संपादकीय : थापर यांचा ‘वोकिझम’ !

उद्योजिका नमिता थापर : नमाज पढण्याच्या पुरस्कर्त्या

वोकिझम’च्या पुरस्कर्त्या आणि उद्योजिका नमिता थापर यांनी ३ आठवड्यांपूर्वी त्यांच्या ‘रील’मध्ये (‘काही सेकंदांच्या व्हिडिओ’मध्ये) नमाज पढण्याचे अनेक लाभ आणि गुण गायले आहेत. (‘वोकिझम’ म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !) त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या टिकेला त्यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे, त्यातून ‘थापर प्रवृत्ती’च्या साम्यवादी मानसिकतेच्या प्रचंड मोठ्या गटाचा आंतरराष्ट्रीय आस्थापनांवर कसा प्रभाव आहे ? आणि त्यातून एक प्रकारे ‘हिंदुद्वेष पसरवणे आणि अन्य पंथियांचे उदात्तीकरण’ हे करून पर्यायाने या हिंदु राष्ट्राला तोडण्याचे काम कसे होत आहे ?, हे पुढे आले आहे.

थापर यांनी त्यांच्यावर झालेल्या टिकेला उत्तर देतांना ‘महिलांना लक्ष्य करणारे हिंदू’ महिलांसाठी आरक्षणाची मागणी करत आहेत’, असे सांगून ‘वडाची साल पिंपळा’ला लावलेली आहे. इथे पुरुष उद्योजक असता, तरी त्याच्यावर टीका झालीच असती. थापर यांच्यासारख्या उद्योगक्षेत्रात पुरुषार्थ करणार्‍या स्त्रीने सोयीस्कररित्या येथे ‘स्त्री’ असल्याची भूमिका घेतली आहे. थापर म्हणतात, ‘‘मी एक आरोग्यविषयक व्यावसायिक असून मी योगासने, सूर्यनमस्कार यांवरही ‘रील’ बनवते; पण तेव्हा मात्र कुणी काहीच बोलले नाही.’’ त्यांचे हे स्पष्टीकरण दिसते तेवढे सरधोपट नाही. त्यांचा हेतू लक्षात आल्यामुळेच त्यांच्यावर सहस्रो जणांनी टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय आस्थापने आणि ‘वोमिझम’चा प्रभाव असणारे उच्चभ्रू उद्योगपती अन् त्या माध्यमातून हिंदु तत्त्वज्ञान आणि हिंदु धर्मीय यांच्यावर होणारे आघात हे एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत, हे पहाणे महत्त्वाचे आहे.

‘सोनी टीव्ही’ या वाहिनीवर ‘शार्क टँक इंडिया’ हा व्यावसायिकांचा ‘रिॲलिटी शो’ (सामान्य लोक सहभागी होतात, असे वाहिनीवरील वास्तववादी कार्यक्रम) आहे. यामध्ये काही जण व्यवसायाच्या नवीन संकल्पना गुंतवणूकदारांसमोर सादर करतात. समोर बसणारे मोठे उद्योजक (‘शार्क’) त्यात पैसे गुंतवतात. नमिता थापर या एक ‘शार्क’ आणि या कार्यक्रमाच्या परीक्षकही आहेत.

‘वेक अप’ म्हणजे उठणे यावरून आलेल्या ‘वोक’ या शब्दाचा अर्थ जागृत करणे, सचेत करणे, असा होतो. अमेरिकी गोरे लोक हे तेथील मूळ काळ्या लोकांवर करत असलेल्या अत्याचारांविषयी वर्ष १९३० च्या दशकात जन्माला आलेल्या या संकल्पनेने आता अत्यंत विकृत रूप धारण केले आहे. ही ‘जागृती’ आता परंपरा, संस्कृती, धार्मिक तत्त्वज्ञान यांविरोधात झाली आहे. सध्या अमेरिकेतील आणि त्यामुळे पर्यायाने भारतातील साम्यवादी तथाकथित विचारवंत, पत्रकार हे या ‘वोकिझम’चा पुरस्कार करत आहेत. पृथ्वीवरील सर्वच समाजाला ‘रानटी’ बनवण्याची मुळे यात आहेत. ते कट्टर स्त्रीवाद, विद्रोही, समलैंगिकता यांचे ते समर्थन करतात आणि वरकरणी दाखवण्यासाठी वांशिक भेदभाव, हवामान पालट अन् त्यासाठी पर्यावरण जागरूकता आदी विषय घेतात. ‘धार्मिक तत्त्वज्ञान, पारंपरिक शास्त्र, रूढी यांवर टीका करणे’, हा त्यांचा मूळ गाभा झाला अाहे. अमेरिकेतील विद्यापिठांतील काही विभागांतून दिले जाणारे हिंदु धर्मविरोधी शिक्षणही याला कारणीभूत आहे आणि विशेष म्हणजे या विभागांना निधी पुरवणारी मोठी आंतरराष्ट्रीय आस्थापनेच आहेत, असे हे चक्र आहे !

