बेपत्ता गायी शोधण्यासारख्या कामात वेळ घालवण्यापेक्षा गंभीर गुन्ह्यांचे अन्वेषण करा ! – Karnataka High Court

कर्नाटक उच्च न्यायालयाची पोलिसांना सूचना

बेंगळुरू (कर्नाटक) – बेपत्ता झालेल्या गायी शोधण्यासारख्या कामात वेळ घालवण्यापेक्षा गंभीर आणि खर्‍या गुन्ह्यांचे अन्वेषण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना पोलिसांना दिली. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पोलिसांनी एका प्रकरणात बेपत्ता गायींचा शोध चालू केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एम्. नागप्रसन्ना यांनी पोलिसांच्या अन्वेषणाच्या प्राधान्यक्रमाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत वरील सूचना पोलिसांनी दिली.

पोलिसांनी सारासार विचार केला पाहिजे !

न्यायमूर्ती पुढे म्हणाले, ‘‘पोलीस काय करत आहेत ? त्यांनी खर्‍या गुन्ह्यांचा शोध घ्यायला हवा. इतर अनेक गंभीर गुन्हे प्रलंबित असतांना बेपत्ता गायींचा शोध घेणे, हे पोलिसांचे प्राथमिक काम असू शकत नाही. अनेक वेळा किरकोळ तक्रारींवर पोलिसांकडून अनावश्यक वेळ वाया घालवला जातो. त्यामुळे महत्त्वाच्या खटल्यांच्या अन्वेषणाला विलंब होतो. बेपत्ता गायींचा शोध घेण्यासारख्या प्रकारांमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अन् गंभीर खटल्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी अधिक तत्परता दाखवणे आवश्यक आहे. गायी बेपत्ता होण्यासारखी प्रकरणे ‘गुन्हेगारी खटला’ म्हणून हाताळतांना पोलिसांनी सारासार विचार केला पाहिजे.’’

यापूर्वीही इतर प्रकरणांत उच्च न्यायालयाने पोलिसांची अन्वेषणातील संथ गती आणि प्राधान्यक्रम यांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली आहे.