थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यातील प्रतिभा, धार्मिकता-आध्यात्मिकता आणि त्यांचे कर्तृत्व यांच्यातील नाते

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संक्षिप्त चरित्र, श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिती प्रतिभेची काही उदाहरणे, त्यांची काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि गणिती प्रतिभेची काही वैशिष्ट्ये’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.           

(भाग ४)

भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034827.html

थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन

१४. सर्जनशीलता, प्रतिभा आणि प्रज्ञा यांतील भेद

अ. सर्जनशीलता (Creativity) : सर्जनशीलता, म्हणजे असलेल्या माहितीचा वापर करून काहीतरी ‘नवीन’ आणि ‘उपयुक्त’ निर्माण करण्याची क्षमता. ती जिज्ञासा, सराव आणि अनुभव यांच्या आधारे वाढवता येते.

आ. प्रतिभा (Genius) : प्रतिभा ही सर्जनशीलतेच्या पुढची पायरी आहे. ती सहसा ‘जन्मजात’ किंवा ‘सहज’ असते. हे असे कसे ? याचे उत्तर ‘अध्यात्म पूर्वसुकृत’ असे सांगते. याची अनेक उदाहरणे विविध क्षेत्रांत पहायला मिळतात. त्या त्या क्षेत्रांचा अल्प स्पर्श त्यांची प्रतिभा व्यक्त होण्यास पुरेशी असते.

इ. प्रज्ञा : ‘प्रज्ञा’ हे केवळ बुद्धीचे कार्य नसून ते ‘सत्याचे थेट दर्शन’ आहे. जेव्हा एखाद्या ऋषींना विश्वाचा एखादा मूलभूत नियम अचानक ‘दिसतो’,  ती प्रज्ञा. ‘प्रज्ञा’ शब्दाला इंगजी प्रतिशब्द सांगणे कठीण आहे.

१५. सर्जनशीलता, प्रतिभा आणि प्रज्ञा यांतील अंतर समजणे का महत्त्वाचे ?

यांतील प्रज्ञा असणारी व्यक्ती दुर्लभ असल्याने सर्जनशीलता आणि प्रतिभा हे तरी नक्कीच समजून घ्यायला हवे. सर्जनशीलता जोपासायला हवी, प्रोत्साहित करायला हवी. या ३ गोष्टी व्यक्तीच्या अभिव्यक्तीचा स्तर पालटवतात. व्यक्तीमत्त्वासाठी आपल्यातील सर्जनशीलता जशी जोपासायला हवी, तशी प्रतिभा दुर्लक्षित करू नये. अर्थात् दोन्हींसाठी हिंदु धर्म-अध्यात्म हे पूरक ठरते. हे समजले, तर ‘अध्यात्म विरुद्ध विज्ञान’ असे न होता ‘अध्यात्म आणि विज्ञान असे समीकरण’ जीवनात लाभकारी ठरते. संशोधनाच्या क्षेत्रात तर हे टप्पे पुष्कळच महत्त्वाचे ठरतात. जगावर मोठा प्रभाव टाकेल, असे शुद्ध गणित, शुद्ध भौतिकशास्त्र इत्यादींचे संशोधन प्रतिभेच्या टप्प्यापासून चालू होते.

१६. रामानुजन यांची गणिती प्रतिभा आणि आध्यात्मिक व्यक्तीमत्त्व यांची सांगड

रामानुजन यांच्या संशोेधनाचा धार्मिकता आणि आध्यात्मिकता यांच्याशी संबंध काय, हे पाहूया.

