‘Tehreek-e-Taliban Pakistan’ : भारताचा पराभव करण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष !

‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेचा आरोप

नवी देहली – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने जाणीवपूर्वक अफगाणिस्तानला लक्ष्य केले. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी अफगाणिस्तान समवेतचा तणाव वाढवला, असे आरोप ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) त्याच्या ‘मुजल्लाह तालिबान’ या मासिकात केले आहेत. या आक्रमणांमुळेच फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, असेही टीटीपीने म्हटले आहे.

पाकिस्तानने अफगाणिस्तानला सोपे लक्ष्य मानले !

मुनीर यांनी भारतापेक्षा अफगाणिस्तानला एक सोपे लक्ष्य मानले. भारतासमवेतच्या मे २०२५ च्या संघर्षात पराभव झाल्यानंतर आणि जगभरातून भारताला मोठा पाठिंबा मिळाल्यानंतर मुनीर यांनी हा मार्ग निवडला. स्वतःचे सैनिकी यश दाखवणे आणि पाकिस्तानवरील स्वतःची पकड आणखी सक्षम करणे, हा त्यामागील हेतू होता, असाही दावा केला जात आहे. पाकिस्तानने फेब्रुवारीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध उघड युद्ध चालू केल्याची घोषणा केली. ‘ऑपरेशन गज्ब-लिल्-हक’चा भाग म्हणून पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानमधील अनेक ठिकाणी आक्रमणे केली. त्यांस अफगाणिस्ताननेही प्रत्युत्तर दिले. दोन्ही देशांमधील २ सहस्र ६११ किलोमीटर लांबीची सीमा ‘ड्युरँड लाइन’ म्हणून ओळखली जाते. तथापि या रेषेला अफगाणिस्तान औपचारिकपणे मान्यता देत नाही.