लिखित पुरावा नाही, म्हणजे घडलेच नाही ?

गोव्यातील काँग्रेसचे आमदार अधिवक्ता कार्लुस फेरेरा यांच्या ‘हातकातरो खांबावर हात कापल्याचे पुरावे नाहीत !’ या वक्तव्यावर सडेतोड भाष्य 

हातकातरो खांब

गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना ‘मानशीर’, ‘बानार’ असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले, तर कुणीही ऐकून घेणार नाही. वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत; पण कधीतरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की, ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे ? त्याचप्रमाणे ‘हातकातरो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते’, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्या जागी घडलेल्या घटनांवरून आणि त्याची जबरदस्त भीती बसल्याने लोकांच्या स्मरणात त्या संदर्भातील नावे घट्ट रहातात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.

‘पेलोरिनो नोव्हो’ हा खांब एका प्राचीन हिंदु देवळाचा भाग होता. स्तंभाच्या खालच्या भागावर कन्नड लिपीत ‘दयादंन्या’ असे लिहिलेले आहे. हा शिवालयाचा खांब असावा. आता देवळाचा खांब पेलोरिनो नोव्हो कसा झाला, याविषयी कुणीही सांगत नाही. देऊळ पाडून राहिलेल्या खांबाजवळ उभे राहून फर्माने देत असतील कि शिक्षा देत असतील ? हा तर्काचा भाग आहे. त्यातही पुन्हा पेलोरिनो वेल्हो हा जुना स्तंभ बाजारपेठेजवळ होता.

…पण ‘हातकातरो’ असे नाव केवळ गोव्यातच !

श्री. प्रसन्न शिवराम बर्वे

आणखी एक महत्त्वाचे ‘पेलोरिनो नोव्हो’ नावाचा स्तंभ केवळ गोव्यातच होता का ? नाही. दमण, दीव आणि कोचीन येथेही असे स्तंभ होते; पण त्या स्तंभांना अशी शिक्षा दिल्याचा, जाळल्याचा, हात कापल्याचा संदर्भ असलेले नाव तिथे प्रचलित नाही. ‘हातकातरो’ असे नाव केवळ गोव्यातच आहे. का ? कारण तिथे केवळ आदेशच घोषित केले जायचे आणि येथे हात कापले जायचे.

इस्लामच्या घृणेप्रमाणे वागणारे ख्रिस्ती आणि पोर्तुगीज !

सोमनाथाचे मोठे शिवलिंग फोडले, तोडले आणि त्याचे तुकडे देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांवर बसवले. का ? येता-जाता त्याला तुडवावे म्हणून. का ? तर काफीर आणि त्यांच्या देवता यांच्याविषयी असलेली आत्यंतिक घृणा. तीच घृणा त्या पंथाचे नसलेल्यांविरुद्ध बाळगणारे ख्रिस्ती आणि पोर्तुगीज यांनी पाडलेल्या स्थानिकांच्याच देवळाच्या खांबाला बांधून स्थानिकांनाच शिक्षा देतील, हात कापतील कि कायदेशीर व्यवहारांच्या आणि अधिकृत शासकीय घोषणा देतील ? याचा विचार तर्काने करावा लागतो.

‘सगळेच लिहिलेले नसते. लिहिलेले नाही, म्हणजे तसे झालेच नाही’, असे होत नाही.

– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (२८.४.२०२६)

(साभार : ‘प्रसन्नवदने ब्लॉग’वरून)