डॉ. दुर्गेश सामंत

अ. पारंपरिक धार्मिकतेमुळे एकाग्रतेचा लाभ : रामानुजन यांची वाढ एका पारंपरिक धार्मिक वातावरणात झाली होती. मंत्रपठण, स्तोत्रे आणि एकाग्रतेची सवय यांमुळे त्यांच्या मेंदूला नकळत एक प्रकारचे वेगळे ‘प्रशिक्षण’ मिळाले होते. याने मेंदू लवचिक बनतो (न्यूरोप्लास्टिसीटी). यांत मेंदूतील संदेशवाहक चेतातंतूंचे जाळे (व्हाईट मॅटर) अधिक विकसित होते. रॉबर्ट कनिगेल यांनी परिश्रमपूर्वक ‘दी मॅन हू न्यू इन्फिनिटी’ हे रामानुजन यांचे उत्तम चरित्र लिहिले आहे. त्यात रामानुजन यांच्या आध्यात्मिक श्रद्धेचा त्यांच्या गणिती प्रक्रियेशी असलेला संबंध स्पष्टपणे मांडला आहे. कानिगेल यांनी ‘मनाचे ब्राह्मण्य प्रशिक्षण (Brahminical training of the mind)’ या संज्ञेचा वापर करून वर उल्लेखित एकाग्रतेच्या परंपरेचे महत्त्व सांगितले आहे.

आ. सनातन प्रणित सर्वव्यापी आणि विश्वनिर्मितीकर्ता ईश्वराच्या ज्ञानाचे महत्त्व : ईश्वर रामानुजन यांचे अध्यात्म त्यांना विश्वातील सुसंवाद किंवा ‘सिमेट्री (Symmetry)’ शोधण्यास साहाय्य करत असे. ते म्हणायचे, ‘ईश्वराचा विचार व्यक्त केल्याविना कोणत्याही समीकरणाला माझ्यासाठी अर्थ नाही. विश्व हे ईश्वराची विभूती असे श्रीकृष्णाने गीतेत ‘विभूतीयोगा’त सांगितले आहे.’ रामानुजन यांचा ईश्वर हा सनातन धर्मातील असून तो सर्वव्यापी, सर्वज्ञानी आहे. येथे सर्वव्यापी, म्हणजे जो विश्वनिर्मितीकर्ताही आहे, तसाच तो विश्वनिर्मितीची सामग्रीही आहे. तो विश्वापासून वेगळा नाही. याचा अर्थ रामानुजन यांच्यातही (अगदी वाचकामध्येही) तो आहेच. केवळ प्रतिभा आणि प्रज्ञा यांमुळे त्याची अभिव्यक्ती स्पष्ट होते. ‘रामानुजन यांच्या ‘ब्रह्म’, शून्य आणि अनंत, माया, जीवनध्येय यांसंबंधीच्या संकल्पना सनातन धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने बालपणापासून प्रगल्भ बनल्या होत्या. रामानुजन यांना मानवाला आज ज्ञात झालेल्या कृष्णविवर आदींची गणिते आधीच दिसली, तर त्यात नवल वाटायला नको. प्रश्न असतो तो, ‘जे दिसते ते सत्य म्हणून स्वीकारण्याचा.’ रामानुजन यांना त्यात ईश्वरच सापडल्याने आणि तोच सत्यतेचे प्रमाण असल्याने त्यांना त्याची सत्यता वेगळी सिद्ध करायची आवश्यकताच नाही. याला ‘अंतर्दृष्टी’ म्हणतात. प्रा. ई.टी. बेल सांगतात, ‘रामानुजन यांची अंतर्दृष्टी अलौकिक होती. ती म्हणजे स्वर्गीय भेट आहे.’ प्रा. हार्डी सांगतात, ‘गणितज्ञाकडे दूरवर (खोलवर) पहाता येण्यासाठी एक तटस्थ दृष्टी असायला हवी. रामानुजन यांच्याकडे ती होती.’ हे वैशिष्ट्य विदेशी संशोधकांशी त्यांची तुलना करतांना महत्त्वाचे ठरते. त्यातही रामानुजन यांची अवस्था अहंशून्य होती.’ ‘सर्व स्वप्नात देवीमुळे समजले’ या प्रतिपादनातून, त्यांच्या अंतर्बाह्य साधेपणातून, तसेच अन्य गोष्टींतून लक्षात येते.

इ. प्रतिभेकडून प्रज्ञेकडे जाण्याची सहजसाधना : रामानुजन हे प्रतिभावान होते, याची चुणूक शालेय जीवनातील घटनांतून स्पष्ट लक्षात येते. कितीही अडचणी आल्या, तरी गणिताचा ध्यास असणे, तसेच धार्मिकता न सोडणे, या एकाच नाण्याचा दोन बाजू झाल्या. साधकत्वाच्या दृष्टीने ठरवलेल्या मार्गाची स्पष्टता आणि मार्गक्रमण करण्याची जिद्द यांतून दिसते. मग या प्रतिभावानाचा प्रवास प्रज्ञेकडे कधी पूर्ण झाला, हे समजलेसुद्धा नाही. त्यांना वाटते, तर गणिताप्रमाणेच अन्य विषयांकडे लक्ष देऊन पदवी प्राप्त करून ते मोठे अधिकारी बनू शकले असते. रामानुजन यांच्या घरच्यांच्या मनात ते आले; परंतु त्यांच्या मनाला ते शिवलेही नाही, हे वैराग्य नव्हे काय ?

ऊ. शब्दपूर्व पारखाची विलक्षण क्षमता : बहुतांश गणितज्ञांना तर्क मांडत जात अंतिम निष्कर्षाला पोचल्यावर समाधान मिळते, आनंद होतो. रामानुजन यांना अंतिम टप्प्याला ते थेट तेथेच पोचत असल्याने लगेच मिळत असे. अन्य कुणाला नवीन सुचलेले समीकरण किंवा सूत्र आतापर्यंत जे ठाऊक आहे, त्यापेक्षा वेगळे काही तरी असेल, तर सामान्यतः व्यक्तीची बुद्धी प्रश्न उपस्थित करते आणि जे दिसते ते बुद्धीला पटत नसेल, तर उत्पन्न होताच फेटाळले जाते. रामानुजन यांचे मन इतके मोकळे होते की, बाकीच्यांना त्यांच्या तर्कशुद्धतेमुळे जे स्वीकारले जाणार नाही, ते रामानुजन सहज स्वीकारू शकत असत. हे त्यांच्यातील धार्मिक श्रद्धेशी समांतर आहे. जे दिसले त्याची सत्यता त्यांना स्वत:ला पटवावी लागत नसे. तर्क हा शब्दांना धरून चालतो. येथे तो नाहीच म्हणून याला ‘शब्दपूर्व पारख’ म्हणतात. रामानुजन यांची ही क्षमता विलक्षण होती.

१७. हिंदु धर्म-अध्यात्म विज्ञानासाठी पूरक

या लिखाणातून हिंदु धर्म-अध्यात्म संशोधनाच्या विरोधात तर नाहीतच, उलट पूरक आहे, हे सर्वांना स्पष्ट व्हावे, ही परमात्म्याला प्रार्थना ! रामानुजन यांच्या गणितातील कार्याविषयी ते ईश्वरीय कसे हे लिहिण्याचा प्रयत्न करणे, हेही त्यांच्या विचारांना धरूनच झाले. त्यामुळे त्या प्रतिभेची स्तुती हे ईशसंकीर्तन. गीतेमध्ये भगवंताने त्याची विभूती कशी ओळखावी ? हे सांगितलेले आहे. ती संज्ञा रामानुजन यांच्या संशोेधनाला लागू पडते. त्यामुळे आज श्रीकृष्ण परमात्म्याने ‘विभूतीयोग’ परत सांगितला, तर तो त्यात ‘गणितज्ञांमध्ये मी रामानुजन’, असे नक्की म्हणेल !

(समाप्त)

॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥ 

– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, (वय ६५ वर्षे), एम्.डी. (मेडिसीन), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०२६)