वैशाख मासात करायची पुण्यकर्मे आणि त्यांचे फळ !

‘वैशाख मासात पुढील कृती प्रतिदिन केल्यास अधिकाधिक लाभ होतो.

उदकुंभदान

१. पद्म पुराणात सांगितलेली पुण्यकर्मे आणि त्यांचे फळ !

अ. वैशाख मासात जो गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधु किंवा कावेरी या पुण्य नद्यांच्या काठी यथाविधी स्नान करून ‘ब्रह्मचर्य पाळणे, पलंग इत्यादी सुखासनावर न झोपता भूमीवर झोपणे, केवळ हविष्यान्न (‘व्रतराज’ या ग्रंथात दिल्याप्रमाणे – तांदूळ, सातू, दूध, दही, मूग, तीळ इत्यादी) भक्षण करणे, दानधर्म करणे, विष्णुपूजन करणे’ इत्यादी नियम पाळील, त्याने सहस्रो जन्मांत केलेली महापापेसुद्धा नाश पावतील.

आ. वैशाख मासात जो आळसाचा त्याग करून ‘एकभुक्त (दिवसातून केवळ एकदाच अन्न ग्रहण करणे), नक्त (केवळ रात्री एकदाच अन्न ग्रहण करणे) किंवा अयाचित् (कुणी स्वतःहून आपल्याला अन्न आणून दिले, तर ते आणि तेवढेच अन्न ग्रहण करणे)’, ही व्रते करतो, त्याची इच्छित शुभकामना पूर्ण होते.

इ. कृष्णतुळस आणि साधी तुळस यांचा वापर करून त्रिकाळ (प्रातःकाळ, माध्यान्हकाळ (दुपार) आणि सायंकाळ) भगवान श्रीविष्णूची पूजा केल्यास मुक्ती मिळते.

२. मदनरत्न आणि स्कंद पुराणात सांगितलेली पुण्यकर्मे अन् त्यांचे फळ !

मदनरत्न आणि स्कंद पुराणात सांगितले आहे, ‘वैशाख मासात ‘पाणपोई (पिण्याच्या पाण्याची केलेली व्यवस्था) चालू करणे, मंदिरात देवाला अभिषेक करण्यासाठी अभिषेकपात्र बसवून देणे, तसेच पंखा, छत्री, पादत्राणे, चंदन यांचे दान करणे’, या कृती महापुण्यकारक आहेत.

३. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करायची पुण्यकर्मे अन् त्यांचे फळ !

श्री. अमर जोशी

वैशाख मास विशेषत्वाने ओळखला जातो, तो या मासातील अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तामुळे ! आज आपण अक्षय्य तृतीयेच्या पुण्यकारक दिवशी करण्याची धर्मकार्ये पाहूया.

शास्त्रकारांनी वैशाख मासाच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ‘अक्षय्य तृतीया’, अशी संज्ञा दिली आहे; कारण या दिवशी ‘जप, होम, पितृतर्पण, दान’, अशी पुण्यकर्मे केल्यास ती अक्षय्य, म्हणजे अनंत काळापर्यंत पुण्य देणारी होतात. या वर्षी १९.४.२०२६ या दिवशी ‘अक्षय्य तृतीया’ ही तिथी सकाळी साधारण १०.५० नंतर चालू होते. त्यामुळे इच्छित पुण्यकर्मे सकाळी १०.५० नंतर करावीत.

अ. या दिवशी गंगास्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो.

आ. या दिवशी श्रीकृष्णाच्या अंगाला चंदन लावल्याने पूजकाला मृत्यूनंतर वैकुंठलोकाची प्राप्ती होते.

इ. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उदकुंभाचे, म्हणजे पाण्याच्या कलशाचे (माठाचे) दान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या विधीचे साधारण स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

भगवान महाविष्णूच्या कृपाप्राप्तीसाठी करावयाच्या ‘उदकुंभदान’, या विधीचा संकल्प पुढीलप्रमाणे करावा, ‘श्रीपरमेश्वरप्रीतिद्वारा उदकुम्भदानकल्पोक्त-फलप्राप्त्यथम् उदकुम्भदानं करिष्ये ।’ कुंभाला सुती धागा गुंडाळावा. कुंभात पाणी भरावे. त्यात गंध, सुपारी आणि सवात (यव, जव, अन् सातू) घालावेत. कुंभाचे पुढीलप्रमाणे पंचोपचार पूजन करावे – कुंभाला १. गंध, हळद, कुंकू, अक्षता आणि २. फूल वहावे. ३. नंतर धूप किंवा उदबत्ती ओवाळावी. ४. निरांजन ओवाळावे आणि  ५. गूळ किंवा तत्सम गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. शेवटी ‘या पाण्याने भरलेल्या कुंभाच्या दानाने माझ्या सर्व शुभ मनोरथांची पूर्तता व्हावी’, अशी प्रार्थना करून कुंभ दान करावा.

‘उदकुंभदान’, हा विधी पितरांच्या तृप्तीसाठी करणार असल्यास ‘पितृणां अक्षय्यतृप्त्यर्थं कुम्भदानं करिष्ये ।’, असा संकल्प करावा. वरीलप्रमाणेच कुंभात पाणी भरून त्याला सुती धागा गुंडाळावा. त्यात गंध, सुपारी आणि तीळ घालावेत. वरीलप्रमाणेच पूजा करावी. कुंभदानासाठी पुढील प्रार्थना करावी. ‘या पाण्याने भरलेल्या कुंभाच्या दानाने माझ्या सर्व पितरांची अक्षय्य काळासाठी तृप्ती व्हावी आणि मला त्यांचे आशीर्वाद मिळावेत.’

ई. अक्षय्य तृतीया ही तिथी ‘युगादि तिथी’सुद्धा आहे. ‘युगादि’ याचा अर्थ युगाचा आरंभ होणे. वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी कृतयुग, म्हणजेच सत्ययुग चालू झाले होते. अशा युगादि तिथीच्या दिवशी उपवास करणे महापुण्यकारक आहे, तसेच या दिवशी समुद्रस्नान केल्याने अनेक पापांचा नाश होतो.

उ. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘परशुराम जयंती’ आहे. यानिमित्त सायंकाळपर्यंत उपवास करून प्रदोष काळी (सूर्यास्ताच्या नंतर) परशुरामाची पूजा करावी. परशुरामाला पुढील मंत्राने अर्घ्य द्यावे –

जमदग्निसुतो वीर क्षत्रियान्तकर प्रभो ।
गृहाणार्घ्यं मया दत्तं कृपया परमेश्वर ।।

अर्थ : हे जमदग्नीऋषींच्या पुत्रा, विरा, क्षत्रियांचा अंत करणार्‍या प्रभो, परमेश्वरा, कृपया मी दिलेल्या अर्घ्याचा स्वीकार कर.’

(साभार : ‘धर्मसिंधु’ आणि ‘निर्णयसिंधु’)

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा (१४.४.२०२६)

‘वरील लिखाण आमच्या अल्पमतीनुसार आहे. यामध्ये विद्वानांना काही पालट सुचवायचे असल्यास किंवा अधिक माहिती उपलब्ध करून द्यायची असल्यास सनातन वेदपाठशाळेच्या ८१८०९६८६६० या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करावा’, ही नम्र विनंती !’

– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा