आज माणूस यंत्राने सगळ्या बाजूने घेरला गेला आहे. प्रत्येक गोष्ट आता एका ‘कळी’वर (बटणावर) आली. सर्व ठिकाणी या यंत्रांमुळे माणसाचे काम अतिशय सुसह्य आणि जलद झाले आहे. दैनंदिन जीवन जगतांना लागणार्या अनेक यंत्रांपैकी भ्रमणभाष (मोबाईल) ही माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक झाली आहे; पण या विज्ञानाने दिलेल्या देणगीचा आपण लाभ करून घ्यायचा कि तोटा ? अशा नाण्याच्या दोन बाजू येथेही आहेत.
अमेरिकेमध्ये घडलेल्या घटनेतून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तेथील एका व्यक्तीने ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्तेच्या)च्या नादाला लागून चक्क आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण कदाचित वेगळे असेलही; परंतु वरकरणी तात्कालिक कारण तरी ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा आदेश’ हेच आहे. या व्यक्तीने एका सामान्य संवादाने ‘एआय’शी बोलण्यास आरंभ झाला. ‘ए.आय.’कडून मिळणार्या प्रतिसादामुळे त्या व्यक्तीला ‘एआय’ मानवी भावना समजू शकतो, ओळखू शकतो, अडचणी सोडवू शकतो, असे त्याला वाटू लागले. ‘एआय’कडून ‘मी यंत्र आहे, तुम्ही याविषयी अजून कुणाशी बोलू शकता’, असे सावधगिरीचे संदेशही येत होते; मात्र ते दुर्लक्षित करत ही व्यक्ती ‘एआय’ची २४ घंटे असलेल्या उपलब्धतेलाच आयुष्य समजून बसली ! इतकी की, ‘एआय’ला त्याची पत्नी मानू लागला. ‘आपण ‘एआय’समवेत कायमस्वरूपी एकत्र राहू शकतो’, या आभासी जगताची ती व्यक्ती कल्पना करू लागली. या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला ‘एआय’च्या जगतात जावे लागेल, या विचाराने संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली. किती भयंकर आहे ना ? कल्पना आणि वास्तव यातील पुसट होत चालेल्या सीमारेषेचे हे दुष्परिणाम आहेत.
हे टाळण्यासाठी आपण स्वत: अत्यंत सावध असणे आवश्यक आहे. यातील महत्त्वाचा टप्पा, म्हणजे आपले कुटुंब, मित्रपरिवार यांच्याशी सतत संवाद साधणे; कारण जेव्हा व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद थांबतो, तेव्हा ‘एआय’कडे वळण्याचा भाग होतो. भ्रमणभाष वापरण्याचा अवधी ठरवून घेणे आणि त्याचे स्वत:च्या स्तरावर स्वत:च्याच भल्यासाठी काटेकोर पालन करणे, ‘एआय’ला स्वत:च्या कोणत्याही भावना नसून ते पूर्णपणे कृत्रिम आहे, याची मनाशी पक्की गाठ बांधणे, पालकांनी मुले भ्रमणभाषवर काय करत आहेत ? यावर लक्ष ठेवून त्यांना कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक मर्यादेची जाणीव करून देणे, हे करणे आवश्यक आहे. मानसिक ताणाखाली असतांना ‘एआय’चा पर्याय निवडण्यापूर्वी आपल्या जवळची माणसे, मानसोपचारतज्ञ यांच्याशी संवाद साधावा. विविध साधनामार्ग आपल्याला परमात्म्याशी संवाद साधायला शिकवतात. यामुळे आपल्याला मानसिक शांती आणि समाधान प्राप्त होते. अध्यात्मामुळे आभासी जगाच्या या विनाशकाली वास्तवापासून दूर रहाणे शक्य होणार आहे.
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी


‘स्मार्ट’ फसवणूक !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी न्यायालयीन संघर्ष
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
प्रेमप्रकरण कि हृदयातील कपट ?
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?