आज ‘मराठी राजभाषा दिन’ आहे. त्या निमित्ताने...

१. परकीय आक्रमणांमुळे मराठी भाषा प्रदूषित
‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी हुतात्मा, महापौर, त्रिमितीपट अशा अनेक शब्दांची देन आपल्याला दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवरायांना आपला आदर्शच नाही, तर दैवत मानले होते. त्यामुळे राजांची अनेक धोरणे आणि योजना यांचा प्रभाव सावरकर यांच्या कार्यप्रणालीवर दिसून येतो. त्या दोघांच्याही आयुष्यात अनेक साम्यस्थळे आहेत. त्यातील एक, म्हणजे भाषाशुद्धी होय. परकीय आक्रमण हा केवळ देशाच्या स्वातंत्र्यावरच घाला नसतो, तर ते देशाची संस्कृती आणि भाषा यांवरही आक्रमण असते. किंबहुना पहिला घाव भाषेवर घालून संस्कृती नष्ट करण्याचा आक्रमकांचा प्रयत्न असतो. आपल्या देशावर मोगल आणि ब्रिटीश यांच्या व्यतिरिक्त विविध आक्रमकांनी मिळून सुमारे १ सहस्र २०० वर्षे राज्य केले. या आक्रमकांमुळे केवळ मराठी भाषाच विद्रूप झाली नाही, तर हिंदुस्थानातील इतर हिंदु भाषांवरही परिणाम झाला.

२. मराठी भाषेच्या शुद्धीकरणात छत्रपती शिवरायांचा सहभाग
मराठी भाषेवरील उर्दू आणि पारशी भाषांचे आक्रमण ओळखून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी रघुनाथ पंडित यांच्याकडून राज्यभाषा व्यवहार कोश करवून घेतला. राजांनी संस्कृत भाषेच्या अभ्यासालाही प्रोत्साहन दिले. त्याचा प्रभाव पेशवाईपर्यंत टिकून राहिला. पेशवाईत कवी मोरोपंतांनी शुद्ध मराठीत अतिशय सुंदर काव्यरचना केल्या, तरीही मराठी भाषेत घुसलेले काही परकीय शब्द तसेच राहून गेले. पुढे ब्रिटिशांचे राज्य आले आणि भारतियांना इंग्रजी भाषेचे शिक्षण मिळू लागले. त्यामुळे नोकर्या मिळू लागल्या. ब्रिटिशांच्या बुद्धीभेद करण्याच्या डावात आपण अडकलो. आपल्यातीलच अनेकांना इंग्रजी राज्य, भाषा, साहित्य उच्च प्रतीचे वाटू लागले आणि आपली मराठी भाषा अन् साहित्य कवडीमोलाचे वाटू लागले. त्याच वेळी संस्कृत आणि मराठी ग्रंथांप्रमाणेच इंग्रजीचाही अभ्यास असणार्या निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महत्कार्य हाती घेतले. त्यामुळे ते आधुनिक मराठी भाषेचे जनक आणि मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध पावले. दुर्दैवाने त्यांना अवघे ३२ वर्षांचे आयुष्य लाभल्यामुळे मराठी भाषाशुद्धी चळवळीची मोठीच हानी झाली.
३. सावरकर यांच्या ‘भाषाशुद्धी’ विषयावरील लेखमालेमुळे मराठी साहित्य विश्वात खळबळ
त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भाषाशुद्धीची चळवळ हाती घेतली. त्या वेळी ते रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते. ‘राजकारणात भाग घेता येणार नाही, तर समाजकारण करीन’, या भूमिकेतून त्यांनी अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासह स्वदेशीचा पुरस्कार केला. यासमवेतच त्यांनी भाषाशुद्धी चळवळ हाती घेलती. उर्दू, पर्शियन आणि इंग्रजी भाषांच्या शब्दांमुळे केवळ मराठी अन् हिंदीच नव्हे, तर बंगाली आणि गुरुमुखी अशा सगळ्यांच भाषा विद्रूप होत होत्या. वर्ष १९२५ मध्ये सावरकर यांनी ‘केसरी’ वृत्तपत्रात ‘भाषाशुद्धी’ या विषयावर लेखमाला लिहिली. त्यामुळे मराठी साहित्य विश्वात बरीच खळबळ माजली. अनेकांनी या चळवळीला कडाडून विरोध केला. अनेक आक्षेप नोंदवण्यात आले. त्या आक्षेपांना उत्तरे देणारे सावरकर यांचे लेख वर्ष १९२६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मराठी भाषेचे शुद्धीकरण’ या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आले. सावरकर यांचे हे लेख १०० वर्षापूर्वीचे आहेत; पण आजही मराठी भाषेची परिस्थिती तशीच आहे, किंबहुना ती अधिकच केविलवाणी होत चालली आहे.
