अडीच स्तरावरील युद्ध आणि भारताची सिद्धता !

भारताच्या इतिहासात अनेक राजे-महाराजे, संघटना, संत आणि व्यक्ती यांनी हिंदु धर्म अन् संस्कृती जपण्यासाठी लढा दिला. त्यांच्यामुळेच आज हिंदु धर्म आणि संस्कृती टिकून आहे. याच मांदियाळीतील हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी ‘प्राच्यम्’ या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चे संस्थापक आणि मुख्याधिकारी कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त) यांनी ‘चेंज मेकर्स’ कार्यक्रमांर्तगत संवाद साधला. या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भारतातील कथित धर्मनिरपेक्षता आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी मांडलेले उद्बोधक विचार या लेखातून प्रकाशित करत आहोत.

१२ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘धर्म म्हणजे काय ?, सर्वधर्मसमभावाची जोपासना केवळ हिंदु राष्ट्रात शक्य आणि भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या मुलाखतीचा अंतिम भाग येथे देत आहोत.

उत्तरार्ध 

पूर्वार्ध वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1028865.html

१. धर्माला राजाश्रय मिळाल्याविना हिंदु राष्ट्राला परिपूर्णता येणे अशक्य !

राज्यघटनेमध्ये जेथे ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ लिहिले आहे, तेथे ‘ही राज्यघटना भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान इत्यादींचे रक्षण करते’, असे लिहिता येईल. त्यामुळे आपल्याला जे हवे आहे, ते साध्य करण्याची प्रक्रिया आपोआपच घडू शकते. सरकारने याचा निश्चितपणे विचार करायला हवा. (भारतापासून विभक्त झालेले पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान (आताचा बांगलादेश) हे देश इस्लामी राष्ट्रे म्हणून घोषित झाली. त्याला कुणीही आक्षेप घेतला नाही आणि संपूर्ण जगाने त्यांना स्वीकारले; पण ज्या राष्ट्राचा आत्मा हिंदु सनातनी आहे, त्याला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करू शकलो नाही. – कॅप्टन प्रवीण चतुर्वेदी (निवृत्त)) ‘धर्म बलाने अंकित असतो’, असे धर्मवचन आहे. राजधर्मात बल असते, त्यामुळे जोपर्यंत धर्माला राजाश्रय मिळत नाही, म्हणजेच जोपर्यंत राज्य हे ‘हिंदु राज्य’ बनत नाही, तोपर्यंत त्यात हिंदु राष्ट्राची परिपूर्णता येणार नाही. या अर्थाने आपण हे विचारात घेतले पाहिजे की, राष्ट्र-राज्याच्या दृष्टीकोनातून हिंदु राष्ट्र हे एक हिंदु राज्य असले पािहजे.

२. मुसलमान आणि ख्रिस्ती शक्ती भारताच्या विरोधात एकत्र !

वास्तविक भारत ‘दार उल् इस्लाम’ (इस्लामी प्रदेश) होईल कि ख्रिस्त्यांच्या हाताखाली येईल ? यासाठी जागतिक स्तरावर इस्लाम आणि ख्रिस्ती यांचा संघर्ष चालू आहे. त्यांना ठाऊक आहे की, इस्लाम ८०० वर्षांत हिंदूंना हरवू शकला नाही आणि ब्रिटिशांनी भारतावर २०० वर्षे राज्य केले, तरीही ख्रिस्ती धर्म भारताचे धर्मांतर करू शकला नाही. हिंदू अजिंक्य असल्याने त्यांना हरवणे कठीण आहे, हे माहिती असल्याने या दोन्ही शक्ती भारताच्या विरोधात एकत्र आल्या आहेत.

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

वर्ष २०१२ पासून हिंदु जनजागृती समितीने ‘हिंदु राष्ट्र जागृती’ची एक मोहीम चालू केली. जनतेवर या गोष्टींचा अतिशय प्रभाव पडला आहे. त्यामुळे जनमानसाच्या भावनेला कोणताही राजकीय पक्ष टाळू शकणार नाही. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष घोषणापत्रात लिखित आश्वासन देतात; पण ते आश्वासन पूर्ण करत नाहीत. त्याला जनतेसमवेतचा करार समजून न्यायव्यवस्थेने मान्यता दिली पाहिजे. ठराविक काळात संबंधित राजकीय पक्ष घोषणापत्राप्रमाणे निर्णय घेत नसेल, तर त्याविषयी न्यायालयीन सुनावणी झाली पाहिजे. एक हिंदु किंवा एक भारतीय म्हणून मी माझ्या सर्व देशबांधवांना आवाहन करतो की, त्यांना खरोखरच धर्म, संस्कृती, दैदीप्यमान इतिहास, मंदिर परंपरा, हिंदु तत्त्वज्ञान यांचे रक्षण व्हावे कि नाही ?, याविषयी काय वाटते, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे.

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती.

३. भारतात हिंदुत्वासाठी पोषक वातावरण

‘भारताला स्वातंत्र्य मिळणे हा कदाचित् कट तर नव्हता’, असेही मला कधी कधी वाटते; कारण ‘आपले सरकार सत्तेवर आले आहे’, या भ्रमात आपण गेल्या १ सहस्र वर्षांत जेवढे हरलो नाही, त्याहून अधिक गेल्या ६० वर्षांत हरलो आहोत. शिक्षणव्यवस्थेच्या आणि मानसिकतेच्या दृष्टीतून हा पराभव झाला आहे. आपल्या शासनकर्त्यांनी आपला देश घडवण्यासाठी जे करायला हवे होते, ते केले नाही. निश्चितच आता आपले राज्य यावे, आपला स्वतःचा देश असावा आणि हिंदु म्हणून आपल्याला संरक्षण मिळावे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण होत आहे. याच भावनेच्या लाटेमुळे आपण राहुल गांधींना कधी गंगेत स्नान करतांना, तर कधी अंगावर जानवे घालतांना पहातो; कारण जनतेची भावना कोणत्या दिशेने जात आहे, हे त्यांनाही ठाऊक आहे.

सध्या भारताचा सामरिक उदय होत आहे. भारत दुर्मिळ धातूंच्या क्षेत्रात प्रगती करत आहे, हे जगालाही दिसत आहे. भारतीय जनता संघटित होत आहे. त्यामुळे भारताची प्रगती थांबावी, असे अमेरिकेला वाटते. या दृष्टीकोनातून आपण ‘टेरिफ वॉर’ (आयात शुल्क)कडे पाहिले पाहिजे. चीन हा त्यांचा पहिला शत्रू आहे, तरी ते चीनला आणि इतर देशांना टाळून थेट भारताला लक्ष्य करत आहेत. याला एक धार्मिक पैलू आहे, तो म्हणजे ख्रिस्ती धर्माने जगावर वर्चस्व गाजवावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे याचेही विश्लेषण होणे आवश्यक आहे. आता आपण ‘विश्वगुरु’ होण्यासाठी प्रयत्न करत असतांना विरोधकांना ही भीती वाटते की, ते हिंदूंचे धर्मांतर करू शकणार नाहीत, त्यांची दिशाभूल करू शकणार नाहीत आणि जर त्यांनी काही चूक केली, तर त्यांना तेथे ती संधी मिळणार नाही ? या दृष्टीकोनातून आपल्याला पहावे लागेल.

४. अडीच स्तरावरील युद्ध लढण्यासाठी भारताने सिद्धता करणे आवश्यक !

प्रभु श्रीरामाला प्रथम वनवासाला सामोरे जावे लागले. त्याने रावणाशी एक भीषण युद्ध केले आणि मग रामराज्याची स्थापना केली. पांडवांचा विचार करता, त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांनी एक द्यूत खेळले आणि त्यांच्या जीवनात अज्ञातवास आला. त्यानंतर महाभारत युद्ध झाले. या स्तरावर आपली साधना किती आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. मध्यंतरी भारताचे सैन्यदलप्रमुख म्हणाले होते की, भारताचे युद्ध झाल्यास ते अडीच स्तरांवर होईल. त्यांच्या मते ‘देशांतर्गत पाकिस्तान समर्थित, बांगलादेश समर्थित आणि चीन समर्थित यांची आघाडी आहे. माझ्या मते देशात ख्रिस्ती प्रचारक समर्थित शक्तीही कार्यरत आहे. त्यामुळे सीमेवर जेवढे युद्ध होईल, तेवढेच युद्ध देशांतर्गतही होईल आणि त्यासाठी भारतीय जनतेने सिद्ध राहिले पाहिजे’, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुखांनी दिली होती. एक सैन्याधिकारी देशांतर्गत धोक्यांचा सखोल अभ्यास करून हे सांगत असेल, तर परत एकदा रामायण आणि महाभारत यांची पुनरावृत्ती तर होणार नाही ना ? अशी शक्यता वाटते.


हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, ही जनतेची इच्छा !


लोकशाहीत लोकशक्तीचे एक महत्त्व असते. हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०१२ मध्ये प्रथमच हिंदु राष्ट्राची (सनातन राष्ट्राची) कल्पना मांडली, तेव्हा अनेकांना वाटले की, हे हिंदु राष्ट्र हे केवळ एक स्वप्न असून वास्तवात येणे अशक्य आहे. अनेक जण म्हणायचे की, तुम्ही हिंदु राष्ट्राची मागणी करत आहात, जे असंवैधानिक आहे. आज हिंदु राष्ट्रासाठी जनतेची भावना व्यक्त होत आहे, विविध ‘डिजिटल फूट प्रिंट’ (इंटरनेटवर माहिती ठेवणे) सिद्ध होत आहेत, तसेच जग त्याच्या माहितीचे विश्लेषण आणि अभ्यास करत आहे. आज जग भारताकडे ‘हिंदु पुनरुत्थानाचा काळ’ म्हणून पहात आहे.

५. सरकारी यंत्रणा आणि जनता यांच्या समन्वयातून राष्ट्राचे रक्षण

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यापूर्वी जग तिसर्‍या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे. सध्या माध्यमांचे युद्ध चालू आहे, कथानकांचे (‘नॅरेटिव्ह’चे) युद्ध चालू आहे, तसेच ट्रम्प यांच्या आयात करांमुळे आर्थिक युद्ध चालू झाले आहे. हे भारताला युद्धाकडे ढकलत आहेत. ‘त्यामुळे भारत सरकारही युद्धाची सिद्धता करत आहे’, असे वाटते. सैन्यदलप्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे एक अंतर्गत युद्धाची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय जनतेने या सरकारी यंत्रणांसह थोडे एकत्र बसून पाकिस्तान, बांगलादेश, चीन किंवा ख्रिस्ती धर्मप्रचारक यांसारख्या अंतर्गत शत्रूंना कसे निष्प्रभ करायचे, यावर विचारविनिमय केला पाहिजे.

आपण आपला देश, समाज, गाव यांचे रक्षण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काय करू शकतो ? यावर चर्चा करूया. सरकारने गाव सुरक्षा पथके, शहर सुरक्षा पथके, पोलीस मित्र आणि सैन्य मित्र यांसारख्या संघटना सिद्ध कराव्या अन् त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. आपत्काळात राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्यांचा वापर करून देशांतर्गत न्यूनतम हानी व्हावी, यासाठी प्रयत्न करावा. बांगलादेश, नेपाळ, तुर्कीये, इंडोनेशिया, तसेच फ्रान्स अशा विविध देशांमध्ये सत्तापालट होत आहेत. श्रीलंकेतही अधूनमधून असे घडत आहे. या गोष्टी भारताच्या अंतर्गत असलेल्या अर्ध्या आघाडीला पुढील काळासाठी शिक्षित तर करत नाही ना, असे वाटते.

सैन्यप्रमुखांची चेतावणी लक्षात घेता समाज रस्त्यावर उतरून अराजकता निर्माण करत असेल, राष्ट्रीय मालमत्ता, पोलीस प्रशासन आणि सरकारी वास्तू यांची हानी होत असेल, निष्पाप नागरिकांना त्रास होत असेल, तर त्यांच्या रक्षणासाठी सरकारला काही उपाययोजना कराव्या लागतील. यासंदर्भात सरकारने एक ठाम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सैन्यप्रमुखांनी अडीच आघाडीच्या संदर्भात दिलेली चेतावणी गांभीर्याने घेऊन सरकारने जलद कार्यवाही करणे आवश्यक आहे.’

(समाप्त)

– सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.


‘प्राच्यम्’ या ओटीटी वाहिनीवरील सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत पहा !
https://youtu.be/82-sVevgg9s