कॅनडामध्ये शिक्षण घेतलेले ‘लेन्सकार्ट’चे सचिव पियुष बन्सल यांची त्यांच्या आस्थापनांच्या दुकानांतील कर्मचार्‍यांना ‘एक वेळ हिजाब चालेल; परंतु कुंकू, धागा आदी हिंदूंची धार्मिक प्रतिके चालणार नाहीत’, ही हिंदुद्वेष्टी भूमिका आता हिंदूंच्या प्रखर विरोधामुळे आणि आर्थिक कारणाने त्यांनी पालटली असली, तरी ‘त्यांची हिंदुविरोधी मानसिकता पालटली असेल’, असे समजण्याची चूक कुणी करणार नाही. इथे लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे हे हिंदुद्वेष्टे बन्सलही या ‘रिॲलिटी शो’मधील एक गुंतवणूकदार आहेत. हिंदुद्वेष्टे अतीश्रीमंत एकत्र येऊन कशा प्रकारे हिंदुविरोधी योजना आणि धोरणे राबवत आहेत अन् गरजू बहुसंख्य सामान्य हिंदूंना धर्मापासून दूर नेत आहेत, हे याचे दुसरे उदाहरण आहे. तिसरे उदाहरण टी.सी.एस्. (टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस) आस्थापनातील मुसलमानी वर्चस्वातून लक्षात आले. ‘मुसलमान शेजारी महिलेकडून चहा देऊ करणारे’ ‘रेडलेबल’ आस्थापनाच्या चहाचे विज्ञापन असेल, तनिष्क (टाटा) आस्थापनाचे ‘टिकली न लावता सणाच्या दिवशी दागिने घातलेली हिंदु स्त्री दाखवणारे’ विज्ञापन असेल किंवा हिंदु सणाच्या वेळी मुसलमानांचे कपडे खराब होतात, हे अधोरेखित करणारे साबणाचे विज्ञापन असेल, या सर्व गोष्टी हिंदुद्वेष आणि अन्य पंथांचे उदात्तीकरण कसे पसरवतात, हे एव्हाना हिंदूंच्या लक्षात आले आहे.

 बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ख्रिस्ती आणि मुसलमान पंथियांचा दबाव !

‘रिॲलिटी शो’च्या कार्यक्रमात मासिक पाळीच्या वेळी हिंदु परंपरेत जी काही बंधने पाळायला सांगितली आहेत, त्याविरोधात जागृती करणार्‍या नवीन उद्योगाच्या थापर भागीदार बनल्या आहेत. याच कार्यक्रमात ‘मला हवे ते घालण्याचा अधिकार आहे’, अशा वरकरणी स्त्रीवादी वाटणार्‍या भूमिकेचा जोरदार पुरस्कार करून अंततः बुरखा विकणार्‍या मुलीच्या आस्थापनालाही अपराधी भावनेने ‘ही भूमिका आवडल्या’चे सांगत थापर आणि बन्सल यांनी आर्थिक साहाय्य दिले. इथे त्यांचे स्त्रीस्वातंत्र्य, समानता आदी कुठे गेले कुणास ठाऊक ? या कार्यक्रमात एखादी स्त्री ‘घुंघट’ घालून आली असती, तर तिच्यावर त्यांनी ‘बुरसटलेली’ अशी टीका केली असती. या घटनेतून उद्योगपतींसह सामान्यांतही ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ (त्रास देणार्‍या व्यक्तीशीच जुळवून घेण्याची मानसिक स्थिती निर्माण होणे) होत असल्याचा धोका वाढला आहे, हे लक्षात येते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेससारख्या आस्थापनात हिंदु तरुण-तरुणींनी सहन केलेला त्रास हे दुसरे-तिसरे काही नसून एक प्रकारचे ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ होते. तज्ञ आणि अभ्यासक यांच्या मते बहुराष्ट्रीय आस्थापनांवर ख्रिस्ती आणि मुसलमान पंथियांचा दबाव असल्याचे सिद्ध होत आहे; किंबहुना त्यांना गुंतवणुकीसाठी अन्य पंथियांच्या प्रचाराची छुपी मोहीम राबवावीच लागते, असेही काहीसे चित्र आता पुढे येत आहे. गुंतवणूकदार ज्या मानांकनानुसार आंतरराष्ट्रीय आस्थापनांत गुंतवणूक करतात, ते मानांकन ठरवणार्‍या संस्था थेट ‘व्हॅटिकन चर्च’शी संबंधित आहेत. मानांकने पूर्ण करण्यासाठी आस्थापनांना पर्यावरण, तृतीय पंथीय किंवा समलैंगिकता, विशेष म्हणजे साम्यवाद्यांच्या आवडत्या ‘विविधता’ आणि ‘धार्मिक सर्वसमावेशकता’ आदी तत्त्वांनाही प्रोत्साहन द्यावे लागते. येथे थापर यांच्यावर हिंदूंनी सडकून टीका केल्यावर त्यांनी उल्लेखलेल्या ‘मला हेच शिकवण्यात आले आहे की, ‘आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे’, या वाक्याचा संदर्भ लक्षात येईल. असो. इथे दिलेल्या विविध सूत्रांतून आणि एकूण ‘वोकिझम्’च्या माध्यमातून हिंदूंना त्यांच्यावर होणारे आघात परतवण्यासाठी किती विविध स्तरांवर सिद्ध रहावे लागेल, हे स्पष्ट होते !

हिंदूंनो, आंतरराष्ट्रीय आस्थापनांच्या माध्यमातून पसरणारा हिंदुद्वेष आणि अन्य धर्मांचे उदात्तीकरण समजून घ्या अन् सावध व्हा !