‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आणि ‘प.पू. डॉ. आठवले’ यांच्यासाठी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी श्री. अतुल पवार यांच्याकडून करून घेतलेली साधना !

आज ३ मे या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची ७ वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने...

‘गुजरात राज्यातील ‘गरुडेश्‍वर’ या तीर्थस्थानाजवळ रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान नर्मदा नदी ही उत्तर दिशेने वहाते. नदी उत्तर दिशेने वहाणे, हे अत्यंत पुण्यप्रद मानले जाते. नर्मदा पुराणानुसार चैत्र मासात एक दिवस ‘उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ केली जाते. योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी सूक्ष्मातून सांगितल्यानुसार संकल्प करून मी योगतज्ञ दादाजी यांच्या साधकांच्या समवेत एप्रिल २०२५ मध्ये ही परिक्रमा केली. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

१. ‘उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ करण्याविषयीची पूर्वपिठिका   

१ अ. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या एका भक्ताने ‘उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा’ करण्यासाठी येणार का ?’, असे विचारल्यावर त्यांना ‘काही कारणास्तव येऊ शकत नाही’, असे सांगणे : ‘एप्रिल २०२३ मध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या एका भक्ताने मला विचारले, ‘‘आम्ही ‘गरुडेश्‍वर’ला (गुजरात) जाणार आहोत. तेव्हा एक दिवसाची पायी ‘उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा’ करणार आहोत. तुला यायचे आहे का ?’’ तेव्हा काही कारणास्तव मला शक्य होणार नव्हते; म्हणून त्यांना ‘मी येऊ शकत नाही’, असे सांगितले.

१ आ. स्वप्नात प.प. टेंबेस्वामी यांचे दर्शन झाल्यावर त्यांच्या ठिकाणी योगतज्ञ प.पू. दादाजी यांचा भास होणे आणि तेथे समाधी अन् शिवपिंडी दिसणे : त्यानंतर दुसर्‍या दिवशी पहाटे मला स्वप्नात प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) टेंबेस्वामी यांचे दर्शन झाले. त्यांच्या हातामध्ये दंड होता. लंगोटी नेसलेली आणि छाटी घेतलेले असे त्यांचे रूप होते. त्यांचे आणि माझे संभाषण झाले; पण ‘ते काय बोलले ?’, हे मला आठवले नाही. त्यांच्या ठिकाणी मला योगतज्ञ प.पू. दादाजी यांचा भास झाला. तसेच तेथे समाधी आणि त्यावर शिवपिंडी दिसली. शिवपिंडीवर चांदीच्या पादुका होत्या. त्यानंतर मला जाग आली.’ मला सकाळी उठल्यानंतर पुष्कळ आनंद जाणवत होता.

१ इ. पूर्वी योगतज्ञ दादाजींनी गरुडेश्‍वर येथे नर्मदा नदीमध्ये अनुष्ठाने केली असणे आणि ‘प.प. टेंबेस्वामी यांनी दृष्टांत देऊन गरुडेश्‍वरला बोलावले असेल’, असे वाटणे : माझ्या मनात ‘स्वप्नात प.प. टेंबेस्वामी यांचे दर्शन मला का झाले असावे ? समाधी त्यावर शिवपिंडी आणि शिवपिंडीवर चांदीच्या पादुका, असे मी कधी पाहिले नव्हते. याचा अर्थ काय ?’, असे प्रश्‍न येत होते. तेव्हा मला वाटले, ‘कदाचित् प.प. टेंबेस्वामी यांनी मला दृष्टांत देऊन गरुडेश्‍वरला बोलावले असेल.’

नंतर मला आठवले, ‘पूर्वी योगतज्ञ दादाजींनी गरुडेश्‍वर येथे नर्मदा नदीमध्ये अनुष्ठाने केली होती. हा दृष्टांत असू शकतो’, हे लक्षात घेऊन मी गरुडेश्‍वर येथे जाण्यासाठी तात्काळ रेल्वे तिकिट आरक्षित केले. मी योगतज्ञ दादाजी यांच्या भक्तांना सांगितले, ‘‘मी गरुडेश्‍वर येथे जाण्याचे ठरवले आहे.’’

१ ई. पहाटे स्नान करून प.प. टेंबेस्वामी यांच्या समाधी मंदिरात नामजप करणे, नंतर मंदिरातील पुजार्‍याने समाधीवरील वस्त्र काढल्यावर स्वप्नात दिसल्याप्रमाणे शिवपिंडी आणि तिच्यावरील चांदीच्या पादुका दिसणे अन् झालेला स्वप्नदृष्टांत खरा ठरल्याची प्रचीती येणे : मी गरुडेश्‍वर येथे गेलो. गरुडेश्‍वर येथे परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.) वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांची समाधी आहे. तसेच प.प. टेंबेस्वामी यांनी स्थापन केलेले दत्तमंदिर आहे. मी पहाटे लवकर उठून स्नान करून प.प. टेंबेस्वामी यांच्या समाधी मंदिरात नामजप करत होतो. सकाळी मंदिरातील पुजारी समाधी मंदिरात पूजा करण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी समाधी मंदिरावर घातलेले वस्त्र काढले. त्यानंतर मला समाधीवर शिवपिंडी दिसली. मी जवळ जाऊन पाहिले, तर मला स्वप्नात दिसल्या होत्या, तशाच शिवपिंडीवर चांदीच्या पादुकाही होत्या. मला दिलेला स्वप्नदृष्टांत खरा ठरल्याची प्रचीती आली. हे सर्व पाहून माझी भावजागृती झाली.

१ उ. नंतर तेथील पुजार्‍याने मला दर्शन घेण्यास आणि छायाचित्र काढण्यास अनुमती दिली. प.प. टेंबेस्वामी आणि योगतज्ञ दादाजी यांनी मला प्रत्यक्ष बोलावून घेतले. तसेच प.प. टेंबेस्वामी यांचे चरित्र पाहिले असता, त्यांच्या आणि योगतज्ञ दादाजी यांच्या चरित्रात मला बरेच साम्य आढळले. 

२. त्यानंतर आम्ही दुसर्‍या दिवशी म्हणजे ६.४.२०२३ या दिवशी पहिली ‘उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ केली. तेव्हा आम्ही असे ठरवले की, ‘३ वर्षे ‘उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ करूया.’ त्याप्रमाणे दुसरी परिक्रमा वर्ष २०२४ च्या एप्रिल मासात पूर्ण झाली.

३. योगतज्ञ दादाजी यांच्या साधकांच्या समवेत गुजरात राज्यातील ‘गरुडेश्‍वर’ येथे तिसर्‍यांदा ‘उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ करण्यासाठी जाणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

३ अ. योगतज्ञ दादाजींनी ‘वर्ष २०२५ मधील उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ ही ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आणि ‘प.पू. डॉ. आठवले’ यांच्यासाठी करावी’, असे ध्यानातून सांगणे : परिक्रमेला जाण्याच्या साधारण १५ दिवस आधी मी एक दिवस नामजप करत होतो. त्या वेळी माझे ध्यान लागले. मला योगतज्ञ दादाजी यांनी ध्यानात सांगितले, ‘वर्ष २०२५ मधील उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा’ ही ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आणि ‘प.पू. डॉ. आठवले’ यांचे आरोग्य चांगले रहावे, यांसाठी करावी. ‘परिक्रमेतून मिळणारी फलप्राप्ती ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यांमध्ये अडथळे येऊ नयेत, तसेच ‘प.पू. डॉक्टर यांचे आरोग्य चांगले रहावे, यांसाठी वापरली जावी’, असा संकल्प करावा.’

३ आ. योगतज्ञ दादाजी स्थूलदेहात नसूनही सूक्ष्मातून बारकाईने सर्वत्र लक्ष असल्याची अनुभूती साधकाला येणे : योगतज्ञ दादाजी हयात असतांना त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात मला माझ्या दैनंदिन साधनेच्या व्यतिरिक्त प.पू. डॉक्टरांसाठी १ घंटा नामजप करण्यास सांगत असत. आता योगतज्ञ दादाजी स्थूलदेहात नसूनही सूक्ष्मातून मला समष्टीसाठी साधना करायला सांगत आहेत. त्यांचे सूक्ष्मातून बारकाईने सर्वत्र लक्ष असल्याची मला प्रत्येक वेळी अनुभूती येत आहे. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला.

४. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून प.पू. डॉ. आठवले यांचे गोत्र समजणे आणि योगतज्ञ दादाजी यांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे पुरोहितांकडून संकल्प करून घेणे 

श्री. अतुल पवार

१०.४.२०२५ या दिवशी सकाळी मी योगतज्ञ दादाजी यांच्या साधकांच्या समवेत गुजरात राज्यातील ‘गरुडेश्‍वर’ येथे पोचलो. परिक्रमेला जाण्याचे हे माझे ३ रे वर्ष होते.

परिक्रमा करण्यापूर्वी पुरोहितांकडून संकल्प करायचा होता. त्यासाठी मला प.पू. डॉक्टरांचे गोत्र हवे होते. त्या वेळी माझ्या मनात ‘आता ऐन वेळी गोत्राविषयी कुणाला विचारायचे ?’, असा विचार आला. तेव्हा मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे स्मरण झाले. त्यांच्या माध्यमातून मला प.पू. डॉक्टरांचे गोत्र समजलेे.

त्याप्रमाणे मी सायंकाळी योगतज्ञ दादाजी यांनी सूक्ष्मातून सांगितल्यानुसार पुरोहितांकडून पुढीलप्रमाणे संकल्प केला. ‘मी पायी करणार असलेली उत्तर वाहिनी परिक्रमेची फलप्राप्ती ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यांमध्ये अडथळे न येता निर्विघ्नपणे होऊ देत आणि  ‘प.पू. डॉक्टर’ यांचे आरोग्य चांगले रहावे, यांसाठी वापरली जावी !’

५. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा करतांना आलेल्या अनुभूती

५ अ. परिक्रमा करत असतांना ‘प्रत्यक्ष नर्मदामाता समवेत असून ती पहात आहे’, असे जाणवणे आणि नामजप करत परिक्रमा करत असतांना पुष्कळ आनंद जाणवणे : ११.४.२०२५ या दिवशी पहाटे ४ वाजता तिलकवाडा येथील शिवमंदिरातील शिवपिंडीला जलाभिषेक करून मी परिक्रमेला आरंभ केला. मी परिक्रमा करत असतांना ‘प्रत्यक्ष नर्मदामाता माझ्या समवेत आहे आणि ती माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवत होते. मी नामजप करत परिक्रमा करत होतो. त्यामुळे मला पुष्कळ आनंद जाणवत होता. परिक्रमेच्या मार्गात मंदिरे आणि संतांचे आश्रम आहेत. माझ्याकडून तेथील देवतांना संकल्पाप्रमाणे प्रार्थना होत होती.

५ आ. प.पू. डॉक्टर आणि नर्मदामाता यांना प्रार्थना करून दीप नदीमध्ये अर्पण करणे आणि दीप नदीच्या प्रवाहात पुढे जात असल्याचे पाहून ‘ही दैवी प्रचीती आहे’, असे जाणवणे : मी परिक्रमेच्या मध्यावर आल्यानंतर नर्मदा नदीमध्ये दीप सोडायचे होते. एका द्रोणामध्ये पणती ठेवून त्यामध्ये दीप लावायचा होता. जोराच्या वार्‍यामुळे काही जणांच्या दीपातील ज्योती प्रज्वलित होत नव्हत्या. मी प.पू. डॉक्टर आणि नर्मदामाता यांना प्रार्थना करून दीप नदीमध्ये अर्पण केला. तेव्हा दीप तेवत राहून नर्मदा नदीच्या प्रवाहात पुढे पुढे जात होता. हे पाहून मला गुरुदेव आणि नर्मदामाता यांच्या प्रती कृतज्ञता वाटली. ‘ही दैवी प्रचीती आहे’, असे मला जाणवले.

५ इ. उत्तर वाहिनी परिक्रमा करतांना सलग चालूनही न दमता उत्साह जाणवणे आणि एप्रिल मास असूनही उन्हाचा त्रास न होणे : त्यानंतर आम्ही नर्मदामातेची आरती केली. उत्तर वाहिनी परिक्रमा करतांना अनुमाने २२ कि.मी. अंतर पायी चालावे लागते. मी सलग चालूनही मला दमायला झाले नाही, उलट मला उत्साहच जाणवत होता. एप्रिल मासात कडक ऊन असते, तरीही मला उन्हाचा त्रास झाला नाही. दुपारी १२.१५ वाजता आमची परिक्रमा पूर्ण झाली. त्यानंतर सायंकाळी ‘कन्यापूजन’ (टीप) करून परिक्रमा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतल्याबद्दल नर्मदामातेच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त केली.’

टीप : नर्मदा ही स्वतः एक शक्तिस्वरूपा आहे. हिंदु धर्मात कन्या, म्हणजे देवीचे रूप मानले जाते. नवरात्रातही आपण कन्यापूजन करतो. त्याचप्रमाणे नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर ‘कन्यापूजन’ (कुमारिका पूजन) करून आपण शक्तितत्त्वाला वंदन करतो.’

– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.८.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक