशी नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तुमच्यासाठी सूक्ष्म हे सूक्ष्म राहिलेच नाही. सर्वकाही स्थुलातलेच झाले आहे. तुम्हाला ‘हे सूक्ष्म आहे’, असे वाटत नाही. तुम्ही सर्वकाही किती सहजतेने बोलत आहात ! फारच सुंदर !

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : मला कुणी सूक्ष्माविषयी काही सांगितले, तर मी म्हणते, ‘‘मला काही कळत नाही. मला एकच ठाऊक आहे की, गुरुदेव माझ्या समवेत आहेत. ते माझ्याकडून जे करून घेणार, तेच मी करणार.’’ मला एक भजन आठवते,

थारी चाकरी में चूक कोनी राखूं,
म्हारा गुरुदेव, थारी चाकरी में चूक कोनी राखूं ।
मने चाकर राखो जी, गुरुजी, मने चाकर राखो जी ।

अर्थ : गुरुदेव, मी तुमच्या सेवेत कोणतीही उणीव किंवा चूक राहू देणार नाही. मला तुमच्या सेवेत राहू द्या. मला दास बनवा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सत्संगातील साधकांना) : त्यांचा एकेक शब्द ऐकून भाव जागृत होतो कि नाही ? चांगला साधनाप्रवास केला आहे. आता पुढचा जन्म नाही ना ?

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : गुरुदेव, आपण मला या भवसागरातील दुःखाची थोडीसुद्धा आच लागू दिली नाही. ‘मी आपल्या चरणी शरणागतभावाने विलीन होत आहे’, हाच भाव असावा आणि शेवटपर्यंत गुरुसेवेचा ध्यास माझ्या मनात रहावा’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.

(या वेळी पू. मोदीभाभी यांचा भाव जागृत झाला.)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (सत्संगातील साधकांना) : एवढा भाव तुम्ही अन्य कोणत्या संतांमध्ये पाहिला आहे का ? फारच सुंदर ! या समष्टी साधना करणार्‍या संत असूनही त्यांच्यामध्ये एवढा भाव आहे ना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आज सर्व जण एवढे आनंदात आहेत की, मला वाटते, ‘मीच येथून आनंद घेऊन जाणार आहे.’ तुम्ही एवढे सर्व साधक कसे सिद्ध केले ?

पू. (श्रीमती) सुशीला मोदी : गुरुदेव, आपण आहात ना ! आपल्याच कृपेने सर्व होत आहे.’

(क्रमशः)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.