त्या लेखात सावरकर यांनी दुकानांवरील पाट्यांवर इंग्रजी शब्दांत लिहिलेल्या नावांविषयी आक्षेप नोंदवला. आजही दुकानांवरील पाट्या मराठीत लिहिल्या जाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. आज ‘मॉर्निंगला वाईफला फिव्हर चढला होता, तरी तसाच स्टीमरने फर्स्ट क्लासचे तिकीट काढून बाँबेला आलो’, अशी मराठी बोलणार्यांची उदाहरणे सावरकर यांनी दिली आहेत. आजही परिस्थिती पालटलेली नाही; उलट बिघडलीच आहे.
४. सावरकर यांच्याकडून विधीमंडळ, विधानसभा, निवडणूक, घोषणापत्र इत्यादी शब्दांची देण

मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी नोंदवलेल्या आक्षेपांना उत्तरे देणारा सावरकर यांचा लेख १६ जून १९२६ च्या ‘श्रद्धानंद’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाला. पुढे कोल्हटकरांनीही विदेशी शब्दांविरुद्धच्या या चळवळीमुळे परकीय शब्दांच्या वापराला ओहोटी लागल्याचे मान्य केले. सावरकर यांनी ‘कायदे कौन्सिलातील इलेक्शनच्या कँडिडेटांचे मॅनिफेस्टोज’ या वर्ष १९२६ मध्ये लिहिलेल्या विनोदी लेखात योजलेले विधीमंडळ, विधानसभा, विधायक, इच्छुक, निवडणूक, घोषणापत्र असे अनेक शब्द आज प्रचलित झाले आहेत. सावरकर बंधूंचे ‘श्रद्धानंद’ हे साप्ताहिक भाषाशुद्धी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच चालू केलेल्या लिपीशुद्धी चळवळीचे मुखपत्र होते. भाषाशुद्धी चळवळीला ५ वर्षे झाल्यानंतर सावरकर यांनी ‘पंचवार्षिक समालोचन’ या लेखात चळवळीचा आढावा घेतला आणि पाचलेगावकर महाराज, मसूरच्या ब्रह्मचर्याश्रमासारखी संस्था, त्यांचे ‘दासबोध’ हे मासिक, ‘ज्ञानदेवी’ मासिकाचे संपादक आठवले, लिपी संशोधक देवधर अशा अनेकांचा ‘भाषाशुद्धीचे अभिमानी’ म्हणून विशेष उल्लेख केला. सर्वांनीच विदेशी शब्द बहिष्काराचे हे व्रत चिकाटीने आणि निर्धाराने चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले. सावरकर त्यांच्या व्याख्यानांमधून आणि प्रत्यक्ष भेटीगाठींमधून भाषाशुद्धीचा प्रचार करतच होते.
५. काँग्रेसच्या उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी आणि उर्दू लिपीला विरोध
उर्दूनिष्ठ हिंदुस्थानी ही राष्ट्र्रभाषा आणि उर्दू लिपी ही राष्ट्र्रलिपी करण्याच्या काँग्रेसच्या चाललेल्या प्रयत्नांविषयी वर्ष १९५१ मध्ये ‘आमची राष्ट्र्रभाषा आणि भाषाशुद्धी’ हा लेख त्यांनी लिहिला. प्रचारासाठी डॉ. रघुवीर यांच्याप्रमाणे सहस्रावधी कार्यकर्ते निर्माण झाले, तर ५-१० वर्षांत ‘संस्कृतनिष्ठ हिंदीच आपली राष्ट्र्रभाषा कशी होत नाही, ते बघू !’, असा प्रखर आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘आम्ही जे परकीय शब्द आत्मसात केले नि पचवून टाकले, ती आहेत आमची विजय चिन्हे’, असेही म्हटले जात असतांना सावरकर जीव तोडून सांगत होते, ‘ती आपली विजय चिन्हे नाहीत, तर ते आपल्या भाषेच्या अंगावरचे व्रण आहेत.’ सावरकर यांचे सांगणे होते की, आपल्याला मराठीत किंवा कोणत्याही हिंदु भाषेत एखादा शब्द लागला, तर तो संस्कृतोद्भव घ्यावा, आपल्या इतर कुठल्याही भाषेतून घ्यावा किंवा बोलीभाषेतून घ्यावा; कारण त्या सर्व भाषा भगिनीच आहेत; पण शक्यतोवर परकीय शब्द वापरू नयेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर लिहितात, ‘ज्या वस्तू किंवा संकल्पना आपल्याकडे अस्तित्वातच नव्हत्या आणि त्याला जुने वा नवे शब्दच नाहीत, तेव्हा परकीय शब्द सुखेनैव राहू द्यावे.’ उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बूट, मेज, सदरा, कोट, जाकीट, ट्रंक, कॉलर इत्यादी. ‘चप्पल, खडावा, वाहणा’ असे शब्द असतानांही पादत्राणाचा वेगळा प्रकार म्हणून ‘बूट’ शब्द वापरायला हरकत नाही; पण जोडा, पादत्राण, पायताण असे शब्द असतांना ‘शू’ शब्द वापरण्याची आवश्यकता नाही, असे ते सांगत.
६. सावरकर यांच्या भाषाशुद्धीचे विरोधक कवी माधव ज्युलियन यांच्यात मतपरिवर्तन
सावरकर यांच्या भाषाशुद्धी चळवळीला विरोध करणार्यांमध्ये कवी माधव ज्युलियन होते. त्यांच्या कवितेत मोठ्या प्रमाणावर फारसी शब्द असत. पुढे त्यांचा विरोध मावळला आणि ते सावरकरांच्या भाषाशुद्धी चळवळीचे पुरस्कर्ते बनले. इतकेच नव्हे, तर त्यांनी त्यांच्या सार्या कविता परत शुद्ध मराठीत लिहून काढल्या, ‘भाषाशुद्धी-विवेक’ हे पुस्तक लिहिले, तसेच उर्दू आणि फारशी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द असलेले शब्दकोश प्रसिद्ध केले. सावरकर यांनी भाषाशुद्धीसाठी केलेल्या अविश्रांत परिश्रमांचे हे यश होते. अनेक नवे शब्द जन्माला येऊ लागले होते आणि जुने रुळू लागले होते.
७. मराठी भाषाशुद्धीचे चालते-बोलते विद्यापीठ, म्हणजे सावरकर !
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त झाल्यावर त्यांनी कोल्हापूरच्या ‘हंस पिक्चर्स’ला भेट दिली. तेथे सर्व पाट्या इंग्रजीत असलेल्या पाहून सावरकर अस्वस्थ झाले आणि त्यांनी बाबूराव पेंढारकर यांना मराठी पाट्या लावण्यास सुचवले. पेंढारकर म्हणाले, ‘मराठी शब्द सुचवावे, त्वरित पाट्या पालटतो.’ सावरकर यांनी तिथल्या तेथे शब्द सुचवले. तो दिवस होता, २० जून १९३७ आणि त्याच दिवशी चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, कलागृह, कलामंदिर, छायाचित्रण, बाह्यचित्रण, ध्वनीलेखन अशा शब्दांचा जन्म झाला ! त्याचप्रमाणे बोलता बोलताच नू.म.वि. हायस्कूलची नू.म.वि. प्रशाला झाली. सांगलीच्या गजानन मिलचे मालक श्री. वेलणकर झाले, धनी वेलणकर ! प्रिन्सिपल अत्रे झाले, आचार्य अत्रे ! पुण्याचे मेयर गणपतराव नलावडे झाले, महापौर गणपतराव नलावडे !
८. मराठी टिकवणे आपल्या हातात !
मराठी भाषेला आता अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे. ‘सर्व काही भेटण्याच्या’ आजच्या काळात आपल्या भाषेचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल, तर प्रत्येक मराठी माणसाने शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करायला हवा. ते शुद्धत्व टिकवायचे असेल, तर ब्राह्मणी भाषाच का प्रमाण मानायची ? हा द्वेष सोडून जाणूनबुजून इंग्रजी शब्द वापरणे बंद करायला हवे. वर्तमानपत्र, वाहिन्या, लेखक, कवी अशा सर्वांनीच विदेशी शब्द वापरणे थांबवायला हवे. श्री शिवछत्रपती, मोरोपंत, विष्णुशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, माधव ज्युलियन आणि पुढेही अनेकांनी घेतलेले भाषाशुद्धीचे व्रत यापुढेही नेटाने चालवायचे असेल, तर ‘मम्मी, पप्पा’ यांना लहानग्यांचे ‘आई वडील’ होऊन त्यांच्यात स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा यांविषयीचा अभिमान बालपणापासूनच जागृत करावा लागेल. ‘भाषा टिकली, तरच आपली संस्कृती टिकणार आहे !’
– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई.
(साभार : दैनिक ‘सकाळ’, वर्धापनदिन विशेषांक, १३.२.२०२५)
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !