‘भारताला हिंदु राष्ट्र म्हणणे राज्यघटनाविरोधी !’ – सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) !

नागपूर – ‘आम्हाला हिंदु राष्ट्र घोषित करायला सांगतात; पण आम्ही म्हणतो की, भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, ते घोषित करण्याची आवश्यकताच नाही’, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काही दिवसांपूर्वी येथील एका कार्यक्रमात केले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी पोलिसांत लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.

सरसंघचालकांचे विधान हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, समानता, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मता या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. यातून समाजात धार्मिक ध्रुवीकरण अन् तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे’, असे तक्रारदाराने म्हटले आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की,

१. भारताला एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी विसंगत असून स्वातंत्र्यलढ्यातील बलीदान, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीच्या मूलभूत आत्मा यांना धक्का पोहचवणारा आहे.

२. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा देश असून राज्यघटनेने दिलेली ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ ही संकल्पना देशाच्या ऐक्याची आधारशिला आहे.

संपादकीय भूमिका

  • तक्रारदाराचा आरोप म्हणजे जावईशोधच म्हणावा लागेल !
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या मूळ राज्यघटनेत काँग्रेसने पालट करून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घुसडले. तक्रारदाराला काँग्रेसची ही कृती राज्यघटनाविरोधी वाटत नाही का ?
  • ज्यांना ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे काय ?, तेच ठाऊक नाही, त्यांनी याविषयी बोलणे म्हणजे स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी दर्शवण्याचाच प्रकार म्हणावा लागेल !