साधनेची उच्चतम अवस्था गाठलेले पू. राजाराम (आबा) नरुटे (वय ९३ वर्षे) !

‘जुलै २०२४ मध्ये मी पू. आबांना (माझे वडील पू. राजाराम नरुटे यांना) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात घेऊन आलो. पू. आबांनी त्यांचे याआधीचे जीवन ईश्वरपूर (सांगली, महाराष्ट्र) येथे व्यतीत केले आहे आणि जीवनाच्या या टप्प्यावर ते सनातनच्या आश्रमात येऊन पुढील साधना करत आहेत. त्यांनी जी आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली आहे, त्याविषयी पुढे दिले आहे.

पू. राजाराम नरुटे

१. स्वयंस्फूर्तीने आणि उत्साहाने व्यायाम करणे

देवद आश्रमात सकाळी ६.३० वाजता योगासनांचा वर्ग असतो, तसेच संध्याकाळच्या सत्रात सात्त्विक उत्पादनांच्या संबंधित सेवा करणारे साधक व्यायाम करण्यासाठी एकत्र येतात. या वर्गांमध्ये पू. आबा त्यांना शक्य होतील, तितके व्यायामप्रकार करतात. ते या वयातही स्वयंस्फूर्तीने आणि उत्साहाने व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात.

२. ध्यानमंदिरात होणार्‍या आरतीला जाण्याचा ध्यास

प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी ध्यानमंदिरात होणार्‍या देवतांच्या आरतीसाठी मी पू. आबांना  घेऊन जातो. ते आरती करतांना तल्लीन होतात. ते कोणत्याही परिस्थितीत आरतीसाठी जाण्याचे चुकवत नाहीत. ते मला दिवसभरात अधूनमधून ‘आरतीची वेळ झाली का ?’, असे विचारतात. त्यांना आरतीसाठी जाण्याचा ध्यास लागलेला असतो.

पू. राजाराम नरुटेआबा यांचे अनमोल विचारधन !

१. ‘देवाकडे का मागायचे ? आपण हात पाय हलवायला हवेत. ‘देवा, मला पलंगावर दे’, असे कशाला म्हणायचे ? आपण प्रयत्न केले की, देव देतोच !

२. आपली देवावर एवढी भक्ती असायला हवी की, आपल्याला सुळावर जरी चढवले, तरी आपण डगमगायला नको. त्याला खरी भक्ती म्हणतात !’

३. मन में राम, तो बगल में क्या काम ? : मनामध्ये रामाचे नाव असेल, तर आजूबाजूला बघायची काय आवश्यकता आहे ?

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.४.२०२६)

३. आश्रमजीवनाशी समरस होणे

श्री. शंकर नरुटे

आता त्यांच्या मनात घराविषयी विचार येणे न्यून झाले आहे. आता ते ‘‘घरी जायला नको’’, असे म्हणतात. ते घरातील व्यक्तींना सांगतात, ‘‘मी आश्रमातच रहाणार आहे.’’

४. पू. नरुटेआबा यांचे देवाशी असलेले अनुसंधान

४ अ. श्रीरामाचा नामजप झोपेतही सतत करणे : पू. आबा देवद आश्रमात आल्यापासून ते स्वतःहूनच ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतात. आता आपल्या सर्वांना काळानुसार तोच नामजप करायला सांगितला आहे. पू. आबांचा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप रात्रंदिवस होत असतो. त्यांचा रात्री झोपेतही नामजप चालू असतो. मला रात्री झोपेतून मध्येच जाग आली की, त्यांचा नामजप करण्याचा मला आवाज येतो. ते सतत नामस्मरण करतात.

४ आ. सतत अनुसंधानात असल्यामुळे मनात विचार नसणे : पू. आबा अधूनमधून भजने किंवा अभंग म्हणतात. ते सतत देवाच्या अनुसंधानात असतात. ते सतत देवाच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्या मनात इतर कोणतेच विचार नसतात. ते केव्हाही उठून नामजप करतात आणि भजने म्हणतात.

५. देहबुद्धी नसणे

५ अ. भुकेची जाणीव नसणे : पू. आबांना भुकेची जाणीव नसते. आपणच त्यांना वेळेत उठवून ‘‘महाप्रसाद आणला आहे’’, असे सांगावे लागते. ते स्वतःहून ‘‘मला भूक लागली आहे. महाप्रसाद आणा किंवा महाप्रसाद आणण्यास उशीर झाला’’, असे कधीच सांगत नाहीत.

५ आ. ‘घड्याळात किती वाजले ?’, याकडेही पू. आबांचे लक्ष नसते.

५ इ. आंतरिक ऊर्जेमुळे बाह्य गोष्टींची आवश्यकता न भासणे : आपण त्यांना जे करायला सांगू, ती कृती पू. आबा त्वरित करतात. ते आपल्या कुठल्याही बोलण्यास विरोध करत नाहीत. त्यांच्यातील आंतरिक ऊर्जेमुळे त्यांना कोणत्याही बाह्य गोष्टींची आवश्यकता भासत नाही.

५ ई. वयोमानानुसार होणारे शारीरिक त्रास सहजतेने आणि आनंदाने सहन करणे : वयोमानानुसार पू. आबांची वैद्यकीयदृष्ट्या शरिराची क्षमता क्षीण झाली आहे; मात्र ते करत असलेल्या साधनेच्या प्रयत्नांमुळे ते उत्साही असतात. त्यांना वयोमानानुसार होणारे त्रास ते सहजतेने आणि आनंदाने सहन करतात. ते त्याविषयी कधीच काही सांगत नाहीत.

६. सर्वत्र देव पहाणे आणि त्याच्या नामात एकरूप होणे

६ अ. पू. आबांच्या ध्यानीमनी केवळ भगवंताचा ध्यास असतो. 

६ आ. त्यांना समोरून कुणी आलेले दिसले की, ते त्यांना नमस्कार करतात. बाहेर झाड दिसले, तरी ते त्याला नमस्कार करतात. त्यांना येता-जाता सूर्याचे दर्शन झाले की, ते सूर्याला नमस्कार करतात. मी खोलीत गेलो की, ते प्रथम मला हात जोडून नमस्कार करतात. त्यांना ‘सर्वांमध्ये देव आहे’, असे वाटते.

६ इ. त्यांना सतत समष्टीत आणि देवाच्या सान्निध्यात रहायला आवडते. 

६ ई. पू. आबा भजने म्हणत असतांना त्यांचा भाव जागृत होणे आणि ऐकणार्‍या व्यक्तीचाही भाव जागृत होणे : पू. आबा अभंग तल्लीन होऊन म्हणतात. तेव्हा त्यांचा भाव जागृत होऊन त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे पाहून समोरच्या व्यक्तीचाही भाव जागृत होतो. खरेतर त्यांना पूर्ण भजनही आठवत नाही. त्यांना भजनांतील १ – २ ओळीच आठवतात. ते त्या ओळी त्याच्या अर्थाशी एकरूप होऊन म्हणतात.

७. पू. आबांची आनंदमय स्थिती

पू. आबा सतत आनंदी असतात. त्यांचे कशाविषयीही गार्‍हाणे नसते. त्यांच्या मनात इतरांविषयी आपुलकीची भावना असते. ‘पू. आबांकडे पहातच रहावे’, असे मला वाटते. ते निरागस बाळासारखे दिसतात. त्यांचा चेहरा तेजस्वी दिसतो.’

‘गुरुदेवांच्या कृपेने मला असे संत वडील म्हणून लाभले आणि मला त्यांची सेवा करायला मिळाली. ‘संतसेवा कशी करावी ?’, याविषयी गुरुदेव शिकवत आहेत’, त्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. शंकर राजाराम नरुटे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.४.२०